'हम आपके है कौन' आणि आपली बदललेली लग्न
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2018 11:59 AM (IST)
इन फॅक्ट, नवरदेवाचे बूट चोरले जाण्याचा सोहळा होत नाही, तोपर्यंत लग्नाचा उत्सव पूर्ण होतो यावर हल्ली कुणाचा विश्वास बसतचं नाही. ह्या प्रथेने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यात कधी शिरकाव केला असावा? या प्रश्नाचं उत्तर १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कौन' सिनेमापाशी येऊन थांबत असावं.
परवा एक बातमी वाचण्यात आली. बहुतेक बीड जिल्ह्यातली असावी. एका लग्नात नवरदेवाचे बूट लपवण्यावरून लग्नमंडपातच वधू आणि वर पक्षाकडच्या लोकांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन, त्यात चक्क नवरदेवाचंच डोकं फुटलं. हल्ली महाराष्ट्रामधल्या सर्व लग्नांमध्ये नवरदेवाचे बूट लपवण्याची प्रथा सुरु झाली आहे . ही प्रथा काही वर्षांपूर्वी फार मोजक्या ठिकाणी होती. पण या प्रथेला आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळाली आहे. इन फॅक्ट, नवरदेवाचे बूट चोरले जाण्याचा सोहळा होत नाही, तोपर्यंत लग्नाचा उत्सव पूर्ण होतो यावर हल्ली कुणाचा विश्वास बसतचं नाही. ह्या प्रथेने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यात कधी शिरकाव केला असावा? या प्रश्नाचं उत्तर १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कौन' सिनेमापाशी येऊन थांबत असावं. सूरज बडजात्याच्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अनेक विक्रम मोडले. 'हम आपके है कौन' मुळे झालेली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडची लग्न कायमसाठी बदलून गेली. लग्नांमधल्या मराठमोळ्या प्रथा कायमसाठीच बॅकसीटला गेल्या. इतकंच काय लग्नात बॅंडवाले वाजवत असणारी गाणी पण बदलली. लग्नातल्या जेवणातले खाद्यपदार्थ पण बदलले. लग्न सोहळ्यात सिनेमामुळे होणारे सामाजिक-आर्थिक -धार्मिक (प्रथांच्या अनुषंगाने ) होणारे बदल हा फार रोचक विषय आहे. 'हम आपके है कौन' हा या बदलातला महत्वाचा टप्पा आहेच, पण त्याखेरीज 'मान्सून वेडिंग', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', राजश्रीचाच 'विवाह' यशराजचा 'बँड बाजा बारात ' आणि इतरही अनेक चित्रपटांचा या प्रक्रियेत मोठा वाटा आहे. १९९१ साली सुरु झालेल्या जागतिकीकरणाच्या आणि आर्थिक उदारीकरणानंतरच्या प्रक्रियेनंतर भारताची इतर देशांशी आणि जगातल्या इतर संस्कृतींच्या जवळ जाण्याची प्रक्रिया सुरु झालीच. पण भारतासारख्या खंडप्राय आणि शेकडो संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या देशात वेगवेगळ्या भाषिक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यांच्या पण एकमेकांच्या जवळ येण्याची प्रक्रिया सुरु झाली. १९९१ सालानंतर लोकांच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विस्थापित होण्याची प्रक्रिया अजूनच जोमात सुरु झाली. याला देशात बदललेलं अर्थकारण कारणीभूत होत . बॉलिवूड सिनेमाचा प्रभाव देशाच्या इतर भागात वाढत जाण्याचा पण हाच काळ . त्यामुळे