Vastu Shashtra: हिंदू धार्मिक ग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार, देवी लक्ष्मी ही धनाची तसेच संपत्तीची देवी मानली जाते, तसेच या देवीचे चंचल स्वरुप आहे. ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही. या देवीची पूजा करणे आणि तिचा फोटो घरात ठेवणे हा हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे मानले जाते की घरात लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने धन-समृद्धी वाढते. पण, तुम्हाला माहिती आहे का? की तुम्ही देवी लक्ष्मीचे अयोग्य फोटो लावल्यास किंवा मूर्ती चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास घरामध्ये गरीबी आणि नकारात्मक ऊर्जा येऊ शकते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घरात देवी लक्ष्मीचे कोणत्या प्रकारचे फोटो तसेच कोणत्या दिशेला ठेवावीत?
देवी लक्ष्मीच्या फोटोची योग्य जागा आणि दिशा
वास्तुशास्त्रानुसार, घरात लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सर्वात महत्वाची दिशा उत्तर आहे. घरामध्ये उत्तर दिशेला लक्ष्मीचे चित्र लावल्यास घरात धन-समृद्धी वाढते. ही दिशा शुभ मानली जाते आणि असे मानले जाते की, येथे देवी लक्ष्मी निवास करते, जी घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते.
चुकीचा फोटो नकारात्मक ऊर्जा वाढवतो
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की घरात कोणत्या प्रकारचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी? वास्तुशास्त्रानुसार, उभ्या स्थितीत लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात अजिबात लावू नये. असे मानले जाते की उभ्या स्थितीत, देवी लक्ष्मी काही प्रवास किंवा मोहिमेसाठी बाहेर असते, ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवाह होऊ शकतो. यामुळे घरात गरिबी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय अशीही मान्यता आहे की घरात उभ्या असलेल्या लक्ष्मीजीचे फोटो लावल्याने धनाची देवी घरात राहण्याऐवजी बाहेर जाते.
देवी लक्ष्मीचा योग्य फोटो आणि मुद्रा
वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती बसलेल्या स्थितीत घरात ठेवल्यास घरात स्थिरता आणि समृद्धी येते. बसलेल्या स्थितीत, देवी लक्ष्मी तिच्या घरात विसावलेली दिसते, ज्यामुळे घरात धन, सुख आणि शांती येते. अशा प्रकारचे चित्र घरात ठेवणे केवळ शुभच नाही तर नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.
योग्य दिशा आणि योग्य फोटो कसा निवडाल?
घरामध्ये लक्ष्मी देवीचे योग्य फोटो किंवा मूर्ती निवडणे फार महत्वाचे आहे. उभ्या असलेल्या लक्ष्मीजींचे फोटो टाळा आणि नेहमी बसलेल्या स्थितीत फोटो निवडा. असे केल्याने घरात समृद्धी तर वाढेलच पण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख-शांती मिळेल. म्हणूनच, लक्षात ठेवा की घरामध्ये देवी-देवतांचे फोटो नेहमी योग्य आसनात आणि योग्य दिशेने फोटो लावावीत.
हेही वाचा..
Shani Uday 2025: अखेर शनिचा मीन राशीत उदय! आजची पहाट 'या' 5 राशींना चिंतामुक्त करणारी, गोल्डन टाईम सुरू, श्रीमंत होण्याचे संकेत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
