हा ब्लॉग आपल्यावरचा.. आपल्यासाठी आहे..


हो.. हो. आपण. आपणच जे आता ज्यांनी हा ब्लॉग वाचायला सुरुवात केलीय त्यांच्यासाठी.


एक बातमी द्यायची होती. गुड न्यूज.


बातमी अशी, की आपला कलाकार.. जो नेहमी मदतीसाठी पुढे असतो. आपल्या चांगल्या कामातून रसिकांना मायबाप म्हणत त्यांचं मनोरंजन करतो.. तो कलाकार आता हळूहळू बोलायचा बंदच होणार आहे. आणि त्याची सुरुवात झालीय बरं का.


म्हणजे, आता काहीही घडलं.. अगदी काहीही.. तरी आपण काहीच बोलायचं नाही, अशा वळणावर कलाकार आला आहे. काय मग? हेच हवं होतं ना आपल्याला.. फायनली आपण ते करु शकलो. अर्थात इतक्या लवकर हे होईल याची कल्पना नव्हती आपल्या कुणालाच. पण शेवटी आपल्या धाकाने, दहशतीने.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आपल्या मौन बाळगण्याने हे साध्य केलं आहे. मौनं सर्वार्थ साधते असं म्हणतात ते काय उगाच नाही.


आपण म्हणजे.. आपणच. आपले आयटी सेल.. त्यातली मंडळी.. त्या मंडळींनी काढलेली बनावट अकाऊंट्स.. त्या अकाऊंटवरुन या कलाकारांना दिला जाणारा सततचा त्रास.. आणि हे सगळं सुरु असताना आपण बाळगलेल्या कणाहीन मौनामुळं पाजला गेलेला हेवी डोस याला कारणीभूत आहे.


आपल्या राज्यातच काहीतरी कुरबुरी व्हायच्या तेव्हाही कलाकारांना पछाडण्याचा प्रयत्न केलाच आपण. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. फायनली हिमाचल प्रदेशातून आणलेलं औषध बरोब्बर कामी आलं. एरवी इतके डोस देऊन पाहिलेच की आपण पण कलाकारांच्या सहनशीलतेचा काही अंत होईना. पण हिमाचली औषधाने तो गुण आला आणि तो गुण कसा येईल याची काळजी महाराष्ट्राने बरोबर घेतली. अभिनंदन सर्वांचं.


आता काही होवो. कलाकार पुरते गप्प बसतील याची खात्री आहे. परवा तर गंमत झाली, तिकडं ठाण्यातल्या पुलाबद्दल एक जण तळमळीनं बोलला. कुणासाठी बोलला? आपल्यासाठी.. पण आपण बरोब्बर त्याला पकडलं. इकडं या पक्षाने तिकडं त्या पक्षाने. कलाकाराचा मुद्दा डायरेक्ट हायजॅक. बरं, बोलून चोरी. या राजकीय पक्षाविरोधात बोला तर तो चिडतो. त्याच्या विरोधात बोला तर हा चिडतो हे कलाकाराला माहितेय. आणि वर अशी चिडाचिडी झाली की आपलं आपल्यालाच निस्तरावं लागतं हे त्याला आता पुरतं कळलं आहे. आपण जी वेळोवळी तत्परता दाखवून गप्प बसत गेलो त्याचंच फळ ते.


खरंतर आपण वेळोवेळी एकीकडे मौन बाळगत दुसरीकडे अशा सगळ्या संवेदनशील कलाकारांना खोपच्यात पकडत गेलो त्यालाही गुण द्यायला हवेत... या संवेदनशीलतेच्या तर.. !! आपल्यातल्याच कुणीतरी टपली मारायची आणि बाकी सगळ्यांनी गप्प राहायचं मेल्यासारखं... हे काळानुरुप आपण पचनी पाडलेले आहे त्याबद्दल आपण एकमेकांचं अभिनंदन करायला हवं.


शिवाय, आपण जी दांभिकता या सगळ्यात दाखवली त्याला तोड नाही.


