A House of Dynamite Movie Review: दिग्दर्शिका कॅथरिन बिलेगो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. तिच्या कथानकांची मांडणी इतकी जबरदस्त असते की, प्रेक्षकांना विचार करायचा ही वेळ मिळत नाही. ते कथानकात गुंतत जातात. आता पुढे काय होणार याची आस लागून राहते. लवकर काय ते करा, अशा टिपेला प्रेक्षक येतो आणि तिथंच कॅथरीनमधली दिग्दर्शिका जिंकते. ती प्रेक्षकांचे हार्टबीट आणि उत्कंठा वाढवते. कॅथरीन बिलेगाच्या प्रत्येक सिनेमात असंच घडतं, ए हाऊस ऑफ डायनामाईट (2025) यात तिने तयार केलेलं टिकींग टेरर भन्नाट आहे. ते तिच्या ऑस्कर विजेत्या द हार्ट लॉकर (2008) आणि झिरो डार्क थिर्टी (2012) पेक्षा वेगळं आहे. यामुळं यंदाही ती ऑस्करच्या स्पर्धेत असेल.
एक आण्विक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या शिकागो शहराच्या दिशेने निघालंय. रशिया, नॉर्थ कोरीया, इराण कुणी पाठवलंय याचा थांगपत्ता नाही. ते रडारवर दिसतं आणि नाट्याला सुरुवात होते. अमेरिकेच्या तीन ठिकाणी ते नाट्य घडतं त्यावरच ए हाऊस ऑफ डायनामाईटचं कथानक आहे. आतापर्यंत अमेरिका धोक्यात असल्याच्या कथानकांचे अनेक सिनेमे आले. राष्ट्रावर आलेलं संकट सर्व अमेरिकन कसे परतवून लावतात असे टिपिकल खुप सिनेमे आहेत. ए हाऊस ऑफ डायनामाईट याला अपवाद नाही. पण याची एक खासियत आहे. ते म्हणजे कॅथरीन बिलेगोनं तयार केलेला टिकींग टेरर. तो खरा अनुभवण्यासारखा आहे. व्हाईट हाऊस, पेंटागॉन आणि एअरफोर्स बेस अश्या तीन ठिकाणी हे कथानक घडतंय. राष्ट्रावर आलेलं संकट टाळण्यासाठी सर्वांकडे फक्त 18 मिनिटं आहेत. अमेरिकन सैन्याची संकटाला सामोरं जाण्याची आखणी, त्यांची वॉर रुम आणि त्याद्वारे घेतले जाणारे निर्णय अशी ही मांडणी सिनेमात दिसते. संपूर्ण सिनेमा हा या निर्णय प्रक्रियेवर आहे.
स्टॅनली कुब्रिकच्या डॉक्टर स्ट्रेंजलव (1964) या सिनेमांत ही निर्णय प्रक्रिया विनोदी ढंगांनं दाखवण्यात आली होती. समान कथानक असलेलं सिडने ल्युमेटचा फेल सेफ (1964) हा तसा सिरीयस सिनेमा आहे. त्यात थरार जास्त आहे. कोल्डवॉर प्रत्यक्ष युध्दाकडे जाण्याची ही प्रक्रिया आहे. आलेलं संकट कसं टाळायचं आणि संभावित आण्विक यु्ध्दाचा सामना कसा करायचा यावरचे हे सिनेमे होते. पण कॅथरीन युध्दाच्या किंवा प्रतिहल्ला किंवा बचावाच्या निर्णय प्रक्रियेतले बारकावे दाखवते. शिकागोत होणारा संभावित न्युक्लिअर अटॅक टाळण्याची प्रक्रिया तेव्हढी सोपी नाही. काय करायचं याचं लिखित मॅन्युअल आहे. निर्णय नक्की कोण घेतंय, का घेतंय आणि कसा घेतंय अशी ही प्रक्रिया प्रचंड क्लिष्ट तेव्हढीच ती मानवीय ही आहे. म्हणजे अमेरिकेचा अध्यक्ष ते वॉर रुम आणि प्रत्यक्ष हवाई तळावर असलेला प्रत्येकजण या निर्णय प्रक्रियेचा भाग आहे. त्या प्रत्येकाचा दृष्टीकोन कॅथरीननं दाखवला आहे.
या पुर्वीही द हार्ट लॉकर (2008) आणि झिरो डार्क थिर्टी (2012) या सिनेमांमधून तिनंही निर्णय प्रक्रियाच दाखवली होती. युध्दभूमीत निर्णय घेणारे आपण एकटे नसतो. आपल्या निर्णयावर लाखों-करोडो लोकांचं भवितव्य असतं. त्यामुळं तो निर्णय चारही बाजूंचा विचार करुन घ्यायचा असतो. द हाऊस ऑफ डायनामाईटमधली ही प्रक्रिया तीन वेगवगळ्या पातळीवर आहे. निर्णयक्षमतेचे तीन वेगवेगळे पैलू, पहिला तिथं नाट्य घडतंय ते वॉररुम, अणुबॉम्ब घेऊन क्षेपणास्त्र शिकागोकडे रवाना झाल्यावर ऑनलाईन सुरु झालेली अमेरिकेतल्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक आणि तिसरे शेवटचा निर्णायक पर्याय देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.
आपल्या एका निर्णयावर शिकागोतल्या लाखो लोकांचे जीव (ज्यात त्यांचे कुटुंबीयही आहेत) अवलंबून आहेत. आणि एका निर्णयावर जगभरात नवं अणु युध्द सुरु होण्याची भिती असं सर्वकाही टेन्शनवाली पटकथा तयार करणाऱ्या नोआ ओपणहेमचं कौतुक वाटतं. असंख्य कॅरेक्टर आणि त्याच्या संवादातून हे नाट्य घडतं. जसजशी वेळ पुढे जातेय तसतसं हे नाट्य अधिकच क्लिष्ट आणि प्रेक्षकांचा हृदयाचा ठोका चुकवणारं ठरलंय. हीच कॅथरीनच्या सिनेमाची खरी खासियत आहे. या टिकींग टेररचा अनुभव जबरदस्तच आहे.