एखादी कलाकृती सार्वकालिक आणि महान असते म्हणजे काय याचा एक निकष आहे. ती कलाकृती जगभरातल्या इतर कलाकारांना भुरळ पाडते आणि ते आपल्या परीने त्या कलाकृतीची 'वर्जन्स ' तयार करतात. फ्रेंच मूळ असणारी सिंड्रेलाची परीकथा जगभरात लोकप्रिय झाली आणि त्याच्या स्थानिक आवृत्त्या तयार झाल्या. शेक्सपियरच्या 'रोमियो ज्युलिएट ' ची असंख्य वर्जन्स जगभरात तयार झाली. एकच घटना प्रत्येकाच्या नजरेतून वेगळी असू शकते असं सांगणारा 'राशोमान' च्या वेगवेगळ्या आवृत्त्या जगभरात आहेत. इतरही अशा अनेक कलाकृती आहेत. 'गॉडफादर ' हे या सार्वकालिक महान कलाकृतींच्या प्रभावळीतलं अजून एक नाव. मारियो पुझोच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या प्रेमात पडलेला नाही असा चित्रपटप्रेमी सापडणं मुश्किल. हा सिनेमा आवडणारा पण तो तितका महान नाही असं वाटणारा एक अति-अति अल्पसंख्य वर्ग आहे. मी या वर्गात मोडतो. मला स्वतःला गॉडफादर हा इतरांना महान वाटतो तितका महान सिनेमा वाटत नाही. त्यामागची कारण काय याचा उहापोह करण्याची ही जागा नाही. पण 'गॉडफादर' बद्दल मला जरी काही reservations असली तरी जगभरातल्या लोकांवर आणि कलाकारांवर 'गॉडफादर ' चा जो प्रभाव आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही.

जगात जिथं जिथं चित्रपट बनतात तिथं तिथं 'गॉडफादर' चं देशी वर्जन बनलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना पण ते आवडलेलं आहे. यातूनच 'गॉडफादर' कलाकृतीला वैश्विक अपील आहे हे सिद्ध होत. 'गॉडफादर' मध्ये नायक आणि खलनायक यांच्यामध्ये एक छोटी रेघ आहे. सगळ्या पात्रांना ग्रे शेड्स आहेत. 'गॉडफादर ' चं वेगळेपण की जगात कुठल्याही महत्वाच्या घटनांमध्ये, मग त्या कुठल्याही क्षेत्रांमधल्या असो त्यात 'गॉडफादर' च्या छटा आढळतात. मग ती राजकीय पक्षांमधली सुंदोपसुंदी असो वा औद्योगिक घराण्यातली भाऊबंदकी. 'गॉडफादर' त्या अर्थाने सर्वव्यापी आहे. अशीच दुसरी सर्वव्यापी कलाकृती म्हणजे महाभारत. काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर लक्षात येत की भाऊबंदकी, विश्वासघात, पुत्रप्रेम, वारसायुद्ध याबाबतीत दोन्ही कलाकृतींमध्ये आश्चर्य वाटावीत इतकी साम्य आहेत. गॉडफादर आणि त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा प्रभाव, गॉडफादरमधून उद्योजकांनी काय शिकायला हवं यासारखे रिसर्च पेपर आजही ठराविक अंतराने प्रकाशित होत असतात. बॉलिवूड किंवा एकूणच भारतीय चित्रपटसृष्टी कथानक, संगीत याबाबत अनेकदा बाहेरच्या कलाकृतींकडे बघून 'inspire' होतात हे एक उघड सत्य आहे . 'गॉडफादर' ची पण अनेक भारतीय रूपांतरण झाली आहेत.

'गॉडफादर' चा भारतीय सिनेमावरचा प्रभाव दोन पातळ्यांवर आहे. एक तर कथानकाच्या पातळीवर.आणि दुसरं म्हणजे दृश्यभाषेवर. रामगोपाल वर्माचा 'सरकार', फिरोज खानचा 'धर्मात्मा' आणि दिलीप कुमार यांचा 'विधाता' ह्यांच्या कथानकावर उघडच 'गॉडफादर' चा प्रभाव आहे. विधू विनोद चोप्राचा 'परींदा', कमल हसनचा 'नायकन ' (आणि त्याचं हिंदी रुपडं असणारा 'दयावान ' पण ), रामूचाच 'सत्या' आणि 'रक्तचरित्र' किंवा अनुराग कश्यपचा 'गँग्ज ऑफ वासेपूर' वर 'गॉडफादर' चा जाणवण्याइतपत प्रभाव आहे . वरकरणी पाहता 'गॉडफादर ' ही एका अपराध जगतावर राज्य करणाऱ्या घराण्याची गोष्ट वाटू शकते. पण गॉडफादरमधून तत्कालीन अमेरिका आणि अमेरिकन समाजावर भाष्य केलं आहे. अमेरिकेत पोटापाण्यासाठी विस्थापित झालेले इतर देशाचे आणि वंशाचे लोक, त्यांच्या समस्या, त्यातल्या अनेकांचं इच्छा नसताना गुन्हेगारीकडे ओढलं जाण, तत्कालीन अमेरिकन समाजाची मूल्यव्यवस्था , त्यावेळेस रुजत चाललेली भांडवलशाही अशा अनेक गोष्टी 'गॉडफादर ' मध्ये दिसतात. रामूच्या 'सत्या' ने पण हे केलं आहे. परिस्थितीमुळे 'सत्या ' च गुन्हेगारी विश्वात ढकलणं जाण , बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यातले जवळचे संबंध , राजकारणी आणि गुन्हेगार यांचं सहअस्तित्व , मुंबईतलं एकूणच अस्थिर आणि सर्वच पातळ्यांवर असुरक्षित बनलेलं मानवी आयुष्य याच्यावर 'सत्या' मार्मिक भाष्य करतो.

'परींदा ' हा अतिशय अप्रतिम चित्रपट असला तरी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रावर असणारा 'गॉडफादर इफेक्ट ' लपून राहत नाही. नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ यांच्यावर चित्रित झालेले काही प्रसंग उदाहरणार्थ बघता येतील. 'परींदा ' मध्ये केलेलं माफिया टोळ्या आणि त्यांच्या कार्यपध्दतीच चित्रण यावर कपोलोच्या दिग्दर्शनाचा प्रभाव जाणवतो. काही वर्षांनंतर 'परिंदा' चा इंग्रजी रिमेक 'ब्रोकन हॉर्सेस ' विधू विनोद चोप्राने बनवला त्यावेळेस तोच कार्यकारी निर्माता घेतला जो 'गॉडफादर ' चा पण कार्यकारी निर्माता होता. हा योगायोग नसावा. कल्ट तयार झालेल्या 'गँग्ज ऑफ वासेपूर ' च्या दुसऱ्या भागावर पण गॉडफादरचा प्रभाव आहे. रक्तरंजित पारिवारिक संघर्षामध्ये अनपेक्षित वारसदाराने पुढं येणं हा या दोन कलाकृतींमधला समान दुवा . प्रकाश झा या दिग्दर्शकाचा 'राजनीती ' हा सिनेमा महाभारत आणि 'गॉडफादर ' यांचं हुशारीने केलेलं मिश्रण आहे. मायकेल कोरलॉन आणि रणबीर कपूरने रेखाटलेल्या पात्रांमध्ये अनेक पातळ्यांवर साधर्म्य आहेत. पोलीस ऑफिसर हॉस्पिटलमध्ये रणबीर कपूरला थोबडवतो तो प्रसंग तर गॉडफादरमधल्या प्रसंगाची लगेच आठवण करून देतो. रागीट , रागात सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसणारा , मोठा भाऊ अर्जुन रामपालने रंगवला आहे त्यावर पण 'गॉडफादर ' मधल्या मायकेलचा मोठा भाऊ असणाऱ्या सॉनीचा प्रभाव आहे. एका चित्रपट समीक्षकाने 60% महाभारत , 30% गॉडफादर आणि 10% भारतीय राजकारण असं 'राजनीती ' चं चपखल वर्णन केलं होत . प्रियदर्शनचा 'विरासत ' हा स्टोरीटेलिंग वर 'गॉडफादर ' चा प्रभाव असणारा अजून एक चांगला सिनेमा. 'विरासत ' ज्या कमल हसनच्या 'थेवर मगन ' वरून घेतला आहे त्यावरच गॉडफादरचा न पुसता येणारा प्रभाव आहे. कमल हसन हे उघड उघड मान्य करतो . पण 'गॉडफादर'च सर्वोत्कृष्ट भारतीय रूपांतरण 'सरकार ' च असावं. 'गॉडफादर ' च्या माफिया टोळ्यांच्या पार्श्वभूमीची जागा इथे मराठी माणसाच्या राजकारणाने घेतली आहे. बच्चनच्या पात्रावर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसून येतो. अभिषेक बच्चन आणि केके मेननच्या पात्रांवर पण मायकेल आणि सॉनीचा प्रभाव आहे. बच्चन समोरच्या पक्षाची ड्रग्ज विकण्याची ऑफर नाकारतो तो तर उघडच 'गॉडफादर ' मधल्या प्रसंगावरून घेतला आहे.

