सध्या आपण सारेच एका अनपेक्षित मनोवस्थेतून जात आहोत, कोरोना नावाच्या विषाणूमुळे आपलं जीवनच बदलून गेलंय. या संकटकाळातून वाट काढताना आपण धास्तावलोय, घाबरलोय, भांबावलोय. तरीही झुंजतोय, झगडतोय, लढतोय. त्याच वेळी बरंच काही शिकतोय. अजूनही शिकायचंय.


या संकटकाळाने आपल्याला आतापर्यंत काय शिकवलं, याचा अंतर्मुख होऊन विचार केला, तर काही गोष्टी नक्कीच लक्षात येतील. यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. म्हणजे ही स्वच्छता आपल्याला माहिती होती, तरी त्याचं महत्त्व नव्याने अधोरेखित झालं. वारंवार स्वच्छ हात धुणे, बाहेरून आल्यावर कपडे बदलणे, गरम पाण्याने आंघोळ करणे. तसं पाहिलं तर या खूप बेसिक गोष्टी. पण, कोरोना काळाने याचं महत्त्व किती मोठं आहे हे सिद्ध केलंय.

त्याच वेळी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे.  चमचमीत खाण्यापेक्षा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाणं, किती महत्त्वाचं आहे, याविषयीही आपल्याला कायमचा धडा मिळालाय.

हा काळ आपल्याला आणखी एक गोष्ट शिकवून जातोय, ती बाब म्हणजे संयम. प्रचंड पेशन्स. बाहेर जाता येत नाहीये, घरातच राहावं लागतंय. तसंच ही परिस्थिती कधी बदलणार आहे, हे आताच ठामपणे कोणीच सांगू शकत नाहीये. त्यामुळे केवळ वाट पाहणं, प्रतीक्षा करणं हेच आपल्या हातात आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या संयमाची कसोटी आहे, खडतर परीक्षा आहे.

कसोटी क्रिकेटचा आदर्श याबाबतीत समोर ठेवायला हवा. म्हणजे आपले सुनील गावसकर आणि कंपनीने दाखवलेले पेशन्स आठवूनच सध्या जगावं. या मंडळींनी तासनतास खेळपट्टीवर उभं राहून चिवटपणा दाखवला, तोच चिवटपणा, संयमी वृत्ती, लढाऊ वृत्ती आपण दाखवायला हवी.

या काळात आपलं कुटुंब, आपली माणसं किती मूल्यवान आहेत, हेही आपण शिकतोय. ज्या माणसांना खरं तर आपण गृहीत धरत असतो, म्हणजे आईवडिलांपासून, बायकोमुलांपर्यंत. त्यांची साथ किती अनमोल आहे हे आज हायलाईट होतंय. धकाधकीच्या जीवनात, फास्ट लाईफमध्ये आणखी जास्त, आणखी जास्त असं सतत मिळवण्याच्या, कमावण्याच्या मागे आपण लागतो, तेव्हा या घरच्यांचा आपल्याला विसर पडतो. त्यांना द्यायचा क्वालिटी टाईम त्यांना देत नाही, तो या काळात आपण देतोय, नव्हे तो द्यायलाच हवा.

अमुक ब्रँडचाच शर्ट हवा, तमुक ब्रँडचीच जीन्स हवी. वन बीचएके घेतला की, टू बीएच के, नंतर थ्री बीचके मग बंगला. आपली भूक वाढतच जात असते. महत्त्वाकांक्षा जरुर हवी, पण हव्यास नसावा. ही महत्त्वाकांक्षा हव्यासात कधी रुपांतरित होते, ते आपलं आपल्यालाही कळत नाही. मग असं काहीतरी अनपेक्षित समोर आलं की, लक्षात येतं, अरेच्चा.... आपण उगाचच गरजा वाढवून बसलो होतो, या काळात आहे त्यातच भागवू शकतोय की. समाधानी वृत्ती आयुष्यात फार महत्त्वाची आहे, हाही धडा या काळाने आपल्याला दिलाय.

