श्याम सुंदर पालीवाल... या नावाशी आपला तसा काहीच संबंध नाही. पण जेव्हा तुम्ही या व्यक्तीला भेटाल, त्यांच्या कामाबद्दल ऐकाल, तेव्हा एकच वाक्य बाहेर पडेल... “काय ग्रेट माणूस आहे हा!”
श्याम सुंदर पालीवाल हे मूळचे राजस्थानचे. पिपलांत्री हे त्यांचं गाव. जगातील सर्वात मोठ्या संगमरवराच्या खाणी जिथे आढळतात, असा हा प्रदेश. या प्रदेशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे.
तर संगमरवराच्या खाणींमुळे गावातील पाणी पातळी जवळपास 500 ते 600 फूट खाली गेलेली. त्यामुळे शेतीचा प्रश्नच नाही. पाण्याची कमतरता, राहण्याचे वांदे, परिणामी गावकरी गाव सोडून अहमदाबाद, मुंबई यांसारख्या शहरात स्थलांतर करु लागले. या शहरात आपल्याला पैसा किती मिळेल, याचा विचार न करता, स्थलांतरित झाल्यानंतर त्या त्या शहरात राहून उदरनिर्वाह करु लागले.
एकंदरीत रखरखत्या उन्हामुळे आधीच वाळवंट होऊ पाहणारा हा प्रदेश, त्यात घराला कुलुपं लावून शहराची वाट धरणाऱ्या लोकांमुळे गावंही ओस पडू लागली होती... आणि इथेच सुरु होते श्याम काकांची गोष्ट...
2005 साली श्याम काका गावचे सरपंच म्हणून निवडून आले. याचदरम्यान त्यांची लाडकी मुलगी किरण आजारपणात वारली. मुलगी आणि बापाचं नातं किती घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचं असतं, हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे अर्थात किरणच्या निधनाने श्याम काकांवरही दु:खाचा डोंगर कोसळला. या दुःखातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण होतं. शेवटी बाराव्या दिवशी गावकऱ्यांनी त्यांना साकडं घातलं, “दु:ख आवरा. काम सुरु करा. काम करता करताच दु:खाचा विसर पडेल.” गावकऱ्यांनी आपापल्या परीने श्याम काकांना दिलासा दिला.
श्याम काकांनी ठरवलं आपण किरणच्या आठवणीसाठी काही झाडं लावू. त्यांच्या या संकल्पाला गावकऱ्यांनीही साथ दिली. मग त्यांच्या लक्षात आलं, माझ्या मुलीसाठी जर हे गावकरी इतकं करत असतील, तर स्वतःच्या मुलीसाठी का करणार नाहीत?... आणि मग तेव्हापासून गावात एक नवी संकल्पना रुजली.
संकल्पना साधी होती, पण पर्यावरणाच्या दृष्टीने तितकीच क्रांतिकारी. संकल्पना अशी की - “गावात ज्या ज्या वेळी मुलीचा जन्म होईल, तेव्हा गावकऱ्यांनी मिळून 111 झाडं लावायची. शिवाय गरीब कुटुंबातल्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 20 वर्षांसाठी 31 हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवायचे.”
फिक्स डिपॉझिट ठेवलेली रक्कम संबंधित मुलीचं उच्चशिक्षण किंवा लग्नासाठी वापरता यावी, हे तिच्या आई-वडिलांकडून लिहून सुद्धा घेतलं जातं. महत्त्वाचं म्हणजे यातील 10 हजार रुपये पालकांकडून घेतले जातात, तर 21 हजार रुपये गावकरी जमा करतात.
जी झाडं लावली जातात, ती वेगवेगळ्या प्रकारच्या फळा-फुलांची असतात. त्यामुळे या झाडांची फळं, फुलं विकून येणारा पैसाही मुलीच्या शिक्षण किंवा इतर खर्चासाठी वापरला जातो.
या उपक्रमामुळे गावात झाडांची संख्या वाढत गेली. या झाडांबरोबर गावातल्या मुलीही मोठ्या होत जातात.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे... असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. श्याम सुंदर पालीवाल यांनी वैयक्तिक घटनेपासून का होईना, पण पुढे तुकोबांच्या या ओळी प्रत्यक्षात उतरवल्या आहेत. पर्यावरण आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे आणि तेच नाते अधिक घट्ट करण्यासाठी श्याम काकांची धडपड खरंच वाखाणण्याजोगी आहे.
पाणी नाही, त्यामुळे शेती नाही, शेतीअधारित उद्योग नाहीत आणि पर्यायाने रोजगार नाही, म्हणून गाव सोडून स्थलांतरित झालेल्या गावकऱ्यांना परत गावी आणायचं होतं. त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा होता. त्यामुळे श्याम काकांनी कामाचा आवाका वाढवला. विविध ग्रामपंचायतींना कामासाठी, रोजगारासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी वापरलेल्या मॉडेल्सचा अभ्यास केला. पहिलं वातानुकुलित पंचायत भवन सुरु केलं. वन्यजीव वाचवा मोहीम राबवली, रोजगारासाठी प्रयत्न केले, महिलांचा गावच्या कामातील सहभाग वाढवला, सरकारी पैसा कामात आणण्यावर भर दिला.
अनेक गोष्टी करण्यात येत असल्या तरी ‘वृक्षारोपण’ हाच प्राधान्याचा विषय राहिला. जशी मुलीच्या जन्मानंतर 111 झाडं लावली जातात, त्याचप्रमाणे गावातील कुणाचं निधान झालं, तर त्यांची आठवण म्हणून 11 झाडे लावली जातात.
ज्यावेळी गावातील मुलगी नांदायला सासरी जाते, तेव्हाही ती एक झाड लावूनच जाते. कुतूहल म्हणून जेव्हा तुम्ही या गावाला भेट द्यायला जाल, तेव्हा तुम्हालाही गावात एक झाड लावावं लागेल. त्यामुळे श्याम काका सगळ्यांनाच त्यांच्या गावाला भेट देण्यासाठी निमंत्रण देतात.
त्यांच्या या प्रयत्नांमुळे या गावची पाणीपातळी आठ ते दहा फुटांनी वाढली आहे.
आपल्या आदर्श गावाच्या संकल्पनेमुळे आणि ते प्रत्यक्षात आणल्याने देश-विदेशात ज्यांचे आदराने नाव घेतले जाते, त्या महाराष्ट्रातील हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांना श्याम काका आदर्श मानतात. आणि हे सांगायला ते अजिबात विसरत नाहीत.
पर्यावरणाचं महत्त्व जाणून, ते जपण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून, या सर्व संकल्पनांना मानवी भावनांचा टच देणाऱ्या श्याम काकांचे अनुकरण सगळीकडे व्हावे...एवढंच.
मुली वाढतात झाडांसोबत…
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2018 08:41 PM (IST)
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे... असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. श्याम सुंदर पालीवाल यांनी वैयक्तिक घटनेपासून का होईना, पण पुढे तुकोबांच्या या ओळी प्रत्यक्षात उतरवल्या आहेत. पर्यावरण आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे आणि तेच नाते अधिक घट्ट करण्यासाठी श्याम काकांची धडपड खरंच वाखाणण्याजोगी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -