Shani Sade Sati : खरंतर, शनिच्या साडेसातीचं (Shani Dev)नाव ऐकताच आपल्या मनात भीती निर्माण होते. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार, हा फक्त एक कठीण काळ मानला जात नाही. तर, हा एक असा काळ आहे जिथे व्यक्तीला मेहनत, जबाबदारी आणि धैर्याने शिकण्याची संधी मिळते. शनिच्या साडेसातीचा काळ हा साडेसात वर्षांचा असतो. जो प्रत्येक राशीवर कधीना कधी येतोच. त्यानुसार, सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा वेगवेगळा टप्पा सुरु आहे. त्यानुसार, 2026 या वर्षात शनिची साडेसाती कधी संपणार हे आपण जाणून घेणार आहोत.
कुंभ रास - अंतिम टप्पा
कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा सध्या अंतिम टप्पा सुरु आहे. या राशींच्या लोकांना मागच्या काही वर्षांत अनेक जबाबदाऱ्यांचा, आव्हानांचा सामना करावा लागला होता. कामाच्या ठिकाणी दबाव, मानसिक तणावही जाणवला असेल. मात्र, आता तुमच्या गोष्टी हळुहळू पुन्हा मार्गी लागतील. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि मेष राशीत प्रवेश करताच कुंभ राशीची साडेसाती संपणार.
कुंभ राशीची साडेसाती कधी संपणार? - 3 जून 2027 च्या जवळपास संपेल.
मीन रास - दुसरा टप्पा
कुंभ राशीच्या तुलनेत मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक असणार आहे. कारण या राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या दरम्यान तुमच्या मानसिक समस्या वाढू शकतात. जबाबदाऱ्याही वाढू शकतात. मात्र, या कालावधीत तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. त्यामुळे चिंता करु नका.
मीन राशीची साडेसाती कधी संपणार? - 8 ऑगस्ट 2029 च्या जवळपास संपेल.
मेष रास - पहिला टप्पा
मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. याचाच अर्थ नुकतीच साडेसाती सुरु झाली आहे. या राशीची साडेसाती 29 मार्च 2025 पासून सुरु झाली आहे. या टप्प्यात खरंतर आव्हानांवर आव्हानं येत असल्यामुळे आपल्यावर नक्की चांगली वेळ आलीय की वाईट वेळ याचा आपल्या अंदाज येत नाही. त्यामुळे या कालावधीत कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करू नका. हळुहळू तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
मेष राशीची साडेसाती कधी संपणार? - 2032 किंवा 2033 च्या जवळपास संपेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
