परवाच्याच दिवशी सीएसएमटी परिसरात गेले होते. सीएसएमटी रेल्वेस्टेशन, टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसचा परिसर, पलिकडची कामा हॉस्पिटलची लेन,ही सगळी ठिकाणं खरंतर लहानपणापासून पाहिलेली. पण या ठिकाणांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तो २६ नोव्हेंबर २००८ नंतर.. दहशतवादी हल्याच्या झळा सोसलेल्या या परिसराची वेदना तीव्रतेनं अंगावर येते. या दिवसाच्या वेदनादायी आठवणी मनात खूप खोल रुतून बसल्या आहेत.


या दिवसाने अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ घडली. काहींनी सर्वस्व गमावलं, काहींना आयुष्यभराची जखम झाली आणि काही वेदनातर शब्दात न मांडता येण्यासारख्या.

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या दिवसानं बरंच काही शिकवलं तर बरंच काही हिरावूनही घेतलं.

मला आजही तो दिवस आठवतोय. अगदी नीट. माझं अँकरिंग सुरु होऊन जेमतेम काही महिनेच झाले होते. त्यामुळे अनुभव तसा कमीच. मी संध्याकाळच्या शिफ्टला होते. चार ते रात्री बाराच्या. दिवस ऑलमोस्ट संपलेला. ऑफिसच्या वातावरणात हलकासा निवांतपणा रेंगाळत होता. तेव्हा एबीपी माझाचं ऑफिस महालक्ष्मीला होतं. फेमस स्टुडिओच्या मागे. मला रात्री ११ वाजताचं बुलेटिन होतं. प्रसन्न जोशी, मी, प्रतिक कोल्हे आणि श्रीजीत मराठे असे आम्ही चार अँकर होतो. प्रसन्न रात्री दहाचं बुलेटीन वाचणार होता. साडेनऊ पावणेदहाच्या दरम्यान बातमी आली की दक्षिण मुंबईत फायरिंग, गँगवॉरचा प्रकार.

प्राथमिक माहितीनुसार बातमीचा आवाका तसा मर्यादित होता. कुणाला फार काही गांभीर्यपूर्ण असेल असं वाटण्याची शक्यताच नव्हती. प्रसन्नने अँकरिंग सुरु केलं आणि बातमीचे अपडेटस् येत गेले. मग समजू लागलं की या बातमीची तीव्रता किती जास्त आहे. हादराच बसला.

साधारणपणे त्यावेळेला प्रवास करणाऱ्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना पटापट फोन केले. सगळे ऑलमोस्ट घरीच होते. मग घरी फोन केला आणि कळवलं की आज रात्री घरी यायला उशीर होऊ शकतो कारण मुंबईत जरा गडबड झालीय. घरच्यांनी काळजी घ्यायला सांगितलं. मी परत न्यूजरुममध्ये आले तेव्हा हे समजलं होतं की हा दहशतवादी हल्ला आहे.



कोणतीही रिअॅक्शन देण्याचाही वेळ नव्हता. प्रत्येकजण आपापल्या परीनं कामाला लागला. खरंतर असा हल्ला होण्याची ही पहिली वेळ. त्यामुळे नेमकं काय करायचं याचा अंदाज कुणालाही नव्हता. सुपरफास्ट स्पीडने अपडेट येत होते. ऑफिसातले ऑलमोस्ट सगळेच सीनिअर घरी पोहोचलेले किंवा प्रवासात होते. जी माणसं आहेत त्यातच काम करणं भाग होतं. बरीच पॅनिक अवस्था होती.

जे रिपोर्टर फिल्डवर आहेत त्यांची काळजी, मुंबईत जे घडत होतं त्याने बसलेला हादरा, लोकांपर्यंत अपडेटस् पोहोचवण्याची घाई, या सगळ्यात राखायचा संयम. खूपच कठीण तास होते ते. मुंबईला या हल्ल्यातून वाचवण्यासाठी मुंबईचं अख्खं पोलिस दल फ्रंटवर लढत होतं. जसा वेळ पुढे जात होता तशी परिस्थती आणखीनच वाईट बनत होती.

