1998 मध्ये झी मराठी (म्हणजे तेव्हाचं अल्फा मराठी) वर श्रीरंग गोडबोले यांची एक सिरिअल यायची... घडलंय बिघडलंय.. पॉलिटिकल सटायर अर्थात राजकीय टिवल्याबावल्या असं या मालिकेचं स्वरूप. कलाकारांची तोबा गर्दी... पण या मांदियाळींमध्ये एक नवखा चेहरा सहज लक्ष वेधून घ्यायचा.. तो म्हणजे चंपाचा.. ही चंपा काही रूढ अर्थाने सौंदर्याच्या व्याख्येत बसणारी मुलगी नाही... सावळी, साधी-सोज्वळ अशी गावरान, मात्र त्यातल्या त्यात स्मार्ट पोरगी... प्रेक्षकांच्या नजरेतून न सुटलेली मुक्ता बर्वेची ही पहिली ऑनस्क्रीन झलक...


मुक्ताला त्यानंतर नव्या मालिका मिळाल्या, पण ही कलाकारांची गर्दी काही पाठ सोडेना... अल्फा ची महामालिका ‘आभाळमाया’ असो, किंवा निवेदिता सराफ, सचिन खेडेकर, सुबोध भावे यांच्यासोबतची ‘बंधन’... पण दिग्गज अभिनेत्यांमध्ये ती झाकोळली गेली नाही. उलट तिने तिचं अस्तित्व जाणवून दिलं.

मुक्ताचं बालपण चिंचवडमध्ये गेलं. लहानपणी ती अत्यंत शांत होती आणि फारशी कोणात मिसळायची नाही. आईने लिहिलेल्या नाटकासाठी तिने पहिल्यांदा चेहऱ्यावर रंग चढवला. या अबोल सुरवंटाचं सुरेख फुलपाखरू होण्याचा प्रवास फार रंजक आहे. एसपी कॉलेजनंतर ललित कला केंद्रातून मुक्ताने गिरवलेले नाट्यशास्त्राचे धडे अभिनेत्री आणि माणूस म्हणून तिला उपयुक्त ठरले असावेत. त्यानंतर थेट मुंबई गाठणारी मुक्ता गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहिल्यावर आणखी धीट झाली. आज आपण जी अभ्यासू, मनस्वी मुक्ता पाहतो, ती अबोल होती, यावर विश्वास बसत नाही चटकन.

2001 मध्ये तिने व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं... सुयोगचं ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’... पाठोपाठ तिने चंदेरी पडद्यावरही पदार्पण केलं. त्यानंतर तिन्ही माध्यमांमध्ये तिची घोडदौड सुरु झाली, ती आजतागायत कायम आहे.

‘जोगवा’ हा सिनेमा मुक्ताच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉईंट म्हणायला हवा. सुली ही जोगतीण साकारताना तिने घेतलेली मेहनत, भूमिकेसाठी तिने केलेला अभ्यास, तिला खूप काही शिकवून गेला असेलच. पण तितकंच समृद्ध तिने प्रेक्षकांनाही केलं. देवाला वाहिलेले जोगते, देवदासी, किन्नर यांच्याकडे पाहण्याचा सामान्य माणसाचा दृष्टीकोन या सिनेमाने बदलला, त्यात मुक्ताचा वाटाही मोलाचा आहे.

एकीकडे पुण्याची मुलगी असून तिने ‘मुंबई पुणे मुंबई’ या सिनेमात मुंबईची पोरगी साकारली. दोनच कलाकारांना अख्खा सिनेमा खांद्यावर पेलून धरायचा होता. स्वप्नील जोशीच्या जोडीने तिने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. तिची डायलॉग डिलिव्हरी तर जबरदस्तच. त्यांची जोडी तर इतकी हिट ठरली की आधी दोघांवर सिरिअल आली, आणि आता तिसरा सिक्वल येतोय. तसंच, डबल सीट या सिनेमात ती मध्यमवर्गीय गृहिणी झाली. मंजिरीच्या व्यक्तिरेखेने अनेकांना अंथरूणाबाहेर पाय पसरण्याची ताकद दिली.

