मिसळ खायला सुरुवात केल्याला पंचवीस वर्ष झाली ह्याच जून महिन्यात. ह्या कालावधीत महाराष्ट्रातल्या बऱ्यावाईट अशा साधारण ७००-८०० वेगवेगळ्या मिसळी अनेकदा खाऊन झाल्या. पूर्वी कुठेतरी वाचलेल्या एका लेखानंतर मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपून बसलेल्या, किमान एक मराठी पदार्थ आपण सातासमुद्रापार पोचवायच्या एका (बालिश म्हणा हवंतर) स्वप्नासाठी, पुण्यातून मिसळ महोत्सवाची सुरुवात केली. साधारण तेव्हापासून मिसळ ह्या विषयाचा खऱ्या अर्थाने गंभीरपणे अभ्यास सुरु झाला.

Continues below advertisement

मिसळ महोत्सवाच्या माध्यमातून, माझ्यासारख्याच अनेक रसिक मिसळप्रेमींशी संपर्क साधायची संधी मिळाली, जी खूप मोठी होती. गावोगावी मिसळ जॉईंट चालवणाऱ्या अनेक जणांशी घरबसल्या प्रत्यक्ष परिचय झाला.

आपण सुरु केलेल्या मिसळ महोत्सवाला भेट देऊन, त्यातून मिसळीची लोकप्रियता आणि महती ओळखून, साऊथ इंडियन किंवा इतर जॉईंट सुरु करायच्या ऐवजी मिसळीचे स्पेशालिटी जॉईंट सुरु केलेलेही अनेक जण भेटले,आजही भेटतात. अनेकांनी तर मिसळ महोत्सवातून प्रेरणा घेत आपापल्या गावीही मिसळ महोत्सव केले. ह्या सगळ्यातून ‘मिसळ’ह्या प्रकाराची चर्चा सबंध महाराष्ट्रात व्हायला लागली. ह्याचा फायदा म्हणजे पूर्वी रविवारी सकाळी उडप्याच्या हॉटेलात जाऊन नाश्ता करणाऱ्या अनेक फॅमेलीज, आता ठरवून वेगवेगळ्या मिसळ जॉईंटला भेट द्यायला लागल्या. ह्यातला अभिमान वगेरे बाजूला ठेऊन सांगतो की मराठमोळ्या मिसळीचे ‘कल्चर’ सुरु करण्यात मिसळ महोत्सवाचा मोठा हातभार लागला. त्या अर्थाने ही कल्पना यशस्वी झाली ह्याचा आनंद जास्ती आहे.

Continues below advertisement

मुळात मिसळ ह्या विषयाबद्दल आस्था असल्यानेच, आता स्वतःच्या मिसळीसह वेगळ्या मराठी पदार्थांचा 'फक्कड' हा इंस्टंट फुड्सचा ब्रॅंड मार्केटमधे असला, तरी इतरही अनेक गावातल्या वेगवेगळ्या मिसळींचा रस्सा मला आजही मनापासून आवडतो.

हा ब्लॉग लिहिताना, आपल्या निरनिराळ्या व्यवसायातल्या आणि व्यवस्थापनातल्या किंचीतश्या अनुभवाचा फायदा घेऊन जुन्या नव्या फूड जॉईंटची माहिती वाचकांना देण्याबरोबरच, मराठी खाद्यपदार्थांची चविष्ट परंपरा टिकवून ठेवणाऱ्या ह्या (उगाचच) छोट्या समजल्या जाणाऱ्या पण प्रामाणिक व्यावसायिकांमधील उद्योजकताही लोकांना दिसावी हा प्रामाणिक उदेश आहे.

लहानपणी सिझन बदलताना काही दिवस तोंडाला चव नसली, की आई काचेच्या बरणीत करून ठेवलेलं आलं, आवळ्याचं करून ठेवलेलं ‘पाचक’ द्यायची. जिभेची चव झटक्यात जाग्यावर यायची. वयानी मोठं झाल्यावर (आईच्या भाषेत शिंगं फुटल्यावर) तोंडाची चव गेल्यावर वेगवेगळ्या मिसळ खायला लागलो. सर्दी झाली खा मिसळ,जागरणानी डोकं जड झालंय? खा मिसळ. आजकाल तर कामाच्या व्यापात अनेक दिवस खाण्यावर आणि लिहायला फुरसत मिळत नसेल तरी मुद्दाम एखादया छानश्या मिसळीवर लिहायला सुरुवात करतो. लिहायचा मुडही आपोआपच जागेवर येतो. थोडक्यात माझ्यासाठी मिसळ म्हणजे,”औषध एक, उपचार अनेक” टाईप झालंय !