यात अचानक माझी नजर टीव्हीवर गेली. मला दिसले तेव्हाचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे. त्यावेळी ते अख्ख्या जगासाठी एटीएसप्रमुख होते पण माझ्यासाठी त्याच्याजोडीनं माझे करकरे काकाही होते. मला त्यांचा कमालीचा अभिमान वाटला. स्वतः प्रमुख म्हणून पाठीमागे न राहता पुढे जाऊन लढण्याची त्यांची वृत्ती मला आधीपासूनच परिचयाची होती. शांतपणे ते हेल्मेट चढवत होते. कुठेही आरडाओरडा नही. घाईगडबड नाही. जसा त्यांचा स्वभाव तशीच त्यांची काम करण्याची पद्धत होती. अगदी प्रामाणिक. ते चित्र पाहून आता सगळं ठीक होणार याबद्दल मला ठाम विश्वासही वाटला. एक निर्धास्तपणाही जाणवला. पण त्याक्षणी मला पुसटशीही कल्पना नव्हती की करकरे काकांना मी शेवटचं पाहतेय.

मी परत कामाच्या गडबडीत गेले. धडाधड बातम्या आदळत होत्या. दर मिनिटांला कुणाच्यातरी जखमी होण्याची किंवा मृत पावल्याची बातमी येत होती. मुंबईच्या सर्वात उच्चभ्रू भागात झालेला हा हल्ला दर क्षणाला मुंबईला आणखी काळवंडत होता. खिळखिळी करत होता.

याच दरम्यान कुणीतरी जवळपास किंचाळलं की ओह गॉड.. हेमंत करकरे शहीद.....बापरे.. मी फक्त बातमी खरी आहे की नाही ते पाहिलं आणि मग मात्र माझा बांध फुटला. मी अँकर आहे, मला अँकरिंग करायचंय. याक्षणी ऑफिसातल्या जबाबदाऱ्या समोर आहेत याचं कसलंही भान मला राहिलेलं नव्हतं. काही मिनीटांपूर्वी आपल्या सहकाऱ्यांना शांतपणे सूचना देणारे करकरे काका असे कसे गेले याचं उत्तरंच मिळेना. त्यांच्यासोबतच अशोक कामटे आणि विजय साळसकरही शहीद झाल्याचं कळलं.

मी घरी फोन लावला. घरचे जस्ट झोपले होते. मी त्यांना करकरे काका शहीद झाल्याचं सांगितलं. कुणाचाच विश्वास बसेना. माझ्या पप्पांना तर मोठा धक्का बसला. मी तर पूर्ण ब्लॅन्क होते. एकतर अनेक तासांचा या बातमीचा ताण आणि करकरे काकांच्या शहीद होण्याची बातमी. मी ढसाढसा रडू लागले. माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप समजावलं. मी काहीवेळ अँकरिंग करु शकत नाही हे मी सांगितलं आणि त्या सगळ्या गोंगाटापासून जरा दूर झाले.



माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्या पप्पांची आणि करकरे काकांची ओळख. आमचं कुटुंब खरंच लकी की आम्हाला त्यांचा स्नेह लाभला. मला आठवली ती करकरे काका आणि माझी शेवटची भेट. आम्ही जुलै महिन्यात भेटलेलो. त्यांच्या ऑफिसमध्ये. मी गुरुपौर्णिनिमित्त एका मुलाखतीसंदर्भात त्यांच्याशी बोलायला गेले होते. त्यांनी तेव्हा प्रेमानं खाऊ खातलेल्या बाकरवडीची चव आठवली. शिपायानं चहा आणला आणि तो बनवू लागला तर त्यााला परत पाठवताना म्हणाले, माझ्या मुलीसारखी आहे ही, चहा मीच बनवतो. त्यांच्या प्रत्येक कृतीत इतका संयम आणि अदब होती की मी कितीही घाईगडबड करणारी असले तरी त्यांच्यासहवासात असताना स्वभावात एक शांतपणा यायचाच.

मी लहान असताना करकरे काका अनेकदा आमच्या घरी यायचे. त्यांचं येणं रात्री उशिराच व्हायचं. मी खूप लहान होते. त्यावेळी ते एक मोठ्ठे पोलीस अधिकारी आहेत यापलिकडे काहीच समजण्याची माझी कुवत नव्हती. त्यांच्या युनिफॉर्मचं आणि पिवळ्या दिव्याच्या गाडीचं मात्र खूप कौतुक होतं. त्या गाडीत तसं बसायला मिळण्याचा काही संबंध नव्हता. पण एकदा जेव्हा छोट्याश्या अंतरासाठी मला ती संधी मिळाली तेव्हा मी त्या अँबेसिडरची सफर केली. मी एतकी एक्सायटेड होते की बिनाचप्पलचीच त्यांच्या गाडीत जाऊन बसले. पांढरीशुभ्र कव्हर्स, त्यांचा कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, वॉकीटॉकी आणि एसीचा गारवा. आजही ती आठवण मनाला सुखावते.