टीव्हीवर मुक्ताने साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप धाडसी होत्या. अग्नीशिखा मालिकेत आईला फसवणाऱ्या माणसांचा बदला घेणारी मुलगी असो, वा स्टार प्रवाहवर गाजलेल्या अग्निहोत्र मालिकेतील मंजुळा. लज्जामधली सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या मनूची मदत करणारी वकील मीरा, किंवा घनाशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणारी राधा सुद्धा तशी बोल्डच. मुक्ताच्या जागी दुसरी एखादी अभिनेत्री असती, तर भूमिकेला कितपत न्याय देऊ शकली असती, अशी शंका उपस्थित होण्याइतकं तिचं काम चोख.

चित्रपटात गेलो, म्हणजे रंगभूमीकडे पाठ फिरवायची, टेलिव्हिजन हीन, अशी मुक्ताची धारणा नाही. नाटकात मुक्ताने रंगवलेल्या भूमिकाही तितक्याच ताकदीच्या होत्या. 2005 मध्ये फायनल ड्राफ्ट नाटकातील तिची भूमिका सहज विसरता येण्यासारखी नाही.  तसं विनोदी बाजाच्या हम तो तेरे आशिक है मधली हिंदू तरुणाच्या प्रेमात पडलेली मुस्लीम रुक्साना मनावर छाप पडून जाते. कबड्डी कबड्डी नाटकात विनय आपटेसोबत तिची जुगलबंदी प्रेक्षकांना श्वास रोखायला लावते. अशीच जुगलबंदी छापा काटा नाटकात आईसोबत (आधी रिमा, नंतर नीना कुलकर्णी) रंगते. गेल्या वर्षी आलेल्या कोडमंत्र मधली अहिल्या देशमुख काळजात चर्र करते.

काही वर्षांपूर्वी मुक्ताने निर्मिती क्षेत्रात नवी इनिंग सुरु केली आहे. अत्यंत जवळची मैत्रीण असलेल्या अभिनेत्री रसिका जोशीच्या अकाली एक्झिटनंतर तिच्या नावाने मुक्ताने रसिका प्रोडक्शन सुरु केलं. चांगल्या भूमिका आणि संहिता मिळत असताना मला बॅटिंग करायची आहे, म्हणून मी बॅट घेणार, असं मुक्ताने केलं नाही. चांगलं तंत्र प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला तिने यात शिरकाव केला.

निर्मातीच्या भूमिकेत जाताना सुरुवातीच्या काळात कॉश्च्युम, मेकअप, लाईट असं केलेलं बॅकस्टेज काम तिचा पाया रचत होतं. तिच्या प्रोडक्शन मधून आलेली छापा काटा, लव्ह बर्डस, इंदिरा, कोडमंत्र ही त्यातलीच काही दर्जेदार नावं. बॅकस्टेज कलाकारांसाठी तिने सखाराम बाईंडरचे पाच प्रयोग केले आणि त्यात चंपाचा लीड रोल साकारला. करायचं तर दणक्यात, हा बहुदा तिचा नियम असावा.

मुक्ताने रचलेल्या कविता, तिचे लेख यातून तिचं बहुआयामी अंतरंग डोकावतं. ‘रंग नवा’ हा मुक्ताचा काव्यवाचनाचा कार्यक्रम सध्या गाजत आहे. त्याचप्रमाणे The Mukta Barve Show मधून तिने RJ म्हणून debut केला आहे. हिंदीत हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच चित्रपट तिने केले असले तरी मुक्ताला बॉलिवूडमध्ये बघण्याची चाहत्यांची इच्छा आहे. ती चाळीशीच्या वाटेवर असली तरी झाडामागे फिरत तिने एखादा dance करावा, अशी आमची इच्छा होती.. स्वतः मुक्ताला घुंघट घेऊन दागिन्याने मढलेली हिंदी मालिकेतली बहु-भाभी साकारायची आहे. मुक्ताला तिचे सगळे ‘ड्रीम रोल’ साकारता यावे, यासाठी ‘माझा’तर्फे शुभेच्छा.