आज जावेद जाफरीवर लिहायलाच पाहिजे. मुळात जावेद जाफरीने असे काय दिवे लावले आहेत किंवा असं काय भारी  केलं आहे म्हणून त्याच्यावर लिहिलं पाहिजे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. माझ्यासाठी हे लिहिणं आवश्यक आहे. कारण अष्टपैलू कलाकारांची एक छोटी का होईना परंपरा बॉलीवूडला आहे. किशोर कुमार, फरहान अख्तर आणि इतर मोजके लोक या यादीत आहेत. जावेद जाफरी पण या परंपरेचा वारकरी आहे. प्रचंड गुणवत्ता असणारा अभिनेता, एक अफलातून डान्सर, खर्जातल्या घनगंभीर आवाजाचा मालक आणि मुख्य म्हणजे संतुलित विचार करणारा चांगला माणूस हे सगळे गुण जावेद जाफरीमध्ये एकवटले आहेत. पण दुर्दैवाने जावेदबद्दल मेनस्ट्रीम माध्यमांमधून फारस वाचायला मिळत नाही. अनेक कला या माणसामध्ये असल्या तरी माध्यमांचा प्रकाशझोत स्वतःवर पाडून घेण्याची कला या माणसाकडे नसावी. हा लेख म्हणजे या गुणवत्तावान पण लाजाळू माणसाला उलगडण्याचा छोटा प्रयत्न आहे. जावेद जाफरी हा इंडस्ट्रीमधल्या सर्वोत्कृष्ट डान्सर्सपैकी एक आहे. हृतिक आणि शाहिद येण्यापूर्वीचा इंडस्ट्रीमधला सर्वोत्तम डान्सर. त्याला भारतीय सिनेमातला पहिला ब्रेक डान्सर हे बिरुद पण मिळालं आहे. त्याच्या 'मेरी जंग' या चित्रपटात त्याने एका 'रीच ब्रॅट' ची भूमिका केली होती. त्या चित्रपटात त्याचा डान्स बघून अनिल कपूरची बहीण त्याच्या प्रेमात पडते असा एक सिक्वेन्स होता. त्यात त्याचा डान्स एवढा जबरदस्त होता की तो सीन एकदम पटायचाच. आजपण संधी मिळाली तर हा माणूस हृतिक आणि शाहिदला तोडीसतोड टक्कर देऊ शकतो. 'हंड्रेड डेज' नावाच्या एका जबरी सस्पेन्स फिल्ममध्ये त्याने माधुरी दीक्षित सोबत 'गब्बरसिंग ये कह कर गया' गाण्यात जबरी स्टेप मिळवल्या आहेत. पण भारतीय डान्सला त्यानं दिलेलं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे 'बुगी वूगी शो'. स्वतः जावेद एक उत्कृष्ट डान्सर होताच पण त्याने 'बुगी वूगी ' मधून अनेक उदयोन्मुख डान्सर्सला व्यासपीठ मिळवून दिल. सोनी टीव्हीवर 1996 पासून सुरु झालेल्या या शोने अनेक लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी दिली. आजकालच्या रियालिटी शोजमध्ये रडापड जास्त असते आणि परफॉर्मन्स कमी असतो. बुगी वूगी मध्ये मात्र असले फाटे नव्हते. फक्त डान्स आणि डान्स. जावेद ज्या अदबीने तरुण प्रेक्षकांसोबत बोलायचा त्यांना महत्व द्यायचा ते बघणं हा एक सुंदर अनुभव होता. 