देश जितका भूमी, नद्या, जंगल, यांनी बनतो तितकाच किंबहुना जास्तच माणसांमुळे बनतो. आणि त्या माणसांच्या विचारसरणी देशाचे भवितव्य निश्चित करतात. कुठल्याही देशातली सिनेमा इंडस्ट्री पण याला अपवाद नाहीत. इंडस्ट्रीमध्ये काम करणारी माणसं सर्जनशील असतातच पण अनेकदा ती कुठल्यातरी राजकीय विचारसरणीने पण प्रभावित असतात. सृजनशीलता आणि राजकीय विचारसरणी प्रेरित मन हे एक स्फोटक कॉकटेल आहे. एखादा कलाकार जरा बहुसंख्यांच्या विरोधात असला तर त्याला खूप त्रास होण्याची शक्यता वाढते. चीन, इराण, उत्तर कोरिया यासारख्या देशात हे होतंच पण लोकशाही देश म्हणून घेणारी राष्ट्र पण याला अपवाद नसतात. महान अभिनेता चार्ली चॅप्लिनला डाव्या विचारसरणीचा सहानुभूतीदार म्हणून अमेरिकेमध्ये खूप त्रास झाला. आपल्याकडे मध्यंतरी शाहरुख खान आणि आमिर खान यांनी काही राजकीय मते मांडली तर त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. भारतीय चित्रपटसृष्टी ही एका कोलाजसारखी आहे. इथे वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे लोक काम करत असतात आणि त्यांच्या विचारसरणीचं प्रतिबिंब त्यांच्या सिनेमात पडत असतं. विचारसरणीचं हे वैविध्य आपल्यासारख्या देशाला साजेसं असंच आहे. आपल्या देशाच्या चित्रपटांकडे नजर टाकली तर त्यात समाजवाद, साम्यवाद, द्रविडियन चळवळ, राष्ट्रवाद असे अनेक प्रवाह दिसतात. भारतीय चित्रपटसृष्टी हे एक पात्र असेल तर या प्रवाहांनी हे पात्र उजळून टाकलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाच्या एका मोठ्या कालखंडावर साम्यवादाचा मोठा प्रभाव जाणवतो. देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकप्रिय नेहरूंवर पण समाजवादाचा प्रभाव होता. स्वातंत्र्योत्तर काळात भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यावर भारतात सिनेमा-सृष्टीत असा एक मोठा वर्ग होता ज्याच्यावर साम्यवादाचा वैचारिक पगडा होता. साम्यवादाचे आणि शेतकरी-कामगार क्रांतीचे रोमँटिक स्वप्न पाहणारा हा वर्ग होता. बी.आर. चोप्रा यांच्या 'नया दौर'मध्ये मशीन विरुद्ध माणूस संघर्षाला चेहरा देणारा शंकर किंवा 'दो बिघा जमीन'मध्ये स्वतःची जमीन वाचवण्यासाठी रक्तभात ओकणारा बलराज सहानींचा शंभू महातो ही माईलस्टोन पात्र त्यावेळेसच्या कलाकारांच्या डाव्या प्रेरणांचे चेहरे आहेत. बलराज साहनी आणि ए. के. हंगल सारखे अभिनेते तर कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सभासद होते. देशभरातल्या अनेक चळवळींमध्ये त्यानी सक्रिय सहभाग घेतला होता. कैफी आझमी, बी. आर. चोप्रा, ख्वाजा अहमद अब्बास, मेहबूब खान, राजकुमार संतोषी, सुधीर मिश्रा ही अजून काही उदाहरणे. ही यादी विस्तारभयास्तव अजून लांबवत नाही. पण साम्यवाद आणि चित्रपटांचं अद्वैत सगळ्यात जास्त कुठे जाणवत ते मल्याळम चित्रपटसृष्टीत. केरळ हा साम्यवादाचा बालेकिल्ला राहिला आहे. आता पण देशभरात साम्यवादाची पडझड होत असताना केरळात कम्युनिस्ट पक्षच सत्तेवर आहे. इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टींमध्ये राजकीय विषयांवरचे चित्रपट काढण्याचं प्रमाण कमी असताना मल्याळम सिनेमा मात्र मोठ्या प्रमाणावर राजकीय सिनेमे बनवतो. प्रेम नाझर आणि मामुटीसारखे आजी-माजी सुपरस्टार जाहीरपणे कम्युनिझमचे समर्थन करतात. तमिळ चित्रपटांना द्रविडीयन चळवळीने मोठ्या प्रमाणात प्रभावित केले होते. त्यावर तमिळ प्रादेशिक राष्ट्रवादाचा प्रभाव पण