माणुसकीच श्रेष्ठ असते, हे देखील या काळाने आपल्याला शिकवलंय. माझंच एक ताजं उदाहरण देतो, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर नुकताच संपला, तो मलाच आणावा लागणार होता, कारण, एजन्सीकडून होम डिलिव्हरी बंद आहे. जरी ते ठिकाण घरापासून जवळ असलं तरी भरलेला सिलेंडर कॅरी करणं तितकं सोपं नाही. त्यात मान लचकल्याने मध्येच होणारं प्रचंड पेनिंग. त्यामुळे भरलेला सिलेंडर एकट्याने कॅरी करणं आव्हानात्मक होतं. त्यात

मी काहीच महिन्यांपूर्वी भाडकेरु म्हणून राहायला आलेल्या या ठिकाणी, म्हणजे तसा नवीनच.

अशा वेळी चाळीचं वातावरण मला फार मोलाचं वाटतं. माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठे असलेले आमचे अवधूत नावाचे शेजारी माझ्या मदतीला धावून आले. रिकामा सिलेंडर घेऊन जाण्यापासून भरलेला सिलेंडर घेऊन येईपर्यंत मला मदत केली, माझं काम झालं. काही महिन्यांची ओळख, काही वर्षांच्या आपुलकीचा अनुभव देऊन जाते, ती अशी. म्हटलं तर ही अगदी छोटी गोष्ट. पण, सध्याच्या घडीला याचं मोल मोठं आहे.

आपले शेजारी ही आपली एक्सटेंडेड फॅमिलीच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. आपल्याला काहीही इमर्जन्सी आली की, आधी धावतात ते आपले शेजारीच. नातेवाईक येतात पण, नंतर.

अशाच आपलेपणाने मदतीला धाव घेणाऱ्या शेजाऱ्यांच्या बाबतीत मी 'आपलं गिरगाव' या दिनदर्शिकेतील लेखामध्ये लिहिलेला अनुभव पुन्हा सांगतोय. काही वर्षांपूर्वी माझ्या बाबांना शुगर आणि ब्लडप्रेशरचा त्रास एकदम झाल्याने, ते इमारतीबाहेरून घरी येत असताना, तळमजल्यावरच बेशुद्ध झाले, त्यांना प्रचंड घाम आला.

हे सारं घडलं, तेव्हा मी ऑफिसला होतो. आईला तेव्हा नुकताच हातापायाला सूज येण्याचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे तिला भराभर पायऱ्या उतरून खाली जाणं शक्य नव्हतं, त्यावेळी तात्काळ आमच्या इमारतीतील शेजाऱ्यांनी धावपळ केली. काहींनी त्यांना साखर आणून दिली, पाणी दिलं. लगेचच त्यांना जवळच असलेल्या मेडिकल सेंटरमध्ये नेलं. तिथे ईसीजी काढला, तो नॉर्मल आला. मग औषधं घेऊन घरी आणलं आणि मला फोन केला. अरे अश्विन, असं असं झालं होतं, आता बाबा घरी आलेत, तू घरी आलास की डिटेल बोलूया.

हे दोन्ही अनुभव मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही.

नात्याची वीण उसवतेय, ढिली पडतेय, असं वाटत असताना आपण सारे या कोरोनाच्या काळात ती आणखी घट्ट करतोय. नव्हे ती करायला स्कोप आहे. तंत्रज्ञान कितीही अद्यावत झालं, पुढारलं तरी माणसाचं माणसाशी असलेलं नातं हेच अखंड टिकणारं आहे, एकमेकांच्या साथीनेच तुम्ही पुढे जाऊ शकता, संकटातून वाट काढू शकता, हे नव्याने पुन्हा एकदा सिद्ध होतंय.

कोरोनाचा का काळ कधी संपेल, हे माहीत नसलं तरी आज ना उद्या तो नक्की संपेल. तेव्हा या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवून, आणखी उत्तम माणूस म्हणून पुढे वाटचाल करता येईल, असा विश्वास वाटतोय.