Rama Ekadashi 2024 : अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला रमा एकादशी (Rama Ekadashi) म्हणतात. हिंदू धर्म मान्यतेनुसार, रमा एकादशी आणि वसुबारसपासून (Vasu Baras) दिवाळीची (Diwali 2024) सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. या एकादशीचं नाव देवी लक्ष्मीच्या रुपात ठेवण्यात आलं आहे. या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानलं जातं. या एकादशीला रमा एकादशीच्या नावाने ओळखलं जातं.
रमा एकादशी शुभ मुहूर्त
हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, उदय तिथीनुसार, रमा एकादशी आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येतेय. एकादशी तिथीची सुरुवात 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी झाली आहे. तर, या एकादशीची समाप्ती 28 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज सकाळी 07 वाजून 40 मिनिटांनी समाप्त झाला आहे. त्यानुसार या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात.
रमा एकादशीच्या दिवशी काय करावं?
रमा एकादशीच्या दिवशी शुभ मुहूर्तात भगवान विष्णूची पूजा करा. या दिवशी जरी तुम्ही उपवास केला नसला तरी सात्विक भोजनाचं सेवन करण्याचा प्रयत्न करा. तसेच, केळ्याच्या झाडाची पूजा करा. सूर्याला नमस्कार करावा. तसेच, व्रत ठेवताना संकल्प नक्की करा. व्रताच्या सर्व नियमांचं पालन करा. तसेच, या दिवशी भजन-कीर्तन करण्याची देखील परंपरा आहे.
रमा एकादशीच्या दिवशी काय करु नये?
काळ्या रंगाचे वस्त्र - धार्मिक मान्यतेनुसार, रमा एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करु नयेत. भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं.
तांदूळ - या दिवशी तांदळाचं सेवन करु नये. कारण यामुळे दोष लागण्याची शक्यता असते.
मांसाहारी पदार्थ - या दिवशी मांसाहाराी पदार्थांचं सेवन करु नये. तामसिक भोजनाचं सेवन केल्याने भगवान विष्णू नाराज होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :