मी काही दिवसांपूर्वी सिक्कीमला फिरायला गेलो होतो. तिथे एका दुर्गम भागात हॉटेलमध्ये उतरलो होतो. तिथे जगाशी जोडणारी संपर्क साधनं फारशी नव्हती. मोबाईलची पण रेंज फार कमी होती. पण त्या हॉटेलच्या उबदार रूममध्ये तुमचा जगाशी संपर्क पूर्णपणे तुटणार याची काळजी घेणारा टीव्ही सेट होता. चॅनल्स फार कमी दिसत होती. पण एका चॅनलवर 'नरसिम्हा ' सिनेमा दिसला आणि मी थबकलो. 'नरसिम्हा' सिनेमा हा त्याकाळी बराच हिट झाला होता. हा तोच काळ होता ज्यावेळेस सनी देओल अमिताभ बच्चनच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली 'अँग्री यंग मॅन' ची पोकळी भरून काढत होता. 'नरसिम्हा'च्या एक वर्षी आधी येऊन गेलेल्या राजकुमार संतोषीच्या 'घायल' मध्ये सनीने बलवंत राय या समाजात सभ्यतेचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या पण शहरात बेकायदेशीर धंद्याचं साम्राज्य चालवणाऱ्या अतिशय क्रूर आणि धोकादायक माणसाशी लढा दिला होता. नंतर एकाच वर्षानंतर आलेल्या 'नरसिम्हा' मध्ये तरुणांना शास्त्रासारखं वापरुन फेकून देणाऱ्या बापजी (ओम पुरी ) या राजकारण्याविरुद्ध सनीचा नायक उभा ठाकला होता. 'नरसिम्हा ' हा आपल्या उर्मिला मातोंडकरचा नायिका म्हणून पहिला सिनेमा हा पण एक संदर्भ होताच. पण माझा आवडता सिनेमा असल्याने मी 'नरसिम्हा' पुन्हा बघितलाच. सिक्कीमच्या दऱ्याखोऱ्यात बहुतेक पहिल्यांदाच ओम पुरीचा घनगंभीर आवाज आणि सनी पाजीचा पहाडी आवाज घुमला असावा. पण हा सिनेमा बघितल्यावर मनात प्रश्न आला की 'नरसिम्हा' आणि कित्येक हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक एन. चंद्रा गेला तरी कुठं? बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारे लोक अज्ञातवासात अंतर्धान पावण्याची अनेक उदाहरण आहेत. एन. चंद्रा हे नाव त्या लोकांच्या यादीतच आहे का? नावावरून एन. चंद्रा हा कुणी दाक्षिणात्य माणूस असावा असं अनेकांना वाटण्याची शक्यता आहे. पण एन. चंद्रा उर्फ चंद्रशेखर नार्वेकर हा अस्सल मराठमोळा माणूस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ठसा उमटवणारी मराठी दिग्दर्शक मंडळी फार कमी आहेत. आशुतोष गोवारीकर, शांताराम, मधुर भांडारकर आणि इतर काही तुरळक लोक. एन.चंद्रा हे याच मांदियाळीतलं एक नाव. नव्वदच्या दशकामध्ये कार्यरत असणाऱ्या या दिग्दर्शकाने हिंदी सिनेमाचा लँडस्केप बदलून टाकणाऱ्या काही फिल्म्स बनवल्या आहेत. 'अंकुश', 'प्रतिघात', 'तेजाब', 'नरसिम्हा', 'वजुद' असे अनेक हिट आणि हार्डहीटिंग सिनेमे एन. चंद्रा या दिग्दर्शकाने दिले. हिंदी सिनेमाला नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर सारखे कलाकार मिळाले ते एन. चंद्रामुळेच. अमिताभ बच्चन राजकारणात उतरल्यानंतर तो आपसूकच चित्रपटांपासून दूर गेला. अमिताभ बच्चनच्या अनुपस्थितीमध्ये निर्माण झालेली 'अँग्री यंग मॅन' आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नायकाची पोकळी नंतर राजकुमार संतोषी आणि सनी देओल या दिग्दर्शक -अभिनेता जोडगोळीने भरून काढली. पण ही पोकळी भरून काढण्याची प्रक्रिया सुरु केली एन. चंद्राने. त्याचा 'अंकुश' हा सिनेमा एकूणच मैलाचा दगड समजला जातो. चार बेरोजगार तरुण, एक अतिशय ध्येयहीन आयुष्य जगत असतात. त्यांच्या शेजारी अनिता आणि तिची आई राहायला येते आणि या चार बेरोजगारांचं आयुष्यच बदलून जातं. अनिता आणि तिच्या आईच्या सात्विक चांगुलपणामुळे ह्या चौघांच्या आयुष्यात एक सकारात्मक आमूलाग्र बदल घडून येतो. पण असं काही घडत की हे चार बेरोजगार न्याय मिळवण्यासाठी कायदा हातात घेतात. 