उठता लाथ बसता बुक्की.. स्थिती तयार व्हायला आपण सगळ्यांनीच जे कसोशीने प्रयत्न केले आहेत, त्याला सर्व श्रेय जातं. असो. यावर बोलू तेवढं कमी आहे. या सगळ्यावर 'हिमाचली' औषध कामी आलं. हे औषध व्हाया दिल्ली आल्यानं त्याला आपलं असं 'वजन' होतं. त्या औषधाने 'मुंबई'वर फिरवलेली मात्रा लागू पडली. या औषधाचा 'असर' तुमच्याआमच्यासह सगळ्या राज्यावर झाला.


हां. मग याला कलाकार कसे अपवाद असतील? पण कलाकारांनी तरी शांत रहायचं की नाही.. कुणी सांगितलं होतं बोलायला? पण आपले कलाकार संवेदनशील. त्यांनाही वाईट वाटलं. बरं, फक्त वाईट वाटलं असतं तर एकवेळ ठिकाय.

कलाकारांनी काय केलं?


आपले कलाकार पडले अत्यंत संयमी. त्यांनी कधीच कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेलं नाही. प्रत्येकाने आपली भूमिका उत्स्फूर्त मांडली. आणि घावले ते.


आणि बरोब्बर चुकले ते.


व्हायचं तेच झालं. त्यांनी भूमिका घेतल्यावर राष्ट्रद्रोही ठरवणं सोपं झालं. एरवी कधी हातात न सापडणारे कलाकार अलगद सापडले. मग आपण सोडतोय होय!!!


वेडे कलाकार. असं कधी व्यक्त व्हायचं असतं काय..


इथून सुरुवात झाली. आपल्याला जे हवं होतं ते व्हायची.


खरंतर अत्यंत संयमानं, विचारपूर्वक ही सगळी कलाकार मंडळी व्यक्त झाली होती. आता नीट बोलल्यावर सापडायचा कसा कलाकार..? कुठंतरी धरता यायला हवं की त्याला. बरं.. गंमत अशी की त्यांनी सो कॉल्ड व्यक्त झाल्यावर 'कलाकार बोलतच नाहीत' असं म्हणायलाही जागा नव्हती. भयंकर बाका प्रसंग होता आपल्या सर्वांपुढे.


पण..
पण..
पण..


आपला बाण बरोब्बर टारगेट हिट कधी झाला माहितीये? आपल्यापैकी अनेकांनी आपल्याच कलाकारांना पाठिंबा न देण्याचं धाडस दाखवलं ना तिथून. कलाकारांच्या बोलण्याचं आपल्याला न कौतुक होतं. ना समाधान. की फर्क पैंदा.. याच नोटवर आपण राहिलो ते बरं झालं.


इथं गोची झाली.


गोची म्हणजे.. झालीच ना. वा रे वा..म्हणजे कलाकार बोलला नाही की तुम्ही ह्या मोठ्या मोठ्या पोस्टी टाकणार. त्यांचा निषेध नोंदवणार. मग कलाकार बोलल्यावर त्याबद्दल निदान समाधान नको व्यक्त करायला? बरं. ते जाऊ दे. कालाकारांना ट्रोल केल्यानंतर कलाकारांच्या पाठिशी तरी आपण खंबीरपणे उभे राहिला हवं होतं असं त्यांच्यासारख्या अनेकांना वाटतही असेल.. पण अत्यंत शिताफीने आपण असं काहीच केलं नाही. इथे मज्जा यायला सुरुवात झाली.


'हिमाचली औषधा'ने आपल्या उरावर घाव घातले होतेच. आपण ते अत्यंत कर्तबगारीने सहन केले. त्या घावांचा निषेध नोंदवणारी जी मोजकी वेडी आणि उत्स्फूर्त मंडळी होती, त्यांच्या मानधनाचा विषय काढून त्यांचेच कपडे फाडायचा आपला शेवटचा हुकमी एक्का होता. त्यावेळीही आपण गप्प बसणं ही बेस्ट बाब होती. हाताच्या बोटांची कमीतकमी हालचाल करुन जे करता येईल ते आपण केलं. आलेले स्क्रीन शॉट केवळ आपण मनातल्या मनात हळहळत फॉरवर्ड केले. अगदीच आपल्यापैकी काहींनी सोशल मीडियावर त्या स्क्रीनशॉटचा निषेध वगैरे केला. पण त्यानं काही फरक पडत नाही.