उत्तर भारतीय संस्कृती आणि प्रथा मोठ्या प्रमाणावर इतर भाषिक समूहांमध्ये शिरकाव करू लागल्या. हिंदी -पंजाबी संस्कृतीचा बॉलिवूडवर असणारा मोठा पगडा याला प्रसिद्ध समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी 'पंजाबायझेशन ' असं नाव दिलं होत . बॉलिवूड सिनेमातून हिंदी -पंजाबी संस्कृतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांवर झाला . बॉलिवूडचे सिनेमे आवडीने पाहणारे महाराष्ट्र हे राज्य याला अपवाद ठरण्याचं काही कारण नव्हतंच . मराठी मुलखातल्या लग्नांचा बदललेला तोंडावळा ही हिंदी सिनेमांचीच देणं आहे . 'हम आपके है कौन ' हा काही माझा स्वतःचा आवडता सिनेमा नाही . पण त्या सिनेमाने लोकांवर आणि त्यांच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या घटनेवर (लग्नावर ) झालेला परिणाम नाकारण्यात अर्थ नाही . 'हम आपके है कौन ' मध्ये स्टोरीटेलिंग दुय्यम आहे . चित्रपटाचा बहुतेक भाग लग्नसराई आणि इतर उत्सवांमध्ये घडतो .या सिनेमाची काही लोकांनी तीन तासाची लग्नाची व्हिडीओ कॅसेट अशी संभावना पण केली होती . हा चित्रपट आला तेंव्हा मी दहा किंवा बारा वर्षाचा असेल . त्या सिनेमात मी सर्वप्रथम 'जुते छुपाना ' हा प्रकार पाहिला . या प्रथेवर सिनेमात 'जुते दो पैसे लो ' हे गाणं पण होत . त्यानंतर महाराष्ट्रातल्या लग्नांमध्ये पण हा प्रकार झाला जो काही तुरळक अपवाद वगळता यापूर्वी पूर्णपणे अनुपस्थित होता . या सिनेमाची सुरवातच मुळी मोहनीश बहेल आणि रेणुका शहाणे यांच्या पात्रांच्या 'अरेंज मॅरेज ' ठरण्यापासून होते . मग दोन्ही पक्षांचे लोक लग्नातल्या रीतीभाती , परंपरा ,प्रथा कशा आनंदाने साजरे करतात यावर चित्रपटाचा फोकस होता . या सिनेमात काय नव्हतं ? 'मेहेंदी ' ची प्रथा (ही प्रथा पण आपल्याकडच्या लग्नांनी दत्तक घेतली आहे ), संगीत , गाणं बजावणे , वधूपिता आणि वराची आई यांच्यात लाजत -काजत होणार फ्लर्टींग , आणि बरच काही . फ्लर्टींगचा अपवाद वगळता बाकी साऱ्या प्रथा मराठी लोकांनी अंगिकारल्या आहेत . फ्लर्टींग पण काही काळानंतर अवतरलं तर आश्चर्य वाटायला नको . हिंदी सिनेमांच्या प्रभावाने आपली लग्न कशी बदलली ? सर्वप्रथम लग्नातला मराठी पोशाख , वस्त्र प्रावरण पूर्ण बदलली . पूर्वी लग्नात नवरे मंडळी धोतर , सफारी आणि डोक्यावरून पाणी म्हणजे ब्लेझर घालायची . आता त्याची जागा शेरवानी , कुर्ता यांनी घेतली आहे . नववधू सहावारी किंवा नऊवारी घालण्यापेक्षा लेहेंगा , दुपट्टे , चोली घालणं पसंद करू लागल्या . हम आपके है कौन मध्ये 'दुल्हे की सालियो , हरे दुपट्टे वालियो ' असं एक गाणं होत . लग्नाच्या मांडवात एक फेरफटका मारला तरी या हिरवळीचा प्रत्यय येतो . 'बूट लपवण्याच्या ' प्रथेबद्दल तर काही बोलायलाच नको . माझ्या एका बंगाली मित्राने सांगितलं होत की त्यांच्या लग्नात पण ही प्रथा सुरु झाली आहे . इतर राज्य पण याला अपवाद नसावीत . वेडिंग प्लॅनर ही संकल्पना 'बँड बाजा बारात ' या सिनेमानंतर आपल्याकडे वाढीला लागली . ती पूर्वी अस्तित्वात होती पण एका मर्यादित वर्तुळात . आता अनेक उच्च मध्यमवर्गीय परिवारांमधील लग्नामध्ये पण वेडिंग प्लॅनर दिसतात . एकूणच मागच्या दोन दशकांमध्ये 'वेडिंग इकॉनॉमी ' नावाचा एक प्रकार उदयाला आला आहे , हे मान्य करावं लागत . 'साथिया ' सिनेमानंतर प्रियकर -प्रेयसीने घरच्यांना कल्पना न देता , जवळच्या मित्र मैत्रिणीच्या साक्षीने गांधर्व विवाह करायचा आणि आपापल्या घरीच राहायचं असलं फॅड आलं होत . ते फॅड लवकरच विरून गेलं . लग्नांमध्ये बॅंडवाले वाजवत असणारी गाणी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो . या गाण्यांमध्ये नेहमीच हिंदी गाण्यांचा बोलबाला होता . पण काही मराठी गाणी पण वाजायची . आता बॅंडवाले वाजवत असणाऱ्या गाण्यांमधून मराठी गाणी जवळपास नामशेष झाली आहेत , असं म्हणलं तरी हरकत नाही . आता पंजाबी ढंगाच्या ,कुडिये , सोनिये अशा शब्दांचा भडीमार असणाऱ्या गाण्यांचा बोलबाला आहे . लग्नातल्या जेवणावळी हा प्रकार नामशेष होऊन बुफे हा प्रकार अस्तित्वात आला आहे . जेवणात पण मराठमोळे पदार्थ (जिलेबी , मठ्ठा , मसालेभात आदी ) बॅकफूटला गेले असून लग्नातल्या जेवणात कॉन्टिनेन्टल , पंजाबी , चायनीज पदार्थाची रेलचेल असते . अनुपमा चोप्रा यांनी मांडलेली 'पंजाबायझेशन ' ची प्रथा पूर्णत्वाला गेली आहे आणि यात त्यात बॉलिवूडच्या सिनेमांनी मोठा वाटा उचलेला आहे . पण हे स्पष्ट करायला हवं की बदलाची प्रक्रिया ही नेहमीच अपरिहार्य असते . आणि ती अनेकदा फायदेशीर पण असते . उदाहरणार्थ जेवणावळींमध्ये जेवढं जेवण वाया जात तेवढं बुफेमध्ये जात नाही . त्यामुळे बदलाच्या प्रक्रियेबद्दल तक्रार करण्यात काही अर्थ नाही .ते अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता जास्त आहे . बदल हे समाजासाठी आवश्यकच असतात . नाहीतर समाजाचं साचलं डबकं होण्याची शक्यता वाढते . सिनेमाने आपल्या लग्नांमध्ये घडवलेल्या बदलांकडे पण आपण सकारात्मकतेनं बघायला हवं . पण जुनी संस्कृती /प्रथा लयाला जाण पण दुःखद आहे . आपण एखाद नवीन घर घेतो , पण आपल्या जुन्या घरात आपला जीव अडकलेला असतोच . हे काहीस तसंच आहे . सिनेमाचा समाजावर परिणाम किती आणि कसा होतो यावर अनेकदा चर्चेचे आखाडे रंगतात . सिनेमाचा समाजावर परिणाम होतो असा युक्तिवाद करणारा वर्ग आणि असा काही परिणाम होत नाही असं मांडणारा वर्ग , आक्रमक युक्तिवाद करतात . पण समाज सिनेमातून जे सोयीस्कर आहे तेवढंच स्वीकारतो असं एक मध्यममार्गी विधान करता येईल . त्याला सिनेमातून दिले जाणारे सामाजिक -राजकीय संदेश अवलंबण्यात फारसा रस नाहीये . पण लग्नांसारख्या महत्वाच्या पण तितक्याच निरुपद्रवी गोष्टींमध्ये तो सिनेमाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो . महाराष्ट्रातल्या लग्नांचा बदललेला तोंडावळा हे या विधानांची यथार्थता सिद्ध करत . रोमँटिक सिनेमे स्त्रियांच्या अपेक्षा वाढवून ठेवतात , आणि पॉर्न सिनेमे पुरुषांच्या असं एक विधान विनोदाने केलं जात . आपल्या लग्नविषयक अपेक्षा सिनेमाने अवास्तव वाढवून ठेवल्या आहेत असं एक उपविधान वरील विधानाला जोडलं तर कुणाची हरकत नसावी . संबंधित ब्लॉग :