गेल्या महिन्यात रेल्वे इतिहासातील सर्वात मोठी अशक्य घटना नेदरलॅण्ड्स या देशाने करून दाखवली आणि अख्या जगाने तोंडात बोटे घातली. 1 जानेवारीपासून एनएस (Nederlandse Spoorwegen) डच रेल्वे पूर्णतः पवन उर्जेवर चालणारी जगातली पहिली आणि एकमेव रेल्वे बनली. अनेक देश हे स्वप्न बघत होते. अचानक डच रेल्वे सर्वात पुढे निघुन गेली. या देशाने अशी काही सिस्टीम उभारली की पवन चक्कीचे प्रत्येक पाते एक ट्रेन चालवू शकेल. डच रेल्वे दिवसाला 5500 ट्रेनच्या फेऱ्या चालवते. या सर्व इलेक्ट्रिक ट्रेन आहेत. आता यापुढे ही प्रत्येक ट्रेन कोणतेही कार्बन फुटप्रिंट न ठेवता धावेल आणि प्रत्येक प्रवासी देखील पर्यावरणाला वाचवण्यात हात भार लावेल.
याहूनही आश्चर्याची गोष्ट पुढे आहे. जेव्हा अपारंपरिक स्त्रोतापासून ट्रेन चालवायची असे डच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ठरवले, तेव्हा 2018 हे लक्ष ठेवण्यात आले होते. पण एक वर्ष आधीच हा प्रोजेक्ट 100% पूर्ण आणि यशस्वी या देशाने करून दाखवला. आता एक तास चालणारी एक पवन चक्की 120 मैलाची ऊर्जा एखाद्या ट्रेनला देईल. आणि हो, सर्व ट्रेन एसी आहेत बरं का! आपल्या सारख्या नाहीत.
याचेच अनुकरण आता इतर देश करतील, ज्यात आपणही असू. कदाचित लवकरच आपले ‘प्रभु’ नेदरलॅण्डसाठी एखादा अभ्यास दौरा देखील काढतील. पण उपयोग काय तर शून्य!
आज आपण एखादया मार्गाचे विद्युतीकरण करण्यासाठी बजेटमध्ये तरतुदी करत आहोत. उदाहरणार्थ कोकण रेल्वे. इतक्या प्राथमिक पातळीवर आपण सध्या आहोत. ते पूर्ण करण्याचे टार्गेटही बरीच वर्षे आहे. नाही म्हणायला, मुंबई, चेन्नई, इथल्या लोकल्स आणि पुणे-मुंबईसारखे मार्ग विजेवर चालतात. पण डिझेल इंजिनाचा असलेला सिंहाचा वाटा यामुळे भरून निघत नाही.
2015-16 साली रेल्वेच्या इंधनावर झालेला एकूण खर्च 31,220 कोटी इतका होता. त्यात 18,536 कोटींचं द्रव इंधन होते, तर 10,436 कोटींची वीज इंधन म्हणून वापरली गेली. आजही आपण 2.4 बिलियन गॅलेन इतके प्रचंड इंधन वापरतो. म्हणजे आधी आपल्याला संपूर्ण मार्ग विजेवर चालणारे करावे लागणार आणि मग पुढचा पर्याय पवन किंवा सौर उर्जेचा. त्यामुळे घोडा मैदान अजुन लांब आहे असेच वाटते.
त्यातल्या त्यात सुरेश प्रभू आल्यावर वेगवेगळे प्रयोग केले गेले. त्यात 5% बायोडिझेल मिसळून गाड्या चालवल्या गेल्या. जो प्रयोग खरच उपयोगाचा ठरतो आहे. नंतर काही लोको आणि कोचवर सौर उर्जेचे पैनल बसवले गेले. पण हे सर्व अजूनही बालवाडीमधले वाटते. आपल्यासमोर डच रेल्वे ग्रॅज्युएट म्हणावी लागेल. असो.
डच रेल्वेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2015 साली पवन उर्जेवर रेल्वे चालवायची हे निश्चित करण्यात आले. त्यानंतर Eneco या कंपनी सोबत करार करण्यात आला आणि 2018 हे साल प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आले. पण या Eneco कंपनीने हे सर्व काम एक वर्ष आधीच पूर्ण केले आणि या एक वर्ष्यात होणारे प्रदूषणही थांबवले. त्यामुळे डच रेल्वे आतापासूनच ‘ग्रीन रेल्वे’ हे बिरुद मिरवेल. हाही भाग भारतीय रेल्वेसाठी अवघड वाटतो आहे. कारण इथे 10 ते 15 वर्षे जुने मंजूर प्रकल्प आजही निधीअभावी धूळ खात पडले आहेत. निधी उपलब्ध झाला तरी, जमिनीचे हस्तांतर, त्याचा मोबदला, त्याच्या कोर्ट केसेस या आणि अशा अनेक अनैसर्गिक संकटात हे प्रकल्प रखडतात. काही ठिकाणी अधिकारी चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे ते प्रकल्प रखडतात.
आपण सध्या जी सुरुवात केलीय आणि आपल्या कामाचा वेग अतिशय कमी असल्याने येत्या 20 वर्षात एखादा मार्ग जरी अपारंपरिक ऊर्जेवर सुरु करण्यात आला तरी आश्चर्य मानावे लागेल.
आपल्या येथील प्रवाशांना देखील यासाठी काही करावे असे वाटत नाही. एक दोन ट्रेन उशिरा आल्या की लगेच संपूर्ण व्यवस्था बंद पाडणारे आपले प्रवासी कधी पर्यावरण पूरक प्रकल्पसाठी आंदोलन करतील का? यासाठी प्रवासी देखील अशा गोष्टींसाठी आग्रही असले पाहिजेत, तरच असे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील.
आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू सध्या शर्थीचे प्रयत्न करून भारतीय रेल्वेला तोट्याच्या ट्रॅकवरुन विकासाच्या ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करत आहेत. अगदी काही प्रमाणात त्याला यश देखील मिळत आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रयत्न होत नाहीत असे नाही पण अनेक गोष्टींचा अभाव आपल्या विकासाच्या आड येतो. त्यामुळे उशिरा का होईना, सुरुवात झाली हेच आपल्यासाठी यशप्राप्त करण्याप्रमाणे आहे. म्हणतात ना, It's never too late to make things right.
इट्स नेव्हर टू लेट टू मेक थिंग्ज राईट !
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
13 Feb 2017 10:23 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -