आईवडिलांची महती सांगताना आमच्या डोळयासमोर आज पण चेहऱ्यावर अतिप्रेमळ भाव आणून 'ये तो सच है के भगवान है' गाणारा मोहनीशच डोळ्यासमोर येतो.
मोहनीश बहल, म्हटलं की तुम्हाला काय काय आठवतं? 'हम आपके है कौन' हा सिनेमा? 'संजीवनी' सिरीयल? 'दुल्हेराजा'मधला त्याचा विनोदी ढंगातला खलनायक? माझ्यापुरतं बोलायचं तर मला दोन गोष्टी आठवतात. अशा दोन गोष्टी ज्या मला आयुष्यातली दोन महत्वाचे तत्वज्ञान शिकवून गेल्या. 'मैने प्यार किया'मधला त्याचा जीवनभर पार्टीमध्ये प्रेम आणि सुमन यांचा जाहीर पाणउतारा करताना एक थोर गोष्ट शिकवून जातो. "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते, प्रेम." पडद्यावर मोहनीश बहेल हा संवाद इतक्या कन्विन्सिंगली बोलला होता की जणू काही ते ब्रम्हवाक्यच होत. 'मैने प्यार किया' मध्येच सुमन आणि प्रेमने हे सिद्ध केलंच होत की. 'दोस्ती मे नो सॉरी , नो थँक्स ' म्हणत मैत्रीच्या आणाभाका घेणारे सुमन आणि प्रेम पद्धतशीरपणे एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडून मोकळे होतात. सिनेमात खलनायक असला तरी शेवटी तोच द्रष्टा होता हे सिद्ध होत. खऱ्या आयुष्यात ह्या विधानाला काही अर्थ नाही हे कळण्यासाठी आयुष्यातली काही वर्ष जावी लागली आणि आयुष्यात काही चांगल्या मैत्रिणी याव्या लागल्या. मोहनीशने सांगितलेलं दुसरं तत्वज्ञान त्याच्या सिनेमातल्या गाण्यातून आलं होत. 'हम हम साथ है' या सुरज बडजात्याच्या फिल्ममध्ये आई वडिलांची महती गाणार 'ये तो सच है के भगवान है' गाणं वर्षानुवर्षे लोकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत आलं आहे. भारतीय लोक आणि त्यांचं पालकांवरच प्रेम हा जगात कुतूहलाचा विषय आहे. भारतीय सिनेमात पण याच प्रतिबिंब पडलं आहे. पण 'ये तो सच है के भगवान है ' या गाण्याचं नव्वदच्या दशकात वाढलेल्या पिढीसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यामुळे माझ्या पिढीसाठी साईड रोल करणारा अजून एक बरा नट एवढंच मोहनीश बहेलच महत्व नाही. तर एक फिल्मी स्टाईलने तत्वज्ञान सांगणारा एक दार्शनिक असं आहे. मोहनीशने चित्रपटसृष्टीमध्ये 'बेकरार' या सिनेमातून पदार्पण केलं तेंव्हा नूतनचा मुलगा म्हणून त्याच्याभोवती एक आकर्षक वलय होत .मोहनीश बहलच पदार्पण झालं त्यावेळेस देशातली आणि फिल्म इंडस्ट्रीतली परिस्थिती थोडी विचित्र होती. बच्चनला राजकारणात जाण्याचे वेध लागले होते. इलाहाबादमधून देवकीनंदन बहुगुणा यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी त्याने बॉलिवूडमधून थोडी रजा घेतली होती. बच्चन पुन्हा फिल्म्समध्ये वापस येईल का याबद्दल लोकांना रास्त शंका होत्या. बच्चनच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कोण भरून काढणार याबद्दल चर्चा पण सुरु झाल्या होत्या. बच्चनच्या मोकळ्या सिंहासनावर बसू शकेल अशा काही लोकांमध्ये त्यावेळेस मोहनीश बहलच नाव जॅकी श्रॉफ, सनी देओल, चिंटू कपूर यांच्या सोबत घेतल्या जात होत ,हे सांगितलं