BLOG : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) सध्या जागा वाटपावरुन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत (Mahayuti) केवळ 3 जागा आणि 2 राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजपच्या (BJP) चिन्हावर लढवण्याची शर्त भाजपकडून ठेवण्यात आली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पाहिला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील आठवड्यात दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपण महायुतीमध्ये सहभागी होताना जे आश्वासन दिलं होतं, ते पाळण्यात यावं अशी भावना व्यक्त करण्यात आली.


महायुतीत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 9 लोकसभेच्या जागा, तर 90 विधानसभेच्या जागा देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, हे आश्वासन सध्या तरी पाळण्यात येत नसल्याचं चित्र आहे. अमित शाह यांच्यावतीने 9 जागा देण्यास नकार देण्यात आला असून, शिवाय 3  जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आणि 2 जागा या भाजपच्या चिन्हावर लढण्याची अट ठेवण्यात आली. ही बाब ज्यावेळी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचू लागली, त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहिला मिळत आहे. कार्यकर्त्यांकडून “जर इतक्या कमी जागांवर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बोळवण होत असेल, तर त्यापेक्षा दोन पावलं मागे फिरून पुन्हा स्वगृही जावू, भाजपविरोधीत लढाई लढू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणू” अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 


बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.?


लोकसभा निवडणुकांमध्ये जर भाजपकडून इतक्या कमी जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लढवण्यासाठी परावृत्त केलं जात असेल, तर त्यापेक्षा महाविकास आघाडीत स्वगृही परतणे योग्य राहिल अशी कार्यकर्त्यांनी एबीपी माझाशी बोलताना इच्छा व्यक्त केली आहे. कारण भाजपच्या वतीने लोकसभेला अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर विधानसभा निवडणुकांमध्ये जे त्यांच्याकडून 90 जागांचं आश्वासन दिलं आहे ते भाजपच्या वतीने पाळले जाईल यावर कसे विश्वास ठेवायचे. सध्या भाजपचं वागणं पाहता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असंच म्हणावं लागेल असे  कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 


भाजपचे दबावतंत्र वाढल्यास आमदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या जी परिस्थिती झाली आहे, तीच परिस्थिती कायम राहिली तर सध्या अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून गेलेले आमदार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक आमदार भाजपसोबत आपण का जायला हवं?, यासाठी आमदारांसोबत बोलत असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील 2 आमदारांनी तर उघड उघड भाजपला मदत करण्यास सुरुवात केली असून, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातून लाखोंचे लीड देण्याचा पण केल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.    


दिल्लीतील बैठक आणि अजित पवारांची संभ्रमाची भूमिका?


शुक्रवारी रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक वेगळी बैठक पार पडली. सुत्रांच्या माहितीनुसार या बैठकीला जायचं की नाही याबाबत अजित पवार यांच्यामध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळालं होतं. 'जर दिल्लीला जाऊन आपल्याला अपेक्षित जागा मिळणारच नसतील, तर मग दिल्लीला बैठकीला का जायचं? अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी घेतली होती'. मात्र, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहानंतर अजित पवार दिल्लीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत सायंकाळी चारच्या सुमारास दिल्लीला रवाना झाले. 


शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांना लवकरच गाड्या मिळणार?


एकीकडे अजित पवार यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीला भाजपच्या दबावतंत्राला बळी पडण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत असलेल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची चांदी होणार आहे. कारण लवकरच महिंद्राची नवीकोरी बोलेरो गाडी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पक्षफुटीनंतर चिंतेत पाहिजे होते, ते मोठे साहेब 'नव्या दमात' आणि सत्तेत गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित दादा 'कोमात' असंच काहीसं चित्र बनल्याची चर्चा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.


Ajit Pawar And Supriya Sule : बहिण- भाऊ पुन्हा एका मंचावर; अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा अबोला कायम राहणार?