Swami Samartha : श्री स्वामी समर्थ (Swami Samartha) महाराज हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' या त्यांच्या अभयवचनामुळे अनेक भक्तांना मानसिक आधार मिळतो. त्यामुळे अनेकांच्या घरात स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो पाहायला मिळतो. काही जण स्वामींचा फोटो देवघरात ठेवतात, तर काही जण तो देवघरात ठेवू नये, अशी मान्यता असल्याचं सांगतात. पण खरंच स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवणं अयोग्य आहे का? यामागे नेमकं काय कारण आहे? या संदर्भात ज्योतिष आणि वास्तूशास्त्राच्या अभ्यासक अश्विनी यांनी माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.
स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवू नये, असं का म्हणतात?
काही वास्तुशास्त्रीय मान्यतांनुसार, घरातील देवघर हे देवी-देवतांच्या नियमित पूजेसाठी असलेलं पवित्र स्थान मानलं जातं. त्यामुळे देवघरात कोणत्या प्रतिमा ठेवाव्यात, याबाबत काही विशिष्ट परंपरा पाळल्या जातात. काही ठिकाणी साधू-संत आणि गुरूंचे फोटो मुख्य देव्हाऱ्यात न ठेवता स्वतंत्र जागी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
स्वामी हे गुरु आहेत. त्यामुळे त्यांचं गुरुतत्व तुमच्यामध्ये आहे. आणि जे देवघर आहे त्यामध्ये दैवतत्व आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गुरुंचा फोटो मंदिरात देवांच्या बरोबर ठेवू नये. कित्येक लोक आहेत जे फक्त स्वामींची पूजा करतात. त्यांनी देवाच्या ठिकाणी देव न ठेवता फक्त स्वामींचा फोटो ठेवला तर चालेल. पण देव आणि गुरु या दोन्हींचा फोटो एकत्र ठेवायचा नाही.
यामागे अशी धारणा आहे की, देवघरात कुलदैवत, इष्टदेवता आणि नियमित पूजा केल्या जाणाऱ्या देवी-देवतांच्या प्रतिमांना प्राधान्य द्यावं. तर गुरू किंवा संतांची प्रतिमा घरातील स्वतंत्र स्वच्छ आणि पवित्र जागी ठेवून त्यांचं स्मरण, ध्यान आणि पूजन करावं. मात्र, ही एक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यता आहे. स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवू नये, असा कोणताही धार्मिक नियम असल्याचे ठोस प्रमाण उपलब्ध नाही.
स्वामी समर्थांचा फोटो कुठे ठेवावा?
जर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो देवघरात न ठेवता स्वतंत्र जागी ठेवायचा असेल, तर
- घरातील स्वच्छ आणि शांत जागेची निवड करू शकता.
- स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ आणि उंच जागी ठेवावा.
- फोटोच्या आसपास अस्वच्छता किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नयेत.
- स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून मनोभावे प्रार्थना करू शकता.
- फोटो खराब झालेला, तुटलेला किंवा धुळीने माखलेला ठेवू नये.
प्रत्येक कुटुंबाची पूजा पद्धती, श्रद्धा आणि परंपरा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि कुटुंबाची धार्मिक परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवू नये, ही काही ठिकाणी प्रचलित असलेली मान्यता आहे; मात्र तो ठेवल्याने दोष निर्माण होतो, असं निश्चितपणे म्हणता येत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