तर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल. विशेषतः मोहनीशला साईडरोल्समध्ये बघण्यात आयुष्य गेलेल्या सध्याच्या पिढीला तर यावर विश्वासच बसणार नाही. पण असं झालं होत हे खरं. एक तर मोहनीश हा नूतनचा मुलगा होता. डिव्हाईन जीन्स या संकल्पनेवर विश्वास असणाऱ्या लोकांना नूतनचा अंश असणारा तिचा मुलगा 'नेक्स्ट बिग थिंग' आहे असं वाटायचं. त्या काळात मोहनीश 'मॅन ऑफ पॉसिबिलटीज' होता. नूतनचा मुलगा असणं, त्यामुळे जनमानसात त्याच्याबद्दल उत्सुकता असणं, बिग बॅनरचे चित्रपट हातात असणं असे सगळे घटक मोहनीश मोठा स्टार होणार याकडे अंगुलीनिर्देश करत होते. पण यासाठी नियतीच जे बाशिंगबळ लागत ते कमी पडलं. सोलो हिरो म्हणून मोहनीशचा एक पण सिनेमा चालला नाही. 'नेक्स्ट बिग थिंग' वाटत असणारा मोहनीश हळूहळू 'आल्सो रँन' मध्ये जमा होत गेला. हे थोडं धक्कादायक होत. मोहनीश दिसायला बरा होता. अभिनय पण ठीकठाक करायचा. वेगळ्या जातकुळीचा आवाज होता. पण प्रेक्षकांनी मोहनीशच्या चित्रपटांना नाकारलं हे खरं. मोहनीशच पदार्पण झालं आणि काही वर्षातच फिल्म इंडस्ट्रीमध्ये खान्स आणि कुमार यांचं आगमन व्हायला लागलं. अगोदरच काठावर पोहणारा मोहनीश या वावटळीत किनाऱ्यापासून दूरच फेकला गेला. पण सुपस्टारसारखा करिष्मा मोहनीशमध्ये नसला तरी त्याच्यात एक उपजत शहाणपण होत. आपण नायकाच्याच भूमिका करणार असा अट्टाहास करत बसलो तर आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे, हे त्यानं ओळखलं. त्याने इतर भूमिकांकडे वळण्याचा शहाणपणाचा जो निर्णय घेतला, तोच त्याच्या कारकिर्दीला वेगळं वळण देणारा ठरला. 1989 ला 'मैने प्यार किया'मध्ये एक वेगळा मोहनीश प्रेक्षकांना बघायला मिळाला. त्याचा खलनायकी जीवन प्रेक्षकांना आवडला. सलमान, भाग्यश्री, हिट गाणी, सुरज बडजात्याचं दिग्दर्शन या सोबतच हा सिनेमा सुपरहिट होण्यामागे मोहनीशचा खलनायकी जीवन पण कारणीभूत होता असं विधान केलं तर आश्चर्य वाटायला नको. 'मैने प्यार किया'पासून मोहनीशच्या कारकिर्दीची दुसरी इनिंग सुरु झाली. वैयक्तिक आयुष्यात पण 'मैने प्यार किया' मोहनीशसाठी महत्वाचा आहे. कारण तिथेच त्याला जीवाला जीव देणारे सलमान खान आणि आलोक नाथ सारखे मित्र मिळाले. मोहनीशच्या कारकिर्दीमध्ये जे जे महत्वाचे चित्रपट आहेत त्यातल्या बहुतेकांमध्ये हे दोघे उपस्थित आहेत हा निव्वळ योगायोग नसावा. मोहनीशने नंतर काही वर्ष सातत्याने खलनायकी भूमिका केल्या. 'शोला और शबनम', 'दिवाना', 'बोल राधा बोल' हे त्यातले काही उल्लेखनीय हिट चित्रपट. मोहनीश आता खलनायकी भूमिकांमध्ये टाइपकास्ट होणार असं वाटत असतानाच पुन्हा सूरज बडजात्या त्याच्या मदतीला धावून आला. ज्या सूरज बडजात्याने 'मैने प्यार किया'मधून मोहनीशचा मेकओव्हर केला होता त्यानेच 'हम आपके है कौन'मधून मोहनीशच्या ऑनस्क्रीन इमेजला वेगळं वळण दिल. मोहनीशची ही वेगळी इमेज होती 'आदर्श बडे भैय्या'ची. छोट्या भावांची काळजी घेणारा, घरातल्या वरिष्ठांची पूजा करणारा, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारा जवळपास आदर्श पुरुष असं मोहनीशच्या या प्रकारच्या भूमिकांचं एक 'टेम्प्लेट' होत. मोहनीशला या प्रकारच्या भूमिकांमध्ये पण लोकप्रियता मिळाली. 