1991 साली येऊन गेलेल्या मणिरत्नम दिग्दर्शित आणि कमल हसन अभिनित 'नायकन ' वर 'गॉडफादर' चा प्रभाव आहेच . पण मणिरत्नम हे नेहमीच नाकारत आलाय . 'नायकन ' मधल्या पात्रांची पाळंमुळं घट्टपणे तमिळ संस्कृतीमध्ये रुजली आहेत असा त्याचा युक्तिवाद आहे. पण सिनेमाचा नायक असणारा कमल हसन मात्र 'नायकन ' वर असणारा 'गॉडफादर' चा प्रभाव उघडपणे मान्य करतो. मणिरत्नम हे उघड नागडं सत्य का नाकारतो हे त्याच त्यालाच माहित. वर वर पाहता 'दलपती ' चं कथानक दुर्योधन आणि कर्णाच्या घनिष्ट मैत्रीवर आधारित आहे. पण सिनेमाच्या दृश्यभाषेमध्ये 'गॉडफादर अंडरकरण्ट ' आहेच. नुकतंच मणिरत्नमच्या 'चेका चिवनथा वानम ' चं ट्रेलर प्रदर्शित झालं. आणि पुन्हा या सिनेमावर असणाऱ्या 'गॉडफादर' च्या प्रभावाबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या. तो प्रभाव कितपत आणि कसा आहे हे सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या दिवशीचं कळेल.

'गॉडफादर ' चं आकर्षण भारतीय प्रेक्षकांना आणि कलाकारांना का असावं याबद्दल माझी एक थियरी आहे. भारतीयांना एकूणचं , वर्चस्वासाठी चालणारा रक्तरंजित संघर्ष , मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर बघायला आवडतो. त्याला जर धार्मिक किंवा कोणत्याही तत्वज्ञानाची डूब असली तर हे आकर्षण श्रद्धेमध्ये परावर्तित होत. भारतीयांना अपराध जगताच आणि त्यांच्या हातात एकवटलेल्या समांतर शक्तिस्थानांचं प्रचंड आकर्षण असतं .कुठल्याही वर्तमानपत्रात क्राईम बीटच्या बातम्या सर्वाधिक आवडीने वाचल्या जातात. 'गॉडफादर ' हे सगळं आपल्याला देत. केवळ आपल्याच देशात असं आहे असं नाही. रोजच दैनंदिन प्रश्नांशी झगडणाऱ्या सर्वच देशांमध्ये गॉडफादर लोकप्रिय आहे. जोपर्यंत जगात समांतर सत्तास्थळ , प्रचलित व्यवस्थेवर लोकांचा अविश्वास , वर्चस्वासाठीचा रक्तरंजित संघर्ष होत राहील तोपर्यंत 'गॉडफादर ' ची वर्जन्स बनतच राहतील. यातच 'गॉडफादर ' चं वैश्विक अपील सामावलेलं आहे.