करकरे काका घरी आले की सगळ्यात आधी चौकशी माझी आणि ताईची. मग आई-पप्पांशी गप्पा. ताईला बरेचदा सांगयचे की खूप मोठी हो. तुम्ही लकी आहात की तुमच्या शाळेला नाव तरी आहे. मी तर लहानपणी नंबर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय. माझ्या शाळेला नावंही नव्हतं. आमच्या दोघींशी बोलताना आमच्या वयाचे होऊन बोलायचे. पण बरेचदा ते यायचे तेव्हा आम्ही झोपलेल्याच असायचो.

त्यांच्या येण्याचीपण एक गंमत असायची. तेव्हा आमच्या घरी फोन नव्हता. संध्याकाळी पप्पांना ऑफिसात फोन करुन कळवायचे की ते येतायेत किंवा आमच्या तशा दूरच्या शेजाऱ्यांकडे फोन करायचे. ते येणार म्हटल्यावर आई-पप्पांची तशी गडबड व्हायची. संध्याकाळचं सगळं आवरुन, दुसऱ्या दिवशीची तयारी करुन त्यांची वाट बघणं हा एक कार्यक्रमच असायचा. मी आणि ताई खूपवेळ डोळे ताणत जागायचो आणि झोपायचो. कधीकधी वेळेत यायला त्यांना जमायचं पण खूपदा ईमर्जन्सीमुळे त्यांचं येणंही रद्द व्हायचं. अशी वेळी रात्री संपर्काचं कोणतंच साधन नसल्यानं थेट दुसऱ्या दिवशी समजायचं की ते का आले नाहीत. अर्थात नंतर या गोष्टी अंगवळणी पडल्या.

आमचं घरं खूप साधं. घरी आले की गरमागरम कॉफी आणि कांदेपोह्यांची फर्माईश. कोणताही बडेजाव नाही, की स्वतःच्या पदाचा गर्व नाही. एकदा तर येताना ते त्यांच्यासोबत डॉ.अनिल अवचटांना घेऊन आले. आता इतकी मोठी व्यक्ती घरी आलीय म्हटल्यावर आई पप्पांची धावपळ झाली. पण करकरे काकांच्या स्वभावानं वातावरणातली ती गडबडही हलकी केली.

एकदा तर मोठी गंमत झाली. करकरे काका नेहमी रात्री खूप उशिरा आमच्या घरी येत असल्यानं तसं आमच्या कॉलनीत त्यांच्याबद्दल कुणालाही फारशी माहिती नव्हती. एकदा ते भर संध्याकाळी आले. आणि तेही फोन न करता. आमच्या नेव्ही कॉलनीत तेव्हा दिवाळी मेळ्याचा कार्यक्रम सुरु होता. पोलिसांची सायरन वाजवणारी गाडी आली कुणाकडे? समस्त कॉलनीला पडलेला हा प्रश्न. आम्ही सगळे नेहमीसारखे गप्पा मारत होते. तितक्यात शेजारच्या काकाने येऊन सांगितलं की आमच्या घराखाली ' चौहान के घर में पुलिस क्यों आयी है' याचं उत्तर शोधण्यासाठी बरीच माणसं गोळा झाली होती. करकरे काका आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आणि काही प्रॉब्लेम नाही हे सांगितल्यावर ते सगळे निघून गेले.

मला कळत्या वयात समजलं की करकरे काका कोण आहेत. त्यांचा हुद्दा काय. त्यावेळी खरंतर त्यांच्याशी खूप बोलावं वाटायचं. पण ते शक्य नव्हतं कारण त्यांची पोस्टिंग रॉमध्ये झाली होती. काही वर्ष कोणताच संपर्क नव्हता. ते रॉमधून परत आले आणि पुन्हा बातचीत सुरु झाली. पण आता ते पहिल्यापेक्षा अधिक बिझी असायचे. त्यांचं पोस्टिंग गडचिरोली ऑर चंद्रपूरला होतं तेव्हा दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला त्यांनी पाठवेलं ग्रीटिंग खूप वेगळं आणि सामाजिक संदेश देणारं होतं. नक्षलवादाचा धोका आणि त्याचा बिमोड कसा करायचा या आशयाचं ते पांढऱ्या रंगाचं कार्ड होतं. मधली बरीच वर्ष त्यांची भेट झाली नव्हती. संपर्क मात्र जरुर होता.

