Rakshabandhan 2025: हिंदू दिनदर्शिकेनुसार, 9 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल, परंतु यावेळी हा सण खूप खास मानला जात आहे. याचं कारण म्हणजे दरवर्षी नेमकी भद्रा काळाची सावली या सणावर असते. मात्र यंदा सर्व बहिण भावांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भाऊ- बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ राहणार नाही. राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील. बहिणी सकाळपासूनच आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधू शकतील. फक्त अशी कोणती वेळ असेल? ज्या वेळेत थोडे सांभाळावे लागेल. जाणून घ्या..

यंदा बहि‍णींना संपूर्ण दिवस राखी बांधता येईल, मात्र 'ही' वेळ सांभाळा..

ज्योतिषींच्या मते, गेल्या तीन वर्षांपासून भाद्रामुळे राखी बांधण्यासाठी कधी दुपारपर्यंत तर कधी रात्रीपर्यंत वाट पहावी लागत होती. यावेळी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील. सहसा भद्रा काळ पौर्णिमेच्या दिवशी असतो. भद्रा काळात शुभ कार्य केले जात नाही. अशा परिस्थितीत गेल्या तीन वर्षांपासून रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा स्थितीमुळे राखी बांधण्यासाठी भद्रा समाप्तीची वाट पहावी लागत होती. यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्टच्या दिवशी आहे, यावेळी भद्रा काळ 8 आणि 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी संपेल. ज्यामुळे 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा संपूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी शुभ राहील.

3 वर्षांनी 'असा' दुर्मिळ योगायोग

ज्योतिषींच्या मते, यावेळी रक्षाबंधनाचा सण अनेक शुभ योगायोगाने साजरा केला जाईल. यावेळी भद्रा राहणार नाही आणि दिवसभर राखी बांधता येईल. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग, श्रावण धनिष्ठा आणि नक्षत्र सौभाग्य योगासह आनंदादि स्थित, वर्धमान योग यांचा अद्भुत संयोग असेल. सूर्य कर्क राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल. सूर्योदयापासून दुपारपर्यंत सौभाग्य योग देखील असेल. या दुर्मिळ योग संयोगांमुळे हा दिवस पवित्र आणि फलदायी असेल.

यंदा भद्राचा अंत होण्याची वाट पाहावी लागणार नाही...

ज्योतिषशास्त्रानुसार, रक्षाबंधनच्या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार, भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. जी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गात राहते. सहसा भद्रा पौर्णिमेला उपस्थित असते, म्हणून पौर्णिमेला येणाऱ्या सणांमध्ये अनेकदा अडथळे येतात आणि भद्राचा अंत होण्याची वाट पाहिली जाते. जेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते तेव्हा ते अशुभ मानले जाते, तर जेव्हा भद्रा स्वर्ग आणि पाताळात राहते तेव्हा शुभ कामे करता येतात. रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असल्याने. म्हणून, या सणात भद्रा दोष स्वीकारला जातो, परंतु यावेळी भद्राची स्थिती एक दिवस आधी संपेल.

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs 4 to 10 August 2025: पुढचे 7 दिवस अद्भूत! पॉवरफुल बुधादित्य योग बनतोय, 'या' 5 राशींच्या संपत्तीत भरभराट होणार, सुखाचा आठवडा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)