काल परवा नाईट शिफ्ट संपली आणि मी हा लेख लिहायला घेतला. संपूर्ण नाईट शिफ्टमध्ये माझा एकमेव साथीदार होता तो म्हणजे चहा. रात्री अपरात्री कँटीनवाल्याला उठवून कोरा का होईना पण चहा पाज असं म्हणायचा अवकाश की त्यानं चहा आणून द्यावा. आणि आपण चहाच्या पहिल्याच घोटापास्नं पुन्हा कामावर तुटून पडावं. हा चहा म्हणजे ना एकदम करंट देणारं पेय आहे. कधी कँटीनवाल्यानं कंटाळा केलाच तर खाली चहावाला मामा अगदी दोन वाजेपर्यंत चहा घेऊन उभा असतो. चहाचं आणि माझं नातं एकदम अतूट... या चहानं बऱ्याचं लोकांचा रोजगार चालतो, याच चहामुळे सुरकुतलेला चेहरासुद्धा हसरा होऊन जातो. आजकाल तर सरकारसुध्दा चहावाल्यांचं आहे. यावरून कळेल की चहा नावाच्या पेयाचा महिमा किती अगाध आहे. चार मित्र जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा चहा नक्की घेणार. त्यातल्या एका दोघांनी चहा सोडलेला असतो पण मित्र भेटले, म्हणून घेतलेल्या सगळ्या शपथा मोडून चहाचा आस्वाद घेतात. त्यांच्यातल्या मित्रत्वाच्या नात्याला चहा अजून घट्ट करतो. रात्री बिअर बारमध्ये दारु पिण्यावरुन झालेले वाद हेच मित्र दुसऱ्या दिवशी चहा पिऊन मिटवतात. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्यास चहाच अशा तरुणांचा सहारा असतो. लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, प्रेम करण्यासाठी, जगण्यासाठी निमित्त असतो चहा.
मला अजूनही माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात. आम्ही मित्र सुट्टी झाली की बाहेरच्या टपरीवर एकत्र जमायचो, याच टपरीवर कुणाचे सूत जुळायचे तर कुणाचे जळायचे, लांबूनच नजरा भिडायच्या तर कधी केवळ प्रतीक्षा आणि प्रतीक्षाच. या सगळ्यासाठी साथीला असायचा टपरीवरचा कटींग चहा. गावाकडून मुंबईला आलोय पण हा मित्र अजूनही साथीला आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी हा मित्र माझ्यासोबतच राहील याची मला खात्री आहे. आपण जरा इतिहासात डोकावून पाहिलं तर चहाचासुद्धा इतिहास आपल्याला पाहावयास मिळतो. प्रसिद्ध बोस्टन टी पार्टी तर अख्ख्या जगाला माहित आहे. पूर्वी आशिया खंडात केवळ चीनमध्ये चहाचे मळे असत. चीनने निर्यात चहावर प्रचंड कर लावला होता. त्यामुळे युरोपियन विशेषतः ब्रिटीशांना हा चहा आयात करणे परवडेना. त्यामुळे त्यांनी भारतातले चहाचे मळे विकसित करण्याचं ठरवलं आणि याची सुरुवात साधारणत: 1860 नंतर झाली. आसाम आणि दक्षिणेकडील काही भागांत चहाचे मळे जोरात उत्पादन करु लागले. त्यात भारतीय मजुरांची प्रचंड हेळसांड झाली. संपूर्ण चहा उत्पादनावर ब्रिटीशांनी आपला वचक बसवला. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्सची पत्नी ही पोर्तुगीजची राजकन्या होती. तिच्या विवाहात पोर्तुगिजांनी मुंबई बेट इंग्रजांना आंदण म्हणून दिले होते. असं म्हणतात त्या राजकन्येनं हुंड्यामध्ये चहा देखील आणला होता. त्यामुळे चहा हा एकेकाळी केवळ श्रीमंतांचं पेय म्हणून ओळखला जात असे.
सकाळ सकाळचा मस्त वाफाळलेला चहा असू देत किंवा दिवसभर घोटून बनवलेला चहा असू देत, आज जरी तो गरीब श्रीमंत न पाहाता प्रत्येकाच्या ओठाला स्पर्श करीत असला तरी एक काळ होता जेव्हा चहाचा तुटवडा निर्माण व्हायचा आणि त्यामुळे चहाचे चक्क लिलाव केले जायचे. त्याला मेणबत्ती लिलाव असं म्हणत. मेणबत्ती किमान एक इंच जळेपर्यंत बोली लावली जायची. इतका सारा इतिहासातून वर्तमानात प्रवास करत चहा आपल्यापर्यंत पोहोचलाय. आज त्याचे विविध रंग, प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाईट टी, मसाला टी त्यातल्या त्यात पुण्यात तर वेगळेच प्रकार बासुंदी चहा, तंदुरी चहा, प्रेमाचा चहा प्रत्येक चहावाल्यानं आता स्वत:चा एक वेगळा ब्रँड विकसित केल्याचे दिसू लागलंय.
चहा म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग, चहा म्हणजे काम करण्यासाठीचं टॉनिक, चहा म्हणजे मित्रांना जोडणारा दुवा, चहा म्हणजे दुनियाभरच्या गप्पा, चहा म्हणजे मुंबईतलं ईराणी हॉटेल,चहा म्हणजे कलकत्त्यातलं कुल्लड, चहा म्हणजे कश्मीरमधला नून चहा, दक्षिणेतली निलगीरी किंवा व्हाईट चहा, चहा म्हणजे पहाटेचं धुक्यातलं बनारस, चहा म्हणजे हजारो तलफगार स्वत:मध्ये साठवलेली सदाशिव पेठ, चहा म्हणजे सोलापूरचा इंडिया टी. चहाची जितकी रूपं सांगावी तितकी कमी. जेव्हा जेव्हा आयुष्यात काही कटू आठवणी येतील, कटू अनुभव येतील तेव्हा तेव्हा या चहाच्या गोडीत त्या विरून जातील. पुन्हा तरतरी येईल नवीन वाटेवर चालण्यासाठी... (सर्व फोटो : विनय पंडित)