जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2017 09:58 AM (IST)
'वो तो है अलबेला ' हे गाणं परिवारातील ब्लॅक शीप असणाऱ्या आणि सतत घरातल्याच्या लोकांसाठी शिव्या खाणाऱ्या कुठल्याही मुलासाठी आत्मचरित्रात्मक असू शकत .'येस बॉस ' सिनेमातलं 'चांद तारे तोड लाऊ ' हे गाणं तर मध्यमवर्गीयांच्या आशा आकांक्षांचे राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करायला हरकत नाही .
शाहरुख खानच्या फुललेल्या आणि बहरलेल्या कारकिर्दीच श्रेय यश चोप्रा , करण जोहर , आदित्य चोप्रा , कुंदन शाह आणि अजून काही लोकांना दिल जात . पण माझ्या मते त्या यादीत अजून एक नाव ऍड करायला हवं . अनेकांना ते नाव आश्चर्यकारक वाटण्याची शक्यता आहे . काही लोकांना ते नाव न पटण्याची शक्यता पण आहे . ते नाव आहे जतिन -ललित या संगीतकार जोडगोळीचं . कस ते स्पष्ट करतो . त्यासाठी शाहरुखचा उदय ज्या काळात होत होता त्या काळाच विश्लेषण करण्याची गरज आहे . शाहरुख म्हणजे भारतीय सिनेमामधल्या कथांवरचा अगोदरच पुसट होत चाललेला नेहरूवियन समाजवादाचा पगडा पूर्ण पुसून जागतिकीकरणाची हाळी देणारा नायक. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती कुठलीही किंमत देऊन मिळवलीच पाहिजे, मग भले त्यासाठी मूल्य-तत्त्व यांना सोडचिठ्ठी द्यायला लागली तरी हरकत नाही, अशी बंडखोर नायक ही शाहरुखची खासीयत. 'राजू बन गया जंटलमन', ‘कभी हा कभी ना' आणि 'यस बॉस'सारख्या चित्रपटांतून त्याने जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर उदयाला आलेल्या मध्यमवर्गाला अपिल केलं. ‘यस बॉस’ चित्रपटातलं शाहरुख खानचं ‘बस इतनासा ख्वाब है’ हे गाणं तत्कालीन मध्यमवर्गाच्या उमलत्या इच्छा-आकांक्षांचं यथार्थ वर्णन करतं. ‘राजू बन गया जंटलमॅन’मधला शाहरुख खान श्रीमंत आणि यशस्वी तर व्हायचंय, पण मूल्यांची कास सोडायची नाहीये, या टिपिकल मध्यमवर्गीय गुंतावळ्यात अडकलेला दिसतो. 'कभी हा कभी ना'मध्ये अॅना आऊट ऑफ लीगमध्ये आहे हे माहीत असूनही तिला प्राप्त करण्यासाठी धडपड करणारा नायक सर्वसामान्य लोकांना अपील होणारा होता. शाहरुखच्या या फेजमधल्या बहुतेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक जतिन -ललित होते . करियरच्या या फेजमध्येच आपल्या आशा आकांक्षांना चेहरा देणारा शाहरुख मध्यमवर्गीयांचा डार्लिंग बनला . या चित्रपटांमधली गाणी आणि त्यांचं मध्यमवर्गीयांना असणार अपील हा एक संशोधनाचा विषय आहे . 'राजू बन गया जंटलमन' चित्रपटात छोट्या शहरातला नायक मोठ्या शहरात 'बडा आदमी ' बनण्यासाठी जात असतो . तो मोठ्या शहराला जायला निघाला असताना त्याचे मित्र आणि पूर्ण गाव त्याला निरोप द्यायला आलेलं असत . त्यावेळेस एक गाणं चित्रपटात आहे , त्या गाण्याचे शब्द मुळातूनच ऐकण्यासारखे आहेत . 'दिल है मेरा दिवाना यारो मै तो चला मेरी मंजिल दूर है , पर जाना तो जरूर है ए दोस्तो अलविदा 'कभी हा कभी ना'मध्ये अॅना आऊट ऑफ लीगमध्ये आहे हे माहीत असूनही तिला प्राप्त करण्यासाठी धडपड करणारा नायक सर्वसामान्य लोकांना अपील होणारा होता.त्यातली जतिन ललितची गाणी एकाहून एक सरस होती . 'वो तो है अलबेला ' हे गाणं परिवारातील ब्लॅक शीप असणाऱ्या आणि सतत घरातल्याच्या लोकांसाठी शिव्या खाणाऱ्या कुठल्याही मुलासाठी आत्मचरित्रात्मक असू शकत .'येस बॉस ' सिनेमातलं 'चांद तारे तोड लाऊ ' हे गाणं तर मध्यमवर्गीयांच्या आशा आकांक्षांचे राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करायला हरकत नाही . 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' मधून शाहरुख खानची जी रोमँटिक हिरोची सेकंड इनिंग सुरु झाली त्यामध्ये पण जतिन ललित या जोडगोळीचा महत्वाचा वाटा होता . 