Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shravan 2026: श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी? तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा? याचे धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या...

Shravan 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना तसा विविध सण, व्रत-वैकल्याचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भूत योगायोग जुळून येतोय, तो म्हणजे नागपंचमीचा.. 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनाता विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे, श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी? आधी शिवपूजा करावी की नागपंचमी पूजा? तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा? याचे धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या...
यंदा पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा अद्भूत योगायोग! (Shravan 2026)
महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होतो, यासोबतच पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमी आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे.
नागपंचमी तिथी आणि पूजा मुहूर्त
पंचांगानुसार, यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 वाजता सुरू होईल.
ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत राहील.
उदयतिथीनुसार, यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
पंचांगानुसार, नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 पर्यंत हा शुभ कालावधी दिला आहे.
या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 वाजता असून पंचमी तिथी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत आहे.
श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी.. पूजेचा क्रम काय असेल?
पंचांगानुसार, 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने, पूजेचा क्रम असा ठेवू शकता...
प्रथम भगवान शिवांची पूजा - स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ‘ॐ नमः शिवाय’चा जप करा.
त्यानंतर नागदेवतेची पूजा - नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करा.
यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते.
मात्र घरची कुलपरंपरा किंवा स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तीच प्राधान्याने पाळावी. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
पूजा करण्याची उत्तम पद्धत
- सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवांचा अभिषेक आणि पूजा करावी.
- श्रावणी सोमवारची शिवामूठ - तांदूळ अर्पण करावी.
- त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी.
- त्यानंतर सोमवारचे व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या शिवपूजा-आरतीनंतर सोडता येईल.
उपवास सोडण्याची वेळ
- धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा व आरती झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य.
- नागपंचमीची पंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5:01 वाजता संपते, त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही.
- उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रतपरंपरेनुसार सात्त्विक आहार घ्यावा.
- म्हणजेच, सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा-आरतीनंतर पारणा करायचा.
नागपंचमीचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथांमध्येही नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच, नागपंचमीला सर्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी कामना केल्या जातात.
श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि उपवास करण्याची परंपरा आहे.श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी, तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी हे व्रत करतात, अशी परंपरा आहे.
हेही वाचा :
Shravan 2026: प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















