Tuljabhavani Temple : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी तिर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी 58 कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. मंदिर समितीच्या स्वनिधीतून 58 कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात आली आहेत. यात तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजे शहाजी महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून बांधकाम किती दिवस टिकू शकतं याचा अहवाल आल्यानंतर नवीन महाद्वाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार
तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला तर दोन्ही महाद्वार पाडून 108 फुटी नवं महाद्वार बांधलं जाणार आहे. तर ऑडिट रिपोर्ट सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वारांच्या मध्ये नवीन महाद्वार तयार बांधलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.
एकूण 58 कोटी 12 लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरातील नुतनीकरणाच्या विविध विकासात्मक कामास मंदिर संस्थानकडून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुरुवात करण्यात आली आहे. एकूण 58 कोटी 12 लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीन टप्प्यांमध्ये हे काम होणार असून मंदिर परिसरातील काही वास्तू यादरम्यान हटवल्या जाणार आहेत.
सभामंडपचा काही भाग पूर्ण पाडणार
भाविकांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून कामाची वर्गवारी करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. कामाबाबत स्थानिक नागरिक, पुजारी, व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या. पुरातत्व खात्याच्या निगराणीाखाली कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या सभामंडपचा काही भाग पूर्ण पाडून पुन्हा नव्याने मजबूत केला जाणार आहे. मंदिरासह आसपासचा भागही मोकळा करून घेतला जाणार आहे.
वर्षभरात काम पार पाडणार
पुढील वर्षभरात मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. दरम्यान भाविक, पुजारी बांधव आणि व्यापारी वर्गाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये यामुळे मोठी वाढ होणार आहे.
पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्प उभारणार
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्थाही केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर प्रत्येक भक्त हा अत्यंत उत्साहात आणि समाधानाने आपल्या घरी जावा, असंही नियोजन करण्यात येत आहे. देशभरातून येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा: