World Liver Day 2025: जागतिक यकृत दिन हा दरवर्षी 19 एप्रिल या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी यकृतासंबंधी आजारबद्दल जनजागृती आणि निरोगी यकृताचे महत्त्व या विषयावर चर्चा घडवून आणली जाते. बऱ्याच लोकांना फॅटी लिव्हर आजाराबाबत फारशी माहिती नसते. सामान्य भाषेत यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याला 'फॅटी लिव्हर' म्हणतात.
'फॅटी लिव्हर' म्हणजे नेमकं काय?
फॅटी लिव्हर, ज्याला हेपॅटिक स्टीटोसिस असेही म्हणतात. यकृतामध्ये थोड्या प्रमाणात चरबी साचणे हे सामान्य असले तरी, यकृतातील चरबीचे प्रमाण वाढल्यास यकृताला सूज येणे आणि यकृताचे नुकसान होऊ शकते आणि एखाद्याला प्रत्यारोपणाची आवश्यकता देखील भासू शकते. नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलचे संचालक तसेच यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी तज्ज्ञ डॉ. शरण शिवाजी नरुटे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय.
फॅटी लिव्हरचे मुख्य प्रकार कोणते?
याचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी एक हे मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीयॉटिक लिव्हर डिसीज( MASLD) ज्याला पुर्वी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) असे म्हणायचे, जे अल्कोहोलशी संबंधित नाही आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (AFLD), जो अल्कोहोलच्या सेवनामुळे होतो.
लक्षणे कोणती?
सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे उपचारास विलंब होतो. खालील लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या.
- थकवा येणे
- पोटात अस्वस्थता जाणवणे
- अचानक वजन कमी होणे
- सतत आजारी पडणे
- त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे (अधिक गंभीर प्रकरणांमध्ये)
- या आजाराबाबत जोखीम घटक म्हणजे लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स तसेच बैठी जीवनशैली, अति मद्यपान, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि जलद वजन कमी होणे. या जोखीम घटकांबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.
पन्नाशीनंतरच्या महिलांनी काय काळजी घ्यावी?
डॉक्टर सांगतात, रजोनिवृत्ती दरम्यान किंवा त्यानंतर हार्मोनल बदल, चयापचय प्रक्रिया मंदावणे आणि मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थिती विकसित होण्याची शक्यता जास्त असल्याने 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी फॅटी लिव्हर डिसीज धोकादायक असू शकतो. फॅटी लिव्हरचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास ते यकृताचे नुकसान करु शकतात. इतर यकृताच्या आजारांप्रमाणे, फॅटी लिव्हरमध्ये अनेकदा सुरुवातीची लक्षणे दिसून येत नाहीत, ज्यामुळे योग्य तपासणीशिवाय त्याचे निदान करणे कठीण आहे. काहींमध्ये, चरबी साचल्याने सूज येते, ज्यामुळे यकृताच्या पेशी मृत पावतात आणि यकृतावर जखम होते, ज्यामुळे लिव्हर सिऱ्होसिस आणि यकृत निकामी होते.
वेळीच तपासणीचे महत्त्व : नियमित आरोग्य तपासणी ज्यामध्ये यकृताच्या कार्यासंबंधी चाचण्या किंवा पोटाच्या अल्ट्रासाऊंडचा समावेश असतो, ते फॅटी लिव्हरला फायब्रोसिस किंवा सिऱ्होसिससारख्या गंभीर आजारात रूपांतरित होण्यापूर्वी वेळीच निदान करण्यास मदत करू शकतात. वेळीच निदान, जीवनशैलीतील योग्य बदल आणि वैद्यकीय उपचाराने हा आजार नियंत्रित करता येते. नियमित तपासणी ही केवळ वेळीच निदान करण्यासाठीच नाही तर वेळीच जीवनशैलीत बदल आणि उपचारांचे मार्गदर्शन करण्यासाठी देखील महत्त्वाची ठरते. माहितीपूर्ण आणि सक्रिय राहून, ही स्थिती अनेकदा व्यवस्थापित केली जाऊ शकते किंवा उलट देखील केली जाऊ शकते.
उपचार आणि प्रतिबंध
सुरुवातीच्या टप्प्यात फॅटी लिव्हरचे निदान झाल्यास वजन नियंत्रित राखणे, साखर आणि चरबीयुक्त आहाराचे सेवन कमी करणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे आणि दररोज व्यायाम करुन या आजारास नियंत्रित ठेवता येते. अल्कोहोल सेवन टाळणे आणि औषधांचे सेवन करुन रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॅालची पातळी नियंत्रित केल्याने देखील या स्थितीची प्रगती रोखण्यास मदत होते. लक्षात ठेवा, नियमित वैद्यकीय तपासणी ही यकृत निरोगी असल्याची खात्री करते.
महत्वाच्या बातम्या:
Health : फक्त खाणंच नाही, तर तासन्तास मोबाईलवर स्क्रोल केल्यानेही लठ्ठपणा येतो? काय आहे Digital Obesity? डॉक्टरांकडून समजून घ्या...