राहीबाई विधवा आहे. तिची पांडुरंगावर अमीट श्रद्धा आहे. हे जग त्याच्या मर्जीनुसार चालतं असं तिला मनोमन वाटतं. बालपणापासून तिने अपार कष्ट केलेत. अजूनही ती मेहनत करते. तिच्या संघर्षाला सीमा नाही. तिची मुले, सुना, नातवंडे तिच्यावर नितांत माया करतात. आताशा ती थकली आहे.
तिची काया मलूल झाली असली तरी एक आगळेवेगळे तेज तिच्या चेहऱ्यावर आहे.
सुरकुत्यांची जाळी कपाळावरुन गालावर पसरलीय, कधीतरी बालपणी भाळावर गोंदलेलं तुळशीचं पान आता कपाळरेषांत चुरगाळून फिकट होऊन गेलंय. राहीबाई रोज पहाटेस काकड्याला हजर असते आणि रात्रीच्या शेजारतीलाही न चुकता येते. तिच्या भेगाळलेल्या हातांनी ती जेव्हा टाळया वाजवत असते तेंव्हा ती कमालीची तल्लीन झालेली असते. खरे तर तिला बऱ्यापैकी ऐकू येत नाही! मात्र त्याची कधी अडचण झालेली नाही.
निरूपण सुरू असताना गुडघ्यावर कोपर टेकवून दुसऱ्या हाताने पदर कपाळापर्यंत ओढणारी राहीबाई घरुन येताना गुळ खोबरं आणते आणि पांडुरंगाच्या पायापाशी ठेवून जाते. राहीबाई घरी गेल्यानंतर रात्री बऱ्याच उशीरा मंदिर अंधाराच्या स्वाधीन होतं. देवळातली आवराआवर झाल्यावर राहीबाई घरी येते, नावालाच दोन घास खाते. थोर झालेल्या नातीला पोटाशी घेऊन झोपी जाते तेंव्हा तिच्या घराच्या कुडाच्या भिंती तिच्याकडे कौतुकाने पाहतात, तिला डोळ्यात साठवत राहतात. राहीबाईच्याच जुनेर साड्यांची गोधडी त्यांनी पांघरलेली असते.थकलेली राहीबाई झोपी गेल्यानंतर तिची सून खोलीत एक चक्कर टाकते, कड्या कोयंड्या ठीकठाक लावल्या आहेत याची खात्री करून लाईट्स बंद करते. वास्तवात कुणी चोरुन न्यावी अशी कुठली चीजवस्तू तिच्या घरात नाहीये!
दमलेलं घर झोपी जातं.राहीबाईच्या घरात तोच अंधार भरुन असतो जो पांडुरंगाच्या मंदिरात वास्तव्यास असतो.अगदी मध्यरात्रीनंतरच्या प्रहरी तिथे गुलाल अबीर-बुक्क्याचा ,चिरमुरे बत्ताशाचा एक अद्भुत दरवळ जाणवतो. भल्या पहाटेस राहीबाईस नित्य स्वप्न पडते, तिचा कारभारी दौलत तिच्या स्वप्नात येतो. राहीबाईला भरून येतं. पहाटेस ती जागी होते तेव्हा ती भरून पावलेली असते. तिच्या जगण्यावर तिचे विलक्षण प्रेम आहे. घरातलं बारीक सारीक आवरून, अंघोळ उरकून ती मंदिराची वाट चालू लागते तेंव्हा तांबडं फुटलेलं असतं नी थंडगार वाऱ्याची सोबत असते.
राहीबाई देवळात आली की तिथल्या परिसराला एक वेगळंच चैतन्य येतं. खरं तर राहीबाई दिवसभर विठ्ठलमय असते, पांडुरंग तिच्यापासून कधीच विभक्त झालेलाच नसतो. तो तिच्या अंतरंगात खोलवर वसलेला असतो, ती देखील त्याचाशी पुरती एकरुप झालेली असते. राहीबाई अशिक्षित आहे, तिला लिहिता वाचता येत नाही तरीही तिला अभंग आरत्या पाठ आहेत. 'रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा' या पंक्ती गाताना ती 'राहीच्या वल्लभा' म्हणते तेंव्हा तिच्या आणि पांडुरंगाच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकते! तिचा समृद्ध समाधानी चेहरा पाहू जाता तिच्या उच्चारांची दुरुस्ती मी आजवर केलेली नाही. कदाचित तिच्याच पंक्ती खऱ्या असाव्यात कारण ती त्याच्याशी एकरुप झालेली आहे नी तिच्या भक्तीतच तिच्या जगण्यातली तृप्ती सामावली असावी.
राहीबाईच्या मनात विरक्ती आहे की नाही हे सांगता येणार नाही. रूढार्थाने तिला भौतिक ज्ञानही नाही. पतीच्या निधनानंतर न खचता तिने भावकीशी टक्कर देत मुले वाढवली, त्यांना मोठं केलं, पायावर उभं केलं. आता ती थकली असली तरी तिच्या जगण्याची शर्यत अजून पुरी झालेली नाही, तिला कशाची ओढ बाकी आहे याचा मी बऱ्याचदा शोध घेतला मात्र नेमके उत्तर सापडलेलं नाही. देवळात असताना ती अनेकदा बारीक आवाजात पुटपुटत असते, कदाचित तिच्या पांडुरंगास ते रहस्य ठाऊक असावे. म्हणूनच तो रोज पहाटेस तिच्या स्वप्नात येत असावा!
राहीबाईसारखी माणसं आताशा दुर्मिळ होत चाललीत. जीवाला जीव देणारी जुनी ओळख पुसून नवे विकासाचे मुखवटे आपल्या उदास चेहऱ्यावर ओढून घेणारी बकाल होत चाललेली गावे राहीबाईसारख्या जीवांची अखेरची पिढी पाहताहेत. ही पिढी गावागावातून संपलेली असेल तेंव्हा जगण्याचे गावसत्व पुरेसे आटलेले असेल नि उरला असेल शुष्क व्यावहारिक जीवन व्यवहार! अपेक्षांचं जग लहान असलं नि जगण्याचा परीघ दीर्घ नसला की तृप्ती असाध्य नसते, कदाचित राहीबाईला हे ठाऊक असावे. रात्रीस घरी परतताना ज्या वाटेने ती घरी जाते त्या वाटेनं तुळशीमाळेचा गंध जाणवतो, हा दरवळ माझ्या जाणिवांना समृद्ध करतो..
जेव्हा कधी कुठल्याही विठ्ठल मंदिरात मी जातो तेंव्हा तिथे असलेल्या स्त्रीपुरुषांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखतो. राहीबाई सारखी एखादी तरी स्त्री तिथे असतेच, ती ज्या कोनाड्यात उभी असते तो कोनाडा उजळून निघालेला असतो! विठ्ठल देखील तिथेच तर असतो!