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ', 'कुछ कुछ होता है ', 'चलते चलते ' या रोमँटिक सिनेमांच्या प्रकृतीला मानवेल असं सुमधुर संगीत जतिन ललितने दिले . त्यामुळेच शाहरुखच्या कारकिर्दीतून जतिन ललित वजा केले तर एक मोठी पोकळी मागे उरते . शाहरुखला पण जतिन ललितच्या कामगिरीची कल्पना होतीच . जेंव्हा त्याने निर्माता म्हणून आपला पहिला सिनेमा 'फिर भी दिल है हिंदुस्तानी 'करायला घेतला तेंव्हा त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून जतिन ललितलाच घेतलं . आमिरच्या कारकिर्दीत मैलाचा दगड असणारा 'जो जिता वो ही सिकंदर ' असणारा चित्रपट लोकप्रिय होण्यात जतिन ललितच्या संगीताचा महत्वाचा वाटा होता . अक्षय कुमारचा पहिला मोठा हिट असणारा 'खिलाडी ' पण जतिन ललितचाच . जतिन ललित यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेंव्हा बॉलिवूडमध्ये नदीम श्रवण , आनंद मिलिंद , दिलीप सेन समीर सेन इत्यादी संगीतकार जोड्या अगोदरच प्रस्थापित होत्या . पण या भाऊगर्दीत पण जतिन ललित स्वतःची छाप सोडण्यात यशस्वी झाले . जतिन ललितची गाणी ज्यावेळेस बाजारात येऊ लागली त्यावेळेस अनेकांना त्यांची गाणी आर डी बर्मनची गाणी आहेत असा गैरसमज व्हायचा . जतिन ललितच्या संगीत शैलीवर आणि संगीत संयोजनावर आरडीचा सहज जाणवणारा ठसा होता . जतिन ललितचा व्यवसायिक संगीतकार म्हणून पहिला चित्रपट होता 'यारा दिलदारा '. चित्रपट फ्लॉप असला तरी त्यातलं संगीत गाजलं . विशेषतः 'बिन तेरे सनम मर मिटेंगे हम ' हे सगळ्यात लोकप्रिय गाणं तर आज पण लोकांच्या लक्षात आहे . 'यारा दिलदारा ' नंतरचा महत्वाचा पिट स्टॉप म्हणजे 'जो जिता वो ही सिकंदर '. दिग्दर्शक मन्सूर खानच्या चित्रपटाच्या संगीताच्या यशाने सगळे उच्चांक मोडले . त्यातलं 'पहेला नशा पहेला खुमार 'गाणं हे पहिल्या वहिल्या प्रेमाला दिलेलं सगळ्यात व्यवसायिक ट्रिब्यूट असावं . जतिन ललितची हिट गाणी सगळ्यांनाच माहित आहेत . मला इथं रस आहे त्यांच्या तुलनेने कमी लोकप्रिय असणाऱ्या पण अतिशय कर्णमधुर मेलोडियस गाण्यांवर प्रकाश टाकण्यात . 'पांडव ' नावाच्या सिनेमात 'कसम है प्यार की तुझे ' ही सुलक्षणा पंडित आणि कुमार सानूने गायलेलं गाणं तुम्ही आवर्जून एकाच . 'फिर भी दिल है हिंदुस्तानी ' या सिनेमात अलका याज्ञीक आणि अभिजीतने गायलेलं 'और क्या ' हे गाणं त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मधुर रोमँटिक गाणं असावं . 'जो जिता वो ही सिकंदर ' मध्ये त्यांनी एक सॅड सॉंग कंपोज केलं होत . 'रुठ के हमसे कभी जब चले जाओगे तुम '. आपल्या चुकीमुळे हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोठ्या भावाला उद्देशून लहान भाऊ हे गाणं म्हणतो . हे गाणं निव्वळ अप्रतिम आहे . 'फरेब ' नावाचा विक्रम भट्टचा सिनेमा आहे . त्यात आपल्या मिलिंद गुणाजीने खलनायकी भूमिका केली आहे . त्यातलं उदित नारायणच 'ओ हमसफर ' आवर्जून एकाच . विक्रमच्याच 'गुलाम ' मधलं 'अब नाम मोहोब्बत के ' पण असच न गाजलेलं रत्न आहे . माझ्यासाठी तरी या फारशा लोकप्रिय नसलेल्या गाण्यातले जतिन ललित जास्त आवडते आहेत . संगीतकार जोडीमध्ये फाटाफूट होणं ही काही नवीन गोष्ट नाही . नदीम श्रवण , दिलीप सेन समीर सेन , शंकर जयकिशन या जोड्या मतभेदांमुळे कालांतराने फुटल्या . पण या वरील जोड्या फुटल्या तेंव्हा त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती . जतिन ललितच वेगळेपण हे की जेंव्हा त्यांची जोडी फुटली तेंव्हा ते यशाच्या शिखरावर होते . त्यांचा जोडी म्हणून असणारा शेवटचा चित्रपट 'फना ' आणि त्याच संगीत सुपरहिट होत . ही जोडी फुटू नये म्हणून जतिन ललित सोबत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' आणि 'मोहोब्बते ' सारखे सुपरहिट संगीत देणाऱ्या आदित्य चोप्राने जीवतोड प्रयत्न केले . पण जतिन आणि ललित मधली मतभेदांची दरी इतकी वाढली होती की ती सांधण अशक्य बनलं होत . असं बोललं जात की त्यांच्यामध्ये ही दरी पडायला 'स्त्री कलह ' कारणीभूत होता . या दोघांच्या बायकांमध्ये इतकी भांडण होती की नाईलाजाने त्यांना वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागला . वेगवेगळं झाल्यावर या दोघांनाही स्वतंत्र छाप मुळीच पाडता आली नाही . या दुर्दैवी फाटाफुटीमुळे जतिन आणि ललित यांचं नुकसान झालंच पण चित्रपट चाहत्यांचे पण खूप नुकसान झाले आहे . मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेम आपल्या संगीतातून व्यक्त करणारे संगीत दिग्दर्शक विरळेच . जतिन ललित निव्वळ या कारणांमुळे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अमर होतील .