हा हुकमी एक्का कामी आली. लै निघाली कलाकारांची. त्यांची मानधनं.. त्यांचे कार्यक्रम.. त्यांचे फोटो.. त्यांचं राहणं.. त्यांच्या गॉसिप्स.. अशी यथेच्छ चिखलफेक झाली. करायला हवीच होती. शेवटचा डाव आपला नको काय व्हायला? घामानं मिळवलेल्या पैशाची खिल्ली उडवली गेली.. जे बात. आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच कलाकारांना हीन बोल लावले गेले. आजवर महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं. आपण सगळे त्याचे मूक साक्षीदार झालो आहोत. ही तर सुरुवात आहे मंडळी.. आपण अनेक गोष्टींचे संक्रमणाचे साक्षीदार होणार आहोत.


त्यावेळी कशाला पडायचं आपण यात असा विचार आपल्याकडून जो झाला.. तोच घाव बरोबर वर्मी बसला.
त्याच घावाचं रुपांतर आता चांगल्या बातमीत झालं आहे.


आता कलाकार गप्प राहायचं म्हणतोय. टीका करणं वगैरे खूप पुढचं... आता ते म्हणतायत, आपल्याला काय वाटतं तेही आपण बोलायचंच नाही. असं एकेक कलाकाराचं तोंड बंद करुन टाकायचं आपण. एकदा ही पीढी बोलायची बंद झाली. की पुढच्या पिढीकडं पाहू. तसंही पहिल्या पिढीकडे छोटी पिढी बघत असतेच की.
तुम्हाला आठवतं.. पूर्वी कलाकार कविता टाकायचे. परिच्छेद टाकायचे. आपल्याला काय वाटतं त्यावर हिरीरीने व्यक्त व्हायचे. आतली धुसफूस बाहेर काढायचे. हे करताना त्यांनी कधीही दुसऱ्याला बोल लावले नाहीत हा भाग सोडा. पण परिस्थितीमुळं आलेलं इरिटेशन ते बोलून दाखवत होते. त्यांच्या व्यक्त होण्यावरून आपल्या मनात कलाकाराबद्दल आपुलकी निर्माण होत असे. आदर असे. पण आता तो काळ विद्युत वेगाने मागे पडतो आहे. अलिकडे टीका करण्यात आपल्या मंडळींनी जी गती दर्शवली त्यामुळेच हे झालं.


हे म्हणजे बोलला तर शिव्या अन् नाही बोलला तर शिमगा असं झालं.


तर मंडळी आपलं सर्वांचं अभिनंदन पुन्हा एकदा.


कलाकारांनी व्यक्त झालंच पाहिजे असं आपण बेंबीच्या देठापासून ओरडायचो..आठवतंय? पण आता हा देठ खुंटत जाऊन आपल्या छातीच्याही खाली गेला आहे. त्यामुळे अलिकडे सगळेच आवाज बंद होतात. आपण ओरडलो तरी बिनआवाजी भास निर्माण होतो केवळ. आपल्याला सवय कुठेय बोलायची. गोष्ट वापरायची बंद झाली की ती नामशेष होते. माकडाच्या शेपटीचं नाही का तसं झालं. असो. तो वेगळा विषय. पण आता आपला आवज गेला तर जाऊ दे.. समोरच्याने बोलता कामा नये हे धोरण आपण कायम ठेवायचं आहे. कारण, प्रश्न आपल्या आवाजाचा नाहीच आहे... असो.. आता मी काहीही लिहित जातोय. असो.


कळतंय का?
आता कलाकार बोलायचाच बंद होणार आहे. तो आता यापुढे काहीच कधीच काहीच बोलणार नाहीय.


..
..
अभिनंदन
आपल्या सर्वांचं अभिनंदन.
अशा कित्येक मृत्यूंचे साक्षीदार होणार आहोत आपण.
..
आणखी एक. इथे आपली जबाबदारी संपत नाही हं. उद्या जेव्हा केव्हा आपण आपली जात, धर्म, रंग, पक्ष, तत्व, विचार सोडून माणूस म्हणून नागडे एकटे उभे असू. तेव्हा यापैकी कुणीही कलाकार अचानक आपल्यासमोर उभा ठाकेल. आणि आपल्याला विचारेल, देवा माझं काय चुकलं होतं रे..
तेव्हा आपल्याला आपल्याकडचं उत्तर तयार ठेवायचं आहे.
ज्याची त्याची जबाबदारी.