Shani Dev:  शनी हे नाव ऐकलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. अनेकांना शनी (Shani Dev) आपल्या राशीला नकोच असं वाटतं. पण शनिचा फेरा कोणालाच चुकलेला नाही. शनि देव कलियुगातील न्यायदेवता आहे. शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या - वाईट कामाचे फळ देतो.  शनीला तेल, तीळ आणि काळा रंग खूप आवडतो. शनी मंदिरात भक्तांना या वस्तू अर्पण करताना पाहिलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का या गोष्टींमध्येही अनेक मोठी गुपिते दडलेली आहेत.  आज आम्ही तुम्हाला शनिदेवाशी संबंधित काही खास रहस्ये सांगणार आहोत.


शनीचे न्यायदेवता असण्याचे रहस्य


सूर्य हा राजा आहे, बुध मंत्री आहे, मंगळ सेनापती आहे तर  शनी न्यायाधीश आहे आणि राहू-केतू प्रशासक आहेत.जेव्हा कोणी गुन्हा करतो तेव्हा शनी त्याला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा देतो. राहू आणि केतू शिक्षा देण्यासाठी सक्रिय होतात. शनीच्या दरबारात आधी शिक्षा दिली जाते आणि नंतर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सुख द्यायचे की नाही यावर खटला चालतो.


शनिदेवाच्या वक्रदृष्टीचे रहस्य


शनि मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही शनि मूर्तीची पूजा करू नये. तसेच शनी देवाची  मूर्ती घरच्या देव्हाऱ्यात ठेवत नाही. ज्या व्यक्तीवर शनीची वाईट नजर पडते त्याच्यावर वाईट काळ सुरू होतो. शनीच्या मूर्तीला लोक का घाबरतात?  शनीची पत्नी  तेजस्विनी होती.पुत्रप्राप्तीसाठी ती शनीदेवाकडे गेली. त्यावेळी शनिदेव भगवान विष्णूच्या ध्यानात मग्न होते. बराच वेळ शनी देवाची प्रतीक्षा केली. शेवटी संतापलेल्या पत्नीने शनी देवाला शाप दिला. शनी देव ज्याच्याकडे पाहील तो नष्ट होईल. त्यामुळे शनीच्या वक्रदृष्टीपासून वाचण्याचा सल्ला दिला जातो.


शनी देवाला तेल का अर्पण केले जाते?


एकदा सूर्यदेवाच्या सांगण्यावरून पवनपुत्र हनुमान शनी देवाची समजूत काढण्यासाठी गेले. मात्र शनी देवाची समजूक काढण्यात हनुमानाला यश आले नाही  आणि युद्ध करण्याचे आव्हान दिले. या युद्धात हनुमानाने शनी देवाचा पराभव केला. या युद्धात शनीला गंभीर दुखापत झाली. शनीच्या जखमा कमी करण्यासाठी हनुमानाने त्याला तेल दिले. यावर शनि म्हणाले की जो कोणी मला तेल अर्पण करतो. मी त्याला त्रास देणार नाही आणि त्याचे दुःख कमी करेल. तेव्हापासून शनीला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.


शनिवारी दिवा का लावला जातो? 


शनि अंधाराचे प्रतीक आहे आणि सूर्यास्तानंतर खूप शक्तिशाली बनतो. शनीची साडेसाती मागे लागली तर तर जीवनातही अंधार असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी संध्याकाळी दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो.


शनीचा रंग काळा का आहे?


 शनिदेव हा सूर्याचा पुत्र आहे. छाया आणि सूर्य यांच्या संयोगातून शनीचा जन्म झाला. ज्योतिष शास्त्रानुसार, गर्भात असताना शनिदेव सूर्याचे तेज सहन करू शकले नाहीत आणि त्यांचा रंग काळा झाला. शनीचा रंग पाहून सूर्याने त्याला पुत्र म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. शनीला हे सहन होत नव्हते, तेव्हापासून शनि आणि सूर्यामध्ये वैर आहे.


शनीचा कोप कसा टाळावा?


 जर तुम्हाला शनीचा कोप टाळायचा असेल तर इतरांबद्दल वाईट बोलणे आणि कट रचणाऱ्या लोकांपासून दूर राहा. इतरांबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका. कोणाचेही नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. कोणाचेही हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. निष्काळजीपणा टाळा. सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. सूर्यास्ताच्यावेळी अजिबात झोपू नये.


शनी देवाला कसे प्रसन्न करावे?


 शनी देवाला  प्रसन्न करण्यसाठी गरीबांना अन्न दान करा. एखाद्या गरजू व्यक्तीला चमड्याचे शूज आणि चप्पल दान करा. हिवाळ्यात गरिबांना काळे ब्लँकेट दान करा. शनिवारी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल दान करा. शनिवारी संध्याकाळी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)