'हम साथ साथ है'च्या यशाने ही इमेज अजून घट्ट केली. मध्यंतरी ट्विटरवर आलोकनाथच्या 'संस्कारी बाबूजी' या भूमिकेवरून विनोदांची लाट आली होती. त्यानंतरच काही दिवसांनी मोहनीशच्या 'आदर्श भैय्या' वर विनोदाचा ट्रेंड सुरु झाला होता. निव्वळ तुफानी विनोद होते. ज्या दिवशी मूड खराब असेल त्या दिवशी इंटरनेटवर सर्च करून वाचा. बिघडलेला मूड लगेच ठीक होईल. विनोदावरून आठवलं. मोहनीशच कॉमिक टाईमिंग पण चांगलं आहे. 'दुल्हेराजा ' मध्ये गोविंदा सारख्या पॉवरहाऊस परफॉर्मरसमोर बुजून न जाता त्याने उत्तम कॉमेडी केली आहे .त्या सिनेमात एक धमाल प्रसंग आहे. मोहनीश बहल यात एक बिघडलेला अय्याश तरुण दाखवलाय. एकदा भर रस्त्यावरच गाडीच्या टपावर बसून पोरींसोबत त्याचा मद्यपानाचा कार्यक्रम चालू असतो. त्याच रस्त्यावरून ऑटोमधून गोविंदा जात असतो . मोहनीशने रस्त्यावर फोडलेल्या दारूच्या बाटलीमुळे ऑटो पंक्चर होते. मोहनीशला जाब विचारायला गेलेल्या ऑटोवाल्यालाच मोहनीश धक्काबुक्की करतो. मग इरसाल गोविंदा हातात परिस्थितीची सूत्र घेतो. आणि मोहनीशची तारीफ करता करताच त्याची धुनाई करतो , असा हा प्रसंग आहे. त्या प्रसंगात गोविंदा इतकीच मोहनीश मजा करून जातो. 'दुल्हेराजा ' सारखे विनोदी सिनेमे मोहनीशला फारसे मिळाले नाहीत. बदलत्या काळाची पावलं ओळखून मोहनीशने टेलिव्हिजनच्या क्षेत्रात पण पाऊल ठेवलं. 'संजीवनी ' ही त्याची मालिका खूप गाजली . 'सावधान इंडिया' च्या काही शोचं त्यानं सूत्रसंचालन केलं. 'फ्रेंडझोन्ड ' होणं ही सध्याच्या तरुण पिढीसमोरची मोठी समस्या असावी. नव्वदच्या दशकात मुलामुलींचा संवाद होणं (विशेषतः छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात ) अशक्य कोटीमधली गोष्ट होती. जी थोडीफार 'फ्रेंडझोन्ड ' होण्याची शक्यता होती ती मोहनीश बहलने "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते, प्रेम." हा संवाद मारून कायमची संपवली. किमान यासाठी तरी नव्वदच्या दशकात मोठं झालेल्या लोकांनी मोहनीशचे आभार मानायला हरकत नाही. आईवडिलांची महती सांगताना आमच्या डोळयासमोर आज पण चेहऱ्यावर अतिप्रेमळ भाव आणून 'ये तो सच है के भगवान है' गाणारा मोहनीशच डोळ्यासमोर येतो. आयुष्यात दोन महत्वाच्या गोष्टी शिकवल्याबद्दल मोहनीश बहलचे पुन्हा पुन्हा आभार. अमोल उदगीरकर यांचे याआधीच ब्लॉग : गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडाजेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहराएका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावानअलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिकागर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट श्रीदेवी नावाचं फेनॉमेन कुमार सानू -एका दशकाचा आवाज (1)