मग ते अँटी करप्शन ब्युरोमध्ये आले. वरळीला ऑफिस होतं. मी एबीपी माझाचा (तेव्हाचं स्टार माझा) इंटरव्हूय देण्यासाठी महालक्ष्मीच्या ऑफिसला आलेले. पप्पाही सोबत होते. मुलाखतीनंतर त्यांना फोन केला. त्यांनी लगेच भेटायला बोलावलं. बरेच वर्षांनी झालेली ती भेट. पण नात्यातला स्नेह आणि ओलावा तोच होता.

माझं सिलेक्शन झाल्याचंही मी नंतर त्यांना कळवलं. आम्ही खरंतर आता मीडिया आणि पोलिस या नात्यात आलो होतो. पण माझ्यासाठी ते करकरे काकाच होते.

एका नाईट शिफ्टच्या वेळी अदनान पत्रावालाच्या हत्येची बातमी जोरात होती. अदनानला त्याच्याच मित्रांनी ठार केलं होतं. त्याचा तपास करकरे काका करत होते. या केसच्या निमित्तानं पहिल्यांदाच माझं आणि त्यांचं प्रोफेशनल लेव्हलला बालणं झालं. पण ते पहिलं आणि शेवटचं.
त्या बोलण्यात त्यांना समजलं की मी नाईट शिफ्ट करतेय. मला वडिलांच्या मायेने काळजी घे आणि कोणत्याही वेळी काहाही लागलं तरी फोन कर हे सांगतानाचा त्यांचा आवाज आजही कानात घुमतो. बरं हे सांगताना नाईट शिफ्टमध्ये कुठेकुठे जावं लागतं, चहा कुठे पितेस, कितीवेळ बाहेर असतेस, सोबत कोण असतं हे प्रश्न त्यांच्यातल्या आपुलकीची पुन्हा पुन्हा जाणीव करुन देणारे होते.

एकदा तर विचारलंही की पोस्टमॉर्टेम कसं होतं ते तुला बघायचंय का? मी घाबरुनच नाही म्हटलं. मला म्हणाले अगं मी सोबत असेन. थोडी धीट बन आता. करकरे काका तुमचा सहवास त्या गोल्डन इयर्समध्ये मिळाला असता तर नक्की खूप खूप धीट बनले असते पण दुर्देवानं ते शक्य झालं नाही. इतक्या मोठ्या पदावर असताना आमच्यातलं नातं कधी बदललं नाही, मला वाटतं ते त्यांनी बदलू दिलं नाही. बदलले तर ते फक्त आमच्या गप्पांचे विषय.

मालेगाव बॉम्बस्फोटाचं तपास प्रकरण त्यांना कमालीचं चर्चेत घेऊन आलं. त्या सगळ्यादरम्यानंच त्यांचं संयत वागणं एक व्यक्ती म्हणून बरंच काही शिकवणारं होतं. २६ नोव्हेंबरचं बलिदान त्यांना अमर करुन गेलंय. एक कार्यतत्पर, प्रामाणिक, निष्ठावान पोलीस अधिकारी या हल्ल्यानं हिरावून घेतला आणि माझे करकरे काकाही...

करकरे काका त्यावर्षी तुमच्या वाढदिवसाला म्हणजे १२ डिसेंबरला तुम्हाला भेटण्याचं मी पक्कं ठरवलं होते. पण ते शक्य नाही झालं. करकरे काका, साधारण पंधरा वर्षांपूर्वी चंद्रपूरला पोस्टिंग असताना तुम्ही स्वतः बनवलेलं एक लाकडी घड्याळ भेट म्हणून दिलेलं. ते आजही घरी आहे आणि त्याच्यासोबत जिवंत आहेत तुमच्या असंख्य आठवणी. मनात सारखा विचार येतो..त्या घड्याळाचे काटे मागे करता आले असते तर... तुम्हाला परत भेटता आलं असतं तर.....