कट टू.. बाहेर पाऊस पडत असतो, रस्त्यावरच्या डांबराच्या गरम वाफा नाहीशा झालेल्या असतात. हवेच्या सुखद झुळूकीबरोबर कमी झालेल्या ट्रॅफिकच्या जाणीवेनी मनाला जास्तीच थंडावा मिळतो. अश्यावेळी(ही) मला मिसळीची आठवण होते. पूर्वी ह्या सुखद अनुभवात सन्नाट गाडी चालवत, कुठल्यातरी ‘रँडम’हायवेवर एखाद्या टपरीवर जाऊन मिसळ, भजी हाणायचो. पाच-सहा वर्षांपूर्वीच्या अशाच भटकंतीत एकदा खेड-शिवापूरजवळच्या वेळू गावात ‘साईछाया’ नाव दिसलं.

शिवापूरच्या जवळ त्यासुमारास “मटण-भाकरी” ची हॉटेल्स चांगलीच फॉर्मात आली होती, त्यात त्यावेळी पुण्यातही फारसा न दिसणारा ‘मिसळ हाऊस’चा बोर्ड दिसल्यावर “दिल गार्डन गार्डन हो गया”.

आत शिरलो तर चक्क काळ्या मसाल्याची मिसळ. मित्र होता एक बरोबर, दोघांनी दोन मिसळ मागवल्या तर मिसळीच्या प्लेट आणि पावासोबतच पापड, भेळेतल्या सारखा बारीक चिरलेला भरपूर कांदा, त्या जोडीला काकडी, टॉमॅटो सारख्या सॅलेडनी सजलेले भरगच्च ताटच समोर आलं. काऊंटरला पोरगेलासा एक मुलगा होता, मिसळ समोर आल्यावर त्याने अजून काही लागलं तर नक्की मागून घ्या असं अगदी आर्जवानी सांगितलं.

“एक्स्ट्रा रस्सा आणि कांद्याचे पैसे वेगळे पडतील”, छाप पुणेरी पाटी संप्रदायात वाढलेल्या माझ्यासारख्या मनुष्याला, अशा आर्जवाने पहिल्यांदा तर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या खाण्याच्या क्वालिटीविषयीच शंका उत्पन्न होते. पण मिसळीच्या मसालेदार, झणझणीत काळ्या रस्याच्या पहिल्या घासानी ती शंका परस्पर दूर केली.

हातचं न राखता घातलेल्या तेलावर परतलेला पारंपारिक घरगुती काळा मसाला आणि त्यात गावरान मटकीची वेगळी जाणवणारी चव ह्यांनी जिभेचा आणि मनाचा ठाव एकाचवेळी घेतला. मिसळीचा आस्वाद घेऊन झाल्यावर लाडक्या कॉफीचा मोठा मग समोर आला. हायवेवरच्या त्या छोटेखानी हॉटेलात,बाहेर सुरु असलेल्या पावसाच्या बॅकग्राऊंडवर मनमुराद गप्पांची मैफल रंगली नसती तरच नवल होतं. त्यादिवसापासूनच मी साईछायाच्या मिसळीचा चाहता झालो. निघताना त्या तरुण मालकाशी ओझरती ओळख झाली आणि त्याचं नाव मंगेश काळे आहे हे समजलं. त्या भागात अधूनमधून असलेल्या कामाच्या निमित्तानेही ‘साईछाया’ मध्ये जाणं व्हायला लागलं. पण मिसळ खाऊन झाल्यावर पैसे देण्यापलीकडे मंगेशशी परिचय वाढला नव्हता.

हळूहळू माझ्याही कामाचं स्वरूप बदलत गेलं, त्या बाजूला होणाऱ्या फेऱ्याही कमी झाल्या. त्या मिसळीची आठवण व्हायची पण साईछायाला भेट देणं राहून जायचं.

२-३ वर्षांपूर्वी फेसबुकवर साईछायाची एक शाखा टिळक रस्त्याला सुरु झाल्याची बातमी वाचली, सपोर्ट म्हणून फेसबुक पेजवगेरेही लाईक केलं, पण तिथे जाणं काही केल्या होत नव्हतं. त्यामुळे मिसळ महोत्सवाच्या कामांच्या गडबडीत येवढ्या छान मिसळीच्या सहभागाकरता विचारणं राहून गेल्याची रुखरुखही लागून राहिली.