'अंकुश ' सिनेमा हा बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न असण्याच्या काळात तुफान चालला. अनपेक्षितपणे चालला.  सिनेमात एक पण ओळखीचा चेहरा नव्हता. नाना पाटेकर तेंव्हा कुणाला पण माहित नव्हता. 'अंकुश' बनवण्यासाठी एन. चंद्राला प्रयत्नांची शर्थ करावी लागली. निर्मात्याकडचे सिनेमे संपल्यामुळे एन. चंद्रालाच पैशांची तजवीज करावी लागली. चंद्राने आपले घर, बायकोचे आणि बहिणीचे दागिने गहाण ठेवले. 'अंकुश' आपटला असता तर चंद्राचा कारभार तिथेच आटोपला असता. पण प्रेक्षकांनी 'अंकुश'ला तुफान प्रतिसाद दिला. विशेषतः तरुण वर्गाने. त्या काळात 'अंकुश' चं पोस्टर पण लोकांना आवडलं होतं. चार रागावलेले तरुण हातात चेन घेऊन रस्त्यांवर धावत आहेत असं ते पोस्टर होतं. अनेक बेरोजगार तरुणांना सिनेमातल्या पात्रांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. 'अंकुश' ने दोन गोष्टी घडल्या. एक तर बॉलीवूडला चंद्राच्या रूपाने नव्या दमाचा लेखक-दिग्दर्शक मिळाला. दुसरं म्हणजे नाना पाटेकर नावाचं रत्न आहे हे महाराष्ट्राबाहेर पण इतर भाषिकांना कळलं. आता आश्चर्य वाटेल पण नाना पाटेकरचा रोल सर्वप्रथम रविंद्र महाजनी यांना ऑफर करण्यात आला होता .चंद्रावर गुलजारच्या 'मेरे अपने' चा प्रभाव होता आणि रविंद्र महाजनी आणि विनोद खन्ना यांच्या व्यक्तिमत्वात काही साम्यस्थळं होती, हे यामागचं कारण. पण पैशांवरून व्यवहार फिस्कटला आणि नाना पाटेकर नावाचा नवोदित अभिनेता सिनेमात आला. पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. व्यवस्थेकडून आणि व्यवस्थाबाह्य घटकांकडून सर्वमान्य जनतेचं होणार दमन हा विषय एन.चंद्राच्या सिनेमात पुन्हा पुन्हा येतो. त्याचा पुढचा 'प्रतिघात ' पण याच विषयावर होता. एका मध्यमवर्गीय शिक्षिकेने एका 'डॉन' विरुद्ध दिलेला लढा असं या सिनेमाचं कथासूत्र होत . या सिनेमात चंद्राचा लकी मॅस्कॉट नाना एका वेड्या माणसाच्या भूमिकेत होताच. एन. चंद्राचा पुढचा सिनेमा असा होता की ज्यावरून तो आयुष्यभर ओळखला जाणार होता. सिनेमाचं नाव 'तेजाब'. 'तेजाब' हा बॉलिवूडमधला एक मैलाचा दगड होता. या सिनेमातून बॉलीवूडला पुढची सुपरस्टार मिळाली. माधुरी दीक्षित. माधुरीने पदार्पण जरी 'अबोध' मधून केलं असलं तरी ती प्रेक्षकांच्या आणि निर्मात्यांच्या नजरेत आली ती 'तेजाब' पासूनच. 'एक दो तीन ' या गाण्यामधून माधुरी कसल्या कॅलिबरची डान्सर आहे हे लोकांना समजलं. ज्याच्यावर दिग्दर्शक डोळे झाकून विश्वास ठेऊ शकतो तो अनिल कपूर महेश देशमुख उर्फ मुन्नाच्या मध्यवर्ती भूमिकेत होता. त्याच्या भूमिकेला अँग्री यंग मॅनच कोंदण होतंच. 'तेजाब' म्हणजे हिट फिल्मची परफेक्ट रेसिपी होती. चांगले कलाकार, सुपरहिट संगीत, घट्ट पटकथा, हमखास टाळ्या मिळवणारे संवाद, पटकथेत असलेली रोमान्स, विनोद, अॅक्शनची भेसळ हे सगळे घटक 'तेजाब' मध्ये जमून आले होते . माधुरी आज पण एन .चंद्राला गोल्डन ब्रेक दिल्याबद्दल मनापासून मानते .त्यामुळेच चंद्राचा व्यवसायिकदृष्ट्या ठीक चाललं नसताना आणि त्याच्यावर फ्लॉप दिग्दर्शकाचा ठप्पा लागल्यावर पण तिने त्याच्यासोबत 'वजुद ' केला . चंद्राचा पुढचा सिनेमा 'नरसिम्हा ' पण बॉक्स ऑफिसवर चालला . त्या सिनेमात पण खलनायकाच्या साम्राज्याविरुद्ध आवाज उठवणारा नायक होताच . पण हा सिनेमा गाजला तो वेगळ्या कारणाने . ओम पुरीने साकारलेला खलनायक हा बाळासाहेब ठाकरेंसारखा दिसतो आणि बोलतो अशी कुजबुज एका वर्तुळात सुरु झाली . नंतर हा प्रवाद वेगाने पसरला . त्यामुळे चित्रपटाला काही वादविवादांना सामोरे जावे लागले . इथून पुढे मात्र चंद्राच्या सिनेमांना बॉक्सऑफिसवर उतरती कळा लागली . त्याचे 'युगंधर ' , 'तेजस्विनी ' , 'हमला ' बेकाबु ' 'वजुद ' हे सिनेमे ओळीने फ्लॉप गेले . फ्लॉप गेला असला तरी 'वजुद ' हा एक उत्कृष्ट सिनेमा आहे हे मान्य करावं लागतंच . 'वजुद ' मधले नाना पाटेकर आणि हेमू अधिकारी यांच्यादरम्यानचे सीन्स अंगावर काटा आणतात . 'शिकारी ' सिनेमात गोविंदाला नकारात्मक भूमिकेत दाखवण्याचा चंद्राचा प्रयत्न पण प्रेक्षकांना फारसा पसंद पडला नाही . ओळीने अनेक सिनेमे फ्लॉप गेल्यावर एन चंद्राने रणनीती बदलली . त्याच्या 'स्टाईल' चे ट्रेलर बघून अनेक चित्रपटपंडितांना आश्चर्याचा धक्काच बसला . आपल्या हार्डहीटिंग विषयांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्राने चक्क एक 'आउट अँड आउट ' कॉमेडी बनवली . या सिनेमाने बॉलीवूडला शर्मन जोशीच्या रूपाने एक अतिशय चांगला अभिनेता मिळाला . शर्मनने 'गॉडमदर ' सिनेमातून पदार्पण केलं असलं तरी त्याला यशाची चव मिळाली ती 'स्टाईल ' मुळेच . चंद्राला विनोदाचं उत्कृष्ट अंग आहे हे 'स्टाईल ' मुळे लक्षात आलं . सिनेमाला प्रेक्षकांचा विशेषतः तरुणांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला . 'स्टाईल ' नंतर आलेला 'एस्क्युज मी ' पण प्रेक्षकांच्या पसंदीस आला . पण हे यश शेवटचंच ठरलं . नंतर चंद्रा पुन्हा  आपल्या हार्डहीटिंग सिनेमाकडे 'कगार' आणि 'ये मेरा इंडिया ' सिनेमातून वळला . पण प्रेक्षकांनी हे सिनेमे नाकारले .चंद्राचा शेवटचा सिनेमा येऊन दशक उलटलं आहे . चंद्राच्या सर्व सिनेमांमध्ये मराठी आणि गुजराती रंगभूमीवरच्या कलाकारांचा भरणा असायचा . चंद्राला थियेटर आर्टिस्टबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर होता . नाना पाटेकरपासून ते शर्मन जोशीपर्यंत ही यादी आहे . चंद्राच्या सिनेमात मध्यवर्ती पात्र अनेकदा हमखास मराठीच असत . मेनस्ट्रीम हिंदी सिनेमात सातत्याने मराठमोळं वातावरण दाखवणारे सिनेमे बनवणारा चंद्रा हा बहुतेक एकमेव दिग्दर्शक असावा . अन्यायी जुलमी व्यवस्थेविरुद्ध उभं राहिलेला नायक -नायिका ही थीम चंद्राच्या अनेक सिनेमांमधून आढळते .नंतर नंतर त्याचा थोडा अतिरेकच झाला . चंद्राने अनेक गुणवत्तावान मराठी अभिनेत्यांना आपल्या सिनेमातून ब्रेक दिला .हिंदी सिनेमामध्ये  कारकीर्द करून पण आपलं मराठीपण सतत जपलं ही कौतुकास्पद बाब आहे . काळाचा बदलता प्रवाह चंद्रासारख्या चतुरस्त्र दिग्दर्शकाला का  कळला नाही याचं आश्चर्य वाटत . २००१ सालानंतर प्रेक्षकांच्या आवडी निवडी बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली असं मानलं जात . चंद्रा आणि अजून कित्येकांना या बदलत्या ट्रेंडचा अंदाजच आला नाही . तिथंच त्यांच्या 'आऊटडेटेड ' होण्याची सुरुवात झाली असावी . पण एन चंद्रा बॉलिवूडच्या इतिहासात एक अढळ स्थान पटकावून आहे खरं . त्याने इंडस्ट्रीला नाना पाटेकर , माधुरी दीक्षित , उर्मिला मातोंडकर , शर्मन जोशी सारखे कलाकार दिले म्हणून नाही . चंद्राने नेहमी आपल्या सिनेमातून सर्वसामान्य माणसांच्या समस्यांना वाचा फोडली . सर्वसामान्य माणसाला मोठ्या पडद्यावर आवाज मिळवून दिला . फार कमी दिग्दर्शकांना हे इतक्या चांगल्या प्रकारे जमत . सर्वसामान्य जनतेचा कैवार घेणाऱ्या लोकांचा इंडस्ट्रीमध्ये आणि बाहेरपण मोठ्या प्रमाणावर तुटवडा असताना सध्याच्या काळातली एन .चंद्राची अनुपस्थिती खूप खटकते . - अमोल उदगीरकर