गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2017 07:45 AM (IST)
गुलशन कुमार हा दिल्लीमधल्या फळविक्रेत्याचा मुलगा. ते अतिशय महत्त्वाकांक्षी होते. 'आपला जन्म फळं विकण्यासाठी झालेला नाही', यावर त्यांचा पुरेपूर विश्वास होता. त्यांनी दिल्लीत स्वस्तात कॅसेट विकण्याचं दुकान सुरु केलं. हे छोटं दुकान म्हणजे टी सीरिजच्या भावी साम्राज्याचा पाया होता. गुलशन कुमार यांनी चांगल्या आणि वाईट अर्थाने कॅसेट विक्रीच्या धंद्यात क्रांती आणली. गुलशन कुमारचा धंदा खरा बहरला तो भजन आणि तत्सम धार्मिक संगीताची निर्मिती करुन.
चित्रपट संगीताच्या दृष्टिकोनातून नव्वदचं दशक अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण होतं. व्हिनस, टिप्स, टी सिरीज, मॅग्नासाउंड अशा अनेक कॅसेट उत्पादन करणाऱ्या म्युझिक कंपनीज मार्केटमध्ये होत्या. त्या काळात चित्रपट संगीताला अनन्यसाधारण महत्त्व होतं. चित्रपटांच्या उत्पन्नाचा जवळपास अर्धा हिस्सा संगीताच्या विक्रीतून मिळायचा. चित्रपटाच्या कॅसेट्सवर त्या वेळेच्या रसिकांच्या उड्या पडायच्या. चित्रपटाचा हिरो नक्की होण्याअगोदर संगीत दिग्दर्शक बोर्डवर यायचा, यावरून त्या काळात संगीत दिग्दर्शकांचं महत्त्व किती वाढलं होतं, ते समजून येतं. या म्युझिक कंपन्या अतिशय आक्रमकपणे स्वतःच्या संगीताचं प्रमोशन करायच्या. नुकतीच तेजीत येऊ लागलेली खासगी चॅनेल्स आणि रेडिओ यावरुन हे आक्रमक प्रमोशन व्हायचं. नव्वदच्या दशकात वाढलेल्या मुलांना हे आक्रमक प्रमोशन आठवत असेल. पहिले त्या कंपनीचा लोगो यायचा, मग त्याची विशिष्ट सिग्नेचर ट्यून वाजायची आणि नंतर गाण्यांचे ट्रेलर दाखवले जायचे. अमिताभ बच्चनचा डॉन सिनेमा हा त्याच्या जबरदस्त डॉयलॉग्जमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे . मात्र या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे डॉन हा पहिला असा चित्रपट होता ज्याच्या ऑडियो कॅसेट्स मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या होत्या. ऑडियो कॅसेटच आगमन ही त्या काळातली मोठी क्रांती होती. कॅसेटमध्ये गाणी भरुन पुन्हा इरेज करुन पुन्हा भरण्याची सोय होती. आणि मुख्य म्हणजे हे काम तुम्ही घरच्या घरी करू शकत होता. कालबाह्य होत चाललेल्या रेकॉर्ड्समध्ये ही सोय नव्हती. या क्रांतीचे परिणाम काय होतील याचा अंदाज म्युझिक इंडस्ट्रीमधल्या बड्या बड्या धेंडांना नव्हता. पण दिल्लीमधल्या पहाडगंजमध्ये राहणाऱ्या एका गरीब पण प्रचंड महत्वाकांक्षी असणाऱ्या चुणचुणीत तरुणाला आला होता. गुलशन कुमार हा दिल्लीमधल्या फळविक्रेत्याचा मुलगा. ते अतिशय महत्त्वाकांक्षी होते. 'आपला जन्म फळं विकण्यासाठी झालेला नाही', यावर त्यांचा पुरेपूर विश्वास होता. त्यांनी दिल्लीत स्वस्तात कॅसेट विकण्याचं दुकान सुरु केलं. हे छोटं दुकान म्हणजे टी सीरिजच्या भावी साम्राज्याचा पाया होता. गुलशन कुमार यांनी चांगल्या आणि वाईट अर्थाने कॅसेट विक्रीच्या धंद्यात क्रांती आणली. गुलशन कुमारचा धंदा खरा बहरला तो भजन आणि तत्सम धार्मिक संगीताची निर्मिती करुन. बऱ्याचदा या भजनांच्या व्हिडीओमध्ये गुलशन कुमारच हातात पूजेची आरती घेऊन भजनाला स्वतःचा चेहरा देताना दिसायचे. या व्हिडिओजमुळे गुलशन कुमारचा चेहरा घराघरात माहित झाला. ही भजनं जुन्या हिट गाण्यांच्या चालीवर बेतलेली असत. कॉपीराईट कायद्यात त्या वेळी असणाऱ्या पळवाटांचा गुलशन कुमारने पुरेपूर वापर केला. त्याचबरोबर त्याने ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘आशिकी’ असं ओरिजिनल हिट संगीत असणाऱ्या चित्रपटांची निर्मितीही केली. भारतातल्या घराघरात कॅसेट संस्कृती पोचवण्याचं श्रेयही गुलशन कुमारलाच जातं. यशाचा शिड्या चढताना गुलशनकुमार यांना कुठलाही मार्ग निषिद्ध नव्हता. त्यावेळेस देशात आखाती देशातून भारतात आलेल्या ब्लँक कॅसेट्सची किंमत होती अवघी सात रुपये. त्या कॅसेटमध्ये स्वतःच्याच कंपनीने घेतलेल्या सिनेमांचे गाणे भरुन कुठल्याही लेबलशिवाय गुलशनकुमार त्या कॅसेट बाजारात आणायचे. इतर प्रस्थापित म्युझिक कंपन्यांपेक्षा या कॅसेट अतिशय स्वस्त असायच्या. लेबल नसल्यामुळे टॅक्स देण्याचं बंधन नव्हतं. शिवाय कॉपीराईट कायद्यातल्या पळवाटांचा पुरेपूर वापर करुन इतर कंपन्यांची गाणी पण ते आपल्या कॅसेट्समध्ये वापरत. या काळात टी सीरिजने माकुल पैसा कमावला. त्या काळात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला ऑन द स्पॉट पकडणे कायद्यानुसार आवश्यक होते. गुलशनकुमारसारखी हस्ती अशी रेड हॅन्ड पकडली जाणं अशक्य होतं. या विचित्र नियमामुळे एच एम व्ही सारखी त्यावेळेसची मातब्बर कंपनी हात चोळत बसण्याशिवाय काहीच करु शकत नाही . पण सगळ्यांमधून गुलशन कुमार यांनी बरेच शत्रू तयार करुन घेतले होते. पण अनेक नवीन गायकांना इंडस्ट्रीमध्ये लिफ्ट मिळवून देण्याचं श्रेय पण निर्विवादपणे गुलशन कुमार यांना द्यावं लागत. कुमार सानू, सोनू निगम, बाबला, अनुराधा पौडवाल ही काही चटकन आठवणारी नाव. गुलशन कुमार यांनी आपल्या धाकट्या भावाला किशन कुमारला हिरो म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आकाश पाताळ एक केलं. 'गुलशन कुमार पेश करते है एक सजीला नौजवान' ही टॅगलाईन वापरुन ट्रेलर सुरु व्हायचे आणि किशनकुमार च्या वेगवेगळ्या भावमुद्रा (?) दाखवणारी गाणी लागायची. त्याला भारतभूषण, प्रदीप कुमार या आद्य ठोकळ्यांप्रमाणेच काही चांगली गाणी मिळाली. पण मुळातच आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार. त्याचा एक पण पिक्चर चालला नाही. पण मला त्याचा 'पापा दी ग्रेट' नावाचा एक पिक्चर चक्क आवडला होता. स्वतःच्या पोराच्या नजरेत सुपरहिरो असणाऱ्या पण प्रत्यक्षात अतिशय घाबरट असणाऱ्या माणसाची भूमिका त्याने त्यात केली होती. अभिनयाशी आलेला हा त्याचा पहिला आणि शेवटचा संबंध. गुलशन कुमारच्या हत्येनंतर त्याने पडद्याआड जाण पसंत केलं. भाऊबंदकी टाळून पुतण्याच्या हाती टी सिरीजची धुरा देऊन बॅक सीटवर बसणं पसंद केलं. आता टी सिरीजच्या व्यवस्थापक मंडळात तो आहे. आशिकी टु सारख्या चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये सह-निर्माता म्हणून नाव दिसत त्याचं कधी कधी. गुलशन कुमार टिप्स आणि व्हिनस या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त किमतीत कॅसेट विकत असे. कितीही ठरवलं, तरी बाकी कॅसेट कंपन्या या बाबतीत टी सिरीजची बरोबरी करू शकत नव्हत्या. टिप्सचे तौराणी आणि व्हिनसचे जैन खानदानी उच्चभ्रू होते. दिल्लीहून आलेला एक फळविक्रेत्याचा पोरगा त्यांना आव्हान देत असल्याचं त्यांना खुपत होतं. शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी चेन्नईच्या एका पॉश पंचतारांकित हॉटेलमध्ये म्युझिक इंडस्ट्रीमधले सगळे दिग्गज जमले होते. तिथे त्यांनी गुलशन कुमार यांना हे किंमतीचं युद्ध थांबवण्याची विनंती केली. नाहीतर इतरांना धंदा करणं अशक्य झालं असतं, असं सांगून अजिजीही केली. गुलशन कुमार यांनीही त्यांच्या विनंतीचा विचार करण्याचं आश्वासन दिलं, पण नंतर काहीच दिवसांनी गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या झाली. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई नदीम-श्रवणमधल्या नदीमवर आणि टिप्सच्या तौराणीवर झुकली. अंडरवर्ल्डशी संधान साधून त्यांनी ही हत्या घडवल्याचा आरोप झाला. हुसेन झैदीच्या पुस्तकानुसार अबू सालेम या गँगस्टरने ही हत्या घडवून आणली होती. गुलशन कुमारकडून अबू सालेमच्या ज्या आर्थिक अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यास गुलशन कुमार यांनी सरळ सरळ नकार दिल्यामुळे त्याने ही हत्या केली, असं त्याचं विश्लेषण समोर येतं. कारणं काहीही असोत, पण गुलशन कुमार यांच्या खळबळजनक हत्येने फिल्म म्युझिक इंडस्ट्रीचा सगळा लँडस्केप कायमचाच बदलून गेला. काही दिवसांपूर्वीच टी सिरीजने एका चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन 'जॉली एल एल बी'फेम सुभाष कपूर करणार आहे आणि मुख्य भूमिकेत असणार आहे अक्षय कुमार! ही मुख्य भूमिका असणार आहे, टी सिरीजचे संस्थापक दिवंगत गुलशन कुमार यांची. त्याचे रक्ताचे नातेवाईकच निर्माते असल्यामुळे हा बायोपिक ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा तयार करणाऱ्या बॉलिवुडच्या इतर बायोपिकसारखाच असणार, हे सांगण्याची गरज नाहीच. असो. गुलशनकुमार म्हटलं की, दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. पहिली म्हणजे, 'आशिकी'सारख्या चित्रपटातून त्यांनी आणलेलं नव्वदच्या दशकातलं संगीताचं सुवर्णयुग. दुसरी म्हणजे, ते जिथे नेहमी पूजेला जात त्या मंदिरासमोर अंडरवर्ल्डने केलेली त्यांची निर्घृण हत्या. हुसैन झैदीच्या 'डोंगरी ते दुबई' या पुस्तकातल्या एका प्रकरणात या हत्येचं थरकाप उडवणारं वर्णन आहे. गुलशन कुमार यांच्या अतरंगी गोष्टीतले संगीताचे सूर आणि बंदुकीच्या गोळ्या, यांचं जालीम मिश्रण त्यांना एक आदर्श बायोपिक व्यक्तिमत्त्व बनवतं, हे बाकी खरं! मात्र भारतीय चित्रपटसृष्टीचा वेळोवेळी आढावा घेणाऱ्या चित्रपट-रसिकांना या चित्रपटाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा कालखंड आठवेल, हे नक्की.