Shardiya Navratri 2026: घटस्थापनेचा घट 'या' वेळेत चुकूनही मांडू नये! घट मांडण्याचा 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, योग्य पद्धत, पूजा विधी, परंपरा, धार्मिक महत्त्व....
Shardiya Navratri 2026: सर्वपित्री अमावस्या संपताच नवरात्रौत्सव सुरू होत असला तरी, यंदा घटस्थापना 10 कि 11 ऑक्टोबरला करावी? याबाबत लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Shardiya Navratri 2026: हिंदू धर्मात शारदीय नवरात्र हा देवी उपासनेचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या नवरात्रोत्सवात नऊ दिवस आदिशक्ती देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. हा उत्सव शक्ती, भक्ती, संयम आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसाक, यंदा शारदीय नवरात्र 2026 यंदा रविवार, 11 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. याच दिवशी आश्विन शुक्ल प्रतिपदेला घराघरांत घटस्थापना अर्थात कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना केली जाईल. मात्र यंदा घटस्थापना 10 कि 11 ऑक्टोबरला करायची? याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. जाणून घ्या जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व...
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, 'या' वेळेत घटस्थापना चुकूनही करू नये...(Shardiya Navratri 2026)
वैदिक पंचांगानुसार 11 ऑक्टोबर रोजी सूर्योदय सुमारे सकाळी 6.27 वाजता आहे. घटस्थापनेसाठी सकाळचा काळ विशेष शुभ मानला जातो. उपलब्ध पंचांग गणनेनुसार सकाळी 6.27 ते 10.27 वाजेपर्यंत घटस्थापना करता येईल. अभिजित मुहूर्त साधारण 11.57 ते 12.48 असा आहे. शहर आणि पंचांग पद्धतीनुसार काही मिनिटांचा फरक पडू शकतो. धार्मिक पंचांगानुसार घटस्थापना प्रतिपदा तिथी सुरू असताना आणि शक्यतो दिवसाच्या पहिल्या तृतीयांशात करणे श्रेष्ठ मानले जाते. रात्री किंवा अमावास्येच्या काळात घटस्थापना करू नये, अशी परंपरा आहे.
घटस्थापना कशी करावी?
धार्मिक मान्यतेनुसार, घटस्थापनेसाठी प्रामुख्याने कलश, स्वच्छ पाणी, अक्षता, सुपारी, नाणे, हळद-कुंकू, नारळ, आंब्याची किंवा इतर पवित्र पाने, लाल/पिवळे वस्त्र, फुले आणि सप्तधान्ये यांचा वापर केला जातो.
पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी कराल?
- पूजा करण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
- पाटावर किंवा पूजेच्या जागी स्वच्छ माती ठेवून त्यात सप्तधान्यांची पेरणी करावी.
- त्यावर पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश ठेवावा.
- कलशावर हळद-कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत.
- कलशाच्या मुखावर पाच पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा.
- नारळाला वस्त्र किंवा लाल/पिवळा कपडा बांधण्याचीही प्रथा आहे.
- कलशासमोर देवीची स्थापना करून तिची पूजा करावी.
- संकल्प करून देवीची आरती, मंत्रजप किंवा दुर्गासप्तशती/देवीमाहात्म्याचे पठण करावे.
- नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज दिवा लावून देवीची पूजा, नैवेद्य आणि आरती करावी.
घटस्थापनेचे धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, घट किंवा कलश हा समृद्धी, पवित्रता, जीवनशक्ती आणि देवीच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो. घटस्थापनेद्वारे नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी देवीशक्तीचे आवाहन केले जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून धर्माचा अधर्मावर विजय मिळवला, अशी पौराणिक मान्यता असून, नवरात्र हा शक्ती, भक्ती आणि चांगुलपणाच्या विजयाचा उत्सव मानला जातो.
यंदाच्या नवरात्रीचे विशेष
वैदिक पंचांगानुसार, 2026 मध्ये शारदीय नवरात्र 11 ऑक्टोबरपासून सुरू होऊन 19 ऑक्टोबरला समाप्त होईल. त्यानंतर 20 ऑक्टोबरला विजयादशमी साजरी केली जाईल. यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत असल्याने नवरात्रातील तिथींच्या क्रमातही विशेष बदल दिसून येतो या वर्षी सप्तमीची तिथी दोन दिवस असल्याने 17 आणि 18 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सप्तमी असणार आहे. 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन केले जाईल. याच दिवशी कन्या पूजनासाह शारदीय नवरात्रीची समाप्ती होईल. त्यानंतर दशमी अर्थात 20 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल.
हेही वाचा :
Sarva Pitri Amavasya 2026: सर्वपित्री अमावस्या..संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी! सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी का करतात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















