भारतीय रेल्वेचे भविष्य काय असेल, जगाच्या पाठीवर आपण कुठे आहोत? असे प्रश्न तुमच्या मनात असतील, तर या प्रश्नांची उत्तरं आयसीएफ म्हणजेच इंटेग्रल कोच फॅक्टरी, चेन्नईकडे आहेत. ते म्हणजे भारतीय रेल्वेचे महत्वाकांक्षी 2 प्रोजेक्ट - ट्रेन 18 आणि ट्रेन 20.




युरोपियन लक्झरी आणि सेमी फास्ट ट्रेनच्या धर्तीवर या नव्या 2 ट्रेन तयार होत आहेत. याचे संकल्पचित्र खाली आहे. खुप सुंदर प्रोजेक्ट आयसीएफने हातात घेतला आहे. लवकरच तो प्रत्यक्षात उतरेल.

असं सांगितलं जातंय की, ट्रेन 18 ही सध्या असलेल्या शताब्दी एक्स्प्रेसच्या जागी धावेल तर ट्रेन 20 ही आपल्या राजधानी एक्स्प्रेसच्या जागी येईल. म्हणजेच ट्रेन 18 मध्ये स्लीपर कोच नसतील तर चेयर कार असेल आणि ट्रेन 20 मध्ये मात्र स्लीपर कोच आणि चेयर कार असे दोन्ही डबे असतील. ट्रेन 18 ही यावर्षी ऑगस्टच्या दरम्यान रुळांवर येईल असा दावा आहे. तर ट्रेन 20 पुढील वर्ष उजाडेल. मात्र या ट्रेन्स लवकर रुळांवर याव्यात अशी प्रत्येक रेल्वे प्रेमींची इच्छा आहे.



या नवीन ट्रेनमध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे यांना खेचून न्यायला इंजिन नसणारे, तर नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामध्ये कोचच्या खाली ट्रॅक्शन मोटर्स बसवली जाणार आहेत. ज्यातून सर्व कोचला पॉवर मिळेल. अश्या ट्रेन्सला "ट्रेनसेट" असे म्हणतात.

प्रत्येक ट्रेनच्या सुरुवातीला आणि शेवटी अश्या दोन्ही बाजूला (लोकल प्रमाणे) ड्रायवरच्या केबिन असतील. याचे 2 फायदे आहेत. इंजिन नसल्याने प्रत्येक वेळी डब्यांना पुढे मागे शंटिंग करून इंजिन लावण्यासाठी जो वेळ वाया जातो तो जाणार नाही. त्याच बरोबर ट्रेन दोन्ही दिशेला धावू शकेल. तर ट्रॅक्शन मोटर मुळे पॉवर सर्वत्र सारखी विभागली जाईल आणि ट्रेनचा स्पीड वाढवण्याच्या आणि कमी करण्यासाठी देखील कमी वेळ लागेल. सध्या ज्या एक्प्रेस गाड्या धावतात यामध्ये मात्र असे काहीही नाहीये. युरोपियन सेमी फास्ट ट्रेन्स मध्ये देखील हेच तंत्रज्ञान आहे, जे आपण स्वतः तयार करत आहोत.



सध्या भारतात गतिमान एक्स्प्रेस ही 160 किमी प्रति तासच्या वेगाने धावणारी सर्वात जलद एक्स्प्रेस आहे. मात्र या ट्रेन त्याहीपेक्षा जलद धावू शकणाऱ्या आहेत. त्यांच्या स्पीड ट्रायल्स मध्ये 176 किमी प्रतितास वेगाने चाचणी घेण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात त्या किती वेगाने धावतील हे त्या रूपांवर आल्यावरच ठरवले जाईल. वेग वाढवून प्रवास कमी वेळेत पूर्व करण्याचे उद्दिष्ट सध्या भारतीय रेल्वे सामोर आहे. आणि त्यासाठीच या नवीन ट्रेन्स मध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे.

ट्रेन 18 ची संपूर्ण बॉडी हि स्टेनलेस स्टीलची असेल. तर ट्रेन 20 बॉडी ही अल्युमिनियमची असेल. या मुख्य बदलामुळे कोचेसचे वजन कमी होण्यास मदत होईल, वेग वाढेल आणि दिसायला देखील त्या सुंदर दिसतील.



या दोन्ही ट्रेन्स मध्ये जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा असतील. यामध्ये जीपीएस बसवलेले असेल, त्या द्वारे प्रवाश्यांना चालू ट्रेन मध्ये मनोरंजन आणि प्रवासाबद्दल माहिती मिळेल. वाय फाय, एलईडी टीव्ही स्क्रिन्स, डिफ्युज लायटिंग सिस्टीम या सुविधा असतील. सोबत ऑटोमॅटिक दरवाजे असतील जे स्टेशन आल्यावर स्वतःहून उघडले आणि बंद होतील. सर्वात महत्वाचे या सर्व कोच मध्ये झिरो डिस्चार्ज व्हॅक्युम बेस्ड बायो टॉयलेट्स असतील. यामुळे रुळांवर होणारी घाण होणार नाही.



इतक्या जागतिक दर्जाच्या ट्रेन्स तयार करण्यासाठी खर्च देखील थोडा जास्त येणार आहे. ट्रेन 18 चा एक कोच बनवण्यासाठी 2.50 कोटी रुपये खर्च येईल, या ट्रेनसेटमध्ये 16 कोच असतील. (14 एसी आणि 2 एक्झिक्युटिव्ह डबे) तर ट्रेन 20 चा एक कोच बनवण्यासाठी 5.50 कोटी रुपये खर्च येईल, ज्यामध्ये 20 कोच असतील.  हा खर्च तास जास्त असला तरी अशा ट्रेन युरोपातून आयात केल्यास जितका खर्च येईल त्यापेक्षा 50 % टक्के कमी आहे. एकप्रकारे 50 % कमी खर्चात आपण या ट्रेन्स तयार करत आहोत.



या दोन्ही ट्रेन्समुळे प्रवास वेळेत अंदाजे 20% कपात होईल असे सांगितले जात आहे. आता प्रश्न हा आहे की भारतीय प्रवासी या ट्रेन्सला कशा प्रकारे स्वीकारतील. सध्या असलेल्या एक्प्रेसच्या डब्यात बसवलेल्या बायो टॉयलेट्सच उदाहरण आपल्या समोर आहेच. तेच वापरता येत नाहीत प्रवाश्यांना. त्याच प्रमाणे नवीन तेजस सारख्या ट्रेनचं उदाहरण देखिल आहे, जिचे एलसीडी स्क्रिन्स चोरी करण्याचा, सीट्स फाडण्याचा प्रकार समोर आला होता. एकीकडे रेल्वेला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे वर्ल्ड क्लास सोयी वापरता येत नसायच्या किंवा भारतीय सवयी प्रमाणे वापरायच्या. याला अर्थ नाही.



आयसीएफने मागील 3 ते 4 वर्ष्यात प्रचंड काम करून नवीन नवीन ट्रेन बनवल्या आहेत. त्यात आता या 2 ट्रेन्सची देखिल भर होईल. यामुळे त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. ट्रेन 18 आणि ट्रेन 20 यांसारख्या ट्रेन्समुळे नक्कीच भारतीय रेल्वेला नवीन रुप मिळायला मदत होईल यात शंका नाही.