आढळून येतो. द्रविडीयन चळवळीमधून आलेल्या करुणानिधी, एमजीआर आणि जयललिता या लोकांनी तामिळनाडूचे राजकारण स्वतःभोवती फिरवत ठेवण्यात यश मिळवले आहे. द्रमुकसारखा द्रविडीयन चळवळीचा कट्टर समर्थक पक्ष चित्रपटनिर्मितीमध्ये सहभागी आहे. एखादा राजकीय पक्ष पक्षमूल्यांच्या प्रचारासाठी चित्रपटनिर्मितीमध्ये उतरतो ह्याच हे विरळा उदाहरण. शुजीत सरकार दिग्दर्शित राजीव गांधी हत्येवर आधारित चित्रपट ‘मद्रास कॅफे’च्या प्रदर्शनाला तामिळनाडू राज्यात जोरदार विरोध झाला होता. कारण, त्यामध्ये त्यांच्या मते, प्रभाकरन या ‘तामिळ ईलम’साठी लढा देणाऱ्या नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होतं. राजीव गांधी यांची निर्घृण हत्या घडवून आणणाऱ्या प्रभाकरनबद्दल देशात संतापाची भावना असली, तरी तामिळनाडूमध्ये त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे, हे एक उघड गुपित आहे, अगदी करुणानिधी यांचा द्रमुक हा पक्षसुद्धा ‘प्रो-प्रभाकरन’ होता. मागच्याच वर्षी श्रीलंकेच्या लष्कराने निर्घृणपणे ज्याची हत्या केली होती, त्या प्रभाकरनच्या लहान मुलावर तामिळनाडूमध्ये चित्रपट आला होता. हिंदुत्ववाद हा या देशातला अजून एक राजकीय विचारसरणीचा सशक्त प्रवाह आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी ह्या विचारसरणीला पडद्यावर आणणारे चित्रपट फारसे दिसत नाही. म्हणजे इथे 'जय संतोषी माँ' सारखे चित्रपट अपेक्षित नाहीत तर मुस्लिम विरोध, आरक्षण विरोध असे हिंदुत्ववादाचे वैचारिक पैलू मांडणारे चित्रपट आणि हिंदुत्ववादी नेत्यांचं उदात्तीकरण करणारे चित्रपट अपेक्षित आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर सुधीर फडके यांच्या 'वीर सावरकर' सारखे चित्रपट. हिंदुत्ववादाचे धुरीण असणारा भारतीय जनता पक्ष एकूणच सर्व प्रकारच्या माध्यमांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण सिनेमा ह्या माध्यमात काही तुरळक हिंदुत्ववादी सोडता या विचारसरणीची फारशी उपस्थिती जाणवत नाही हे अंमळ रोचक आहे. याचं एक महत्वाचं कारण असं की एकूणच आपल्या देशाची एक मध्यममार्गी वृत्ती आहे जी कुठलंही एक टोक गाठण्याला कायमच नकार देते. शिवाय आपल्या देशात राष्ट्रवाद हा कायमच हिंदुत्ववादाला वरचढ राहिला आहे. किंबहुना असे म्हणता येईल की राष्ट्रवादाच्या तुलनेने अधिक व्यापक भावनेला हिंदुत्ववाद कधीच रिप्लेस करू शकला नाही. शिवाय पाकिस्तानला टार्गेट बनवणारे चित्रपट बघणं आपल्या प्रेक्षकांना जास्त भावतं. भ्रष्टाचार, पाश्चमात्य विचारसरणीचा युवा पिढीवर होणारा भला बुरा परिणाम, दहशतवाद अशा विषयांवर आपल्याकडे जास्त चित्रपट बनतात. हिंदुत्ववादाचे धुरीण असणारा राष्ट्रीय सेवक संघपण हिंदुत्व आणि राष्ट्रवाद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या अर्थाच्या वैचारिक भूमिका घेताना दिसतो. विविध विचारसरणीच्या चित्रपटांची निर्मिती होत राहणं हे आपल्या रसरशीत सुदृढ लोकशाहीच लक्षण आहे. पण हळूहळू प्रतिस्पर्धी विचारसरणीची मुस्कटदाबी करण्याची वृत्ती आपल्याकडे वाढत आहे. वृंदावनातल्या विधवांच्या दुरावस्थेचं चित्रण करणाऱ्या 'वॉटर ' चित्रपट हिंदुत्ववाद्यांनी बंद पाडला. प्रेषितावरच्या इराणी सिनेमाला संगीत दिलं म्हणून उलेमांनी ए. आर. रहमानच्या नावाने फतवा काढला. राजकीय विचारांना मागे टाकून धार्मिक विचार प्रबळ होत चालला आहे हे काही फारस चांगलं लक्षण मानता येत नाही. येता काळ अवघड आहे हे नक्की.