नंतर कधीतरी टिळक रस्त्याच्या दुकानात गेलो.आधीच मराठी हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलच्या ‘ब्रँचेस’सुरु होणं हीच गोष्ट मुळात दुरापास्त. त्यातही ‘ब्रँचेस’ वाढणे आणि क्वालिटी कमी होत जाणं, ह्याची व्यस्त प्रमाणाची ख्याती जास्ती आहे. पण इथे मिसळीचा तोच दर्जा टिकलेला पाहून मनातून बरं वाटलं. गेल्याच वर्षी साईछाया, म्हात्रे पुलाजवळ सध्याच्या जागेत आलं आणि माझ्या तिथल्या फेऱ्या आणि मंगेशशी परिचय वाढत गेला. त्याच्या मिसळीच्या रेसिपीबरोबरच त्याच्यातला एक प्रामाणिक उद्योजकही समजत गेला, मनाला तो अधिकच भावला.

वेळू गावात हायवेवर रिकाम्या असलेल्या आपल्याच जागेवर आसपासच्या लोकांसारखं रसाचं गुऱ्हाळ, चहाकॉफीचं हॉटेल इतरांना चालवायला देऊन फक्त भाडं घेण्यात समाधान मानण्यापेक्षा मंगेशनी सकाळी पुण्यातून निघून कात्रजमार्गे कोल्हापूर, गोव्याला जाणाऱ्या लोकांच्या नाश्त्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. मिसळीच्या नावाखाली उगाचच (खोटी) कोल्हापुरी मिसळ देण्यापेक्षा, आपल्या स्वतःच्या गावातली काळ्या मसाल्याची चव ग्राहकांना दिली. फक्त मिसळ देण्यापेक्षा त्याच्याबरोबर तोंडी लावायला तळलेला पापड, जवळच्या शेतातून उपलब्ध होणारी ताजी सॅलेड द्यायला सुरुवात केली. मिसळ झाल्यावर कॉफीचा मग द्यायला सुरुवात केली. उन्हाळ्यात ग्राहकांना मिसळ, कॉफीबरोबरच सोलकढी, ताक, आता तर काही मॉकटेल्सचाही ऑप्शन असतो. पण सगळ्यात मुख्य म्हणजे आल्यागेल्या ग्राहकांना सौजन्यपूर्ण सर्व्हिस दिली जाते.

जेजुरीला आपल्या मामाच्या हॉटेलात उमेदवारी करून मिळालेल्या अनुभवाचा मंगेशला प्रचंड उपयोग झाला, हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं. मामाकडे मिळालेला अनुभव, स्वतःच्या घरातूनच चांगल्या खाण्याची असलेली सवय, तोच दर्जा ग्राहकांना देण्याचा ध्यास, कुठल्याही व्यवसायाला आवश्यक असलेले अथक परिश्रम, चिकाटी त्याला घरच्यांची लाभलेला पाठींबा आणि सक्रीय साथ हेच त्याचं भांडवल होतं.

साईछाया आज हॉटेल म्हणून भलेही फार मोठं नसेल पण आज इथे मिळणाऱ्या क्वालिटी, क्वांटीटी आणि आपुलकी असलेली सर्व्हिस ह्यामुळे इथे नोकरदार वर्ग, व्यावसायिकांबरोबरच, फॅमेलीज आणि सिनेजगतातल्या अनेक नामवंत सेलिब्रिटीजही आवर्जून हजेरी लावतात.

बेसुमार साठेबाजी, बेभरवश्याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम महागाईला तोंड देणाऱ्या आजच्या हॉटेल व्यवसायात तशीही प्रचंड अनिश्चितता असते. स्वाभाविकच उत्तम दर्जात समझोता न करणारे आणि गावठी भाषेत ‘मापात पाप’न करणारे व्यावसायिक कमी होत चाललेत.

अशावेळी छोट्या गावात सामान्य आर्थिक परिस्थितीतल्या कुटुंबात जन्माला येऊन, लहानाचा मोठा झालेला आणि रूढार्थाने ‘दहावी नापास’चा शिक्का कपाळावर बसलेला एक तरुण मराठी मुलगा; ज्यावेळी चव, दर्जा ह्याबद्दल बोलतो, तसा वागायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आपली आई,पत्नी आणि कुटुंबियांच्या मदतीने फक्त नॅशनल हायवेवरच नाही तर त्याचबरोबर पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या भल्याबुऱ्या अनेक ‘चॅलेंजेस’च्या नाकावर टिच्चून व्यवसाय करतो. त्याचवेळी ज्या परिस्थितीतून आपण आलो त्याची जाणीव असलेल्या, मंगेशसारख्या मराठी मुलांकडे एक उद्योजकाच्या नजरेतून बघताना मला फक्त आनंदच नाही तर मनापासून अभिमानही वाटतो.

संबंधित बातम्या

खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ

खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!  

खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?

खादाडखाऊ : जखमा उरातल्या खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा