Shirdi Sai Temple : देशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली अर्थातच साईबाबांची शिर्डी... आज भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांती पावलं शिर्डीकडे वळत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे साईबाबांची शिर्डी भक्तांच्या गर्दीन फुलून गेलीय. तर नवीन वर्षाच्या मध्यरात्री 31 डिसेंबरला मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतला आहे. 


31 डिसेंबरला रात्री साई भजन संध्येचं आयोजन


ख्रिसमस आणि आगामी नवीन वर्षाची चाहूल यामूळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांमध्ये वाढ झाली असून सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भक्तांची अलोट गर्दी झाली आहे.  ख्रिसमस सुट्टीच्या पार्श्वभूमीवर देशच नव्हे, तर विदेशातील भाविक सुद्धा साई दरबारी गर्दी करत आहेत. 31 डिसेंबरला रात्री साई भजन संध्येचं आयोजन करण्यात आलं असून पायी पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.


साई समाधी मंदिरात आता फुलं-हार नेण्यास परवानगी


साईदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली असून भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचं आज उदघाटन करण्यात आलं. कोविड काळात साई मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे.


हार-फुलांच्या विक्रीसाठी नियमावली आणि दर निश्चित होणार


भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल, हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. सुरूवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार, फुल तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फुल, हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचारधीन असल्याचं सुजय विखेंनी सांगितल. या निर्णयामुळे ग्रामस्थ, फुल-प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून ‌येतंय.


हेही वाचा:


New Year 2025 Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य