'बुगी वूगी' च्या एका शो मध्ये शाहिद कपूर पाहुणा परीक्षक म्हणून आला होता, तेंव्हा जावेद हा माझ्यापेक्षा कितीतरी पट भारी डान्सर आहे असं भरभरून सांगत होता, तेंव्हा हा विनयशील माणूस कोपऱ्यात नजर चोरत उभा होता. सुनील दत्त यांची मुलगी आणि माजी खासदार प्रिया दत्त ही जावेदची क्लासमेट. एका कार्यक्रमात जावेद तिथं हजर असतानाच तिने जावेदच्या कॉलेजमधल्या आठवणी सांगत होती. त्यात जावेद कॉलेजच्या कॅन्टीनच्या टेबलावरच मित्रांच्या आग्रहावरून डान्सचा कार्यक्रम करायचा आणि त्याला बघायला सगळं कॉलेज लोटायचं अशी एक आठवण प्रियाने सांगितली होती. जावेद जाफरी आणि प्रभुदेवा या दोन महान डान्सरच पण एक कनेक्शन आहे. 'सपने ' या चित्रपटामध्ये जावेदने प्रभुदेवासाठी डबिंग केलं आहे. जावेद जाफरीचा आवाज त्याला एक उत्तम डबिंग आर्टिस्ट बनवतो.  चेतन सशितल या देशातल्या सर्वात अनुभवी, आणि सर्वोत्कृष्ट डबिंग आर्टिस्टने एक किस्सा सांगितला होता. डिस्ने त्यावेळेस भारतात आगमनाच्या तयारीत होत. वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्सना आवाज देण्यासाठी त्यांना चांगले डबिंग आर्टिस्ट हवे होते. त्यावेळेस चेतन सशितल आणि जावेद जाफरी हे त्या आवाजांसाठी सिलेक्ट झाले होते. त्या दोघांनी डक टेल्स, टेल्स्पिन, अलादिन या त्यावेळेस भारतीय बच्चेकंपनीमध्ये लोकप्रिय झालेल्या सगळ्या कार्टून्सना आपला आवाज दिला होता.  या कार्टून्सनी नव्वदच्या दशकातल्या पिढीचं लहानपण समृद्ध केलं आहे. हे एका पिढीचं बालपण समृद्ध करण्यात जावेदचा मोठा वाटा आहे. "ताकेशीज् कॅसल" नावाचा एक  लहान मुलांचा शो यायचा पोगो चॅनेलवर. हजार पाचशे पोरा पोरींच्यात वेगवेगळ्या गमतीशीर स्पर्धा होऊन मग शेवटी त्यातले 10-15 लोक एका कॅसलवर हल्ला करणार अशी थीम होती. ह्या कार्यक्रमाला जावेद जाफरीची कॉमेंटरी होती. नुसत्या कॉमेंटरीने जावेद लोळवायचा हसवून हसवून....हो! मी चक्क पोगो चॅनेल पाहायचो जावेद जाफरीसाठी बाकी जावेदच आयुष्य दुय्यम आणि खलनायकी भूमिका करण्यात गेलं. पण ज्यांनी 'फायर' चित्रपट बघितला असेल त्यांना हा काय कॅलिबरचा नट आहे हे कळलं असेल. टिपिकल 'पुरुषी ' वृत्ती असणारा पारंपरिक बायकोला गृहीत धरणारा नवरा त्याने इतक्या सहजतेने साकारला होता की तो खऱ्या आयुष्यात पण असाच आहे का असा कुणाचाही समज होईल. त्या चित्रपटात एक प्रसंग आहे. ताजमहाल पाहताना नंदिता दासचं रोमँटिक होणं नि त्याचं बोअर होणं. तिच्या टिपिकल हिंदी सिनेमांना उत्तर म्हणून त्याने 'जॅकी चॅन' असं मोघम उत्तर देणं... या प्रसंगातून जावेदने आपलं 'पुरुषी' आणि बायकोमध्ये रस नसणार पात्र फार छान उभं केलं. 'थ्री इडियट्स' मधला त्याचा रणछोडदास चांचड पण सुरुवातीला राग आणून नंतर सहानुभूती मिळवून जातो. 'हंड्रेड डेज' मध्ये पण एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राची भूमिका त्याने छान वठवली होती. त्याची कारकीर्द ऐंशीच्या दशकात घडली. ते दशक एकूणच सिनेमाच्या इतिहासात सगळ्यात सुमार मानलं जात. त्याचा फटका त्याला बसला. त्याला आव्हानात्मक भूमिका कधी मिळाल्याच नाहीत. जावेद जाफ़रीच्या आवाजाला एक मस्त खर्ज आहे. एकदम आतून बोलल्यासारखा आवाज येतो त्याचा. तो उत्कृष्ट गायक पण आहे. 'बॉम्बे बॉईज' मधलं त्याचं 'कस काय, बर काय, आय एम मुंबई' हे फंकी गाणं ऐकलं तरी त्याच्या आवाजाची रेंज कळते. आयुष्याच्या एका टप्प्यात कॉमेडी भूमिकांनी त्याच्या करियरची सेकन्ड इनिंग्ज सुरु झाली. तो कॉमेडी भारी करतोच. शेवटी जगदीपचा पोरगा आहे. पण मला तरी त्याला कॉमेडी भूमिकांमध्ये बघायला जीवावर येत. सर्कसमधल्या एखाद्या मस्त कलाकाराला विदूषकाचे कपडे चढवून रिंगमध्ये पाठवायचा प्रकार वाटतो. अर्शद वारसीबद्दल पण कधी कधी हेच वाटत. अफाट क्षमता असून पण आपण या लोकांचं काय करत आहोत असं वाटतं. मध्यंतरी येऊन गेलेल्या 'शौर्य' नावाच्या पिक्चरमध्ये पणे त्याने लाजवाब अभिनय केला होता. त्याला स्वतःच ऍक्टिंग कॅलिबर सिद्ध करता येण्यासारखा एक चित्रपट मिळावा ज्यात तो मध्यवर्ती भूमिकेत असेल अशी फार इच्छा आहे. पण जे गेल्या पंचवीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार? पण अभिनय, डबिंग, गाणं, डान्स यापलीकडे पण जाऊन पण जावेद हा एक खूप चांगला आणि सुलझा हुआ माणूस आहे . त्याच्या राजकीय जाणिवा पण प्रगल्भ आहेत. समाजात काही तरी बदल आपण घडवावेत अशी त्याची तळमळ आहे. काठावर बसून पाण्यात पाय बुडवून बसण्यापेक्षा त्याने सरळ राजकारणात उडी घेतली. 2014 च्या निवडणुकीत त्याने आम आदमी पक्षातर्फे लखनौ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. ती पण राजनाथ सिंग यांच्यासारख्या मोठ्या नेत्याविरुद्ध. तो निवडणूक हारला. पण प्रचारादरम्यान त्याने केलेली अप्रतिम भाषण गाजली. अतिशय सुधारक मुस्लिम आणि देशप्रेमी असणारा जावेद त्याच्या भाषणातून हिंदू -मुस्लिम ऐक्यावर एक अतिशय सुंदर कविता वाचवून दाखवायचा. सध्याच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात जावेद सारख्या लोकांची किती गरज आहे हे अधोरेखित करणारी ही कविता. जावेदच्या संवेदनशील मनाची चुणूक देणारी ही कविता. नफरतों का असर देखो,जानवरों का बंटवारा हो गया गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया  ये पेड़ ये पत्ते ये शाखें भी परेशान हो जाएं  अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाएं सूखे मेवे भी ये देखकर परेशान हो गए  न जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए जिस तरह से धर्म रंगों को भी बांटते जा रहे हैं  कि हरा मुसलमान और लाल हिंदुओं का रंग है तो वो दिन भी दूर नहीं जब सारी की सारी हरी सब्जियां मुसलमानों की हो जाएंगी  और हिंदुओं के हिस्से बस गाजर और टमाटर ही आएगा अब समझ नही आ रहा कि तरबूज किसके हिस्से जाएगा ये तो बेचारा ऊपर से मुसलमान और अंदर से हिंदू रह जाएगा.”