मुंबई : नवरात्रीच्या (Navratri 2022) नवव्या दिवशी देवीच्या सिद्धीदात्री रूपाची पूजा केली जाते. या दिवशी नवरात्रीची दिवशी सांगता करण्याची प्रथा असून देवीच्या चरित्राचे वर्णन करणारे सप्तशती ग्रंथाचे पठण तसेच नवचंडी यज्ञ पूर्णाहुती करून समाप्त केला जातो. देवी भागवतात सांगितल्यानुसार नऊ दिवस देवीने विविध रूपे धारण करून महिषासुराचा दहाव्या दिवशी वध केला. देवीच्या नवव्या अर्थात सिद्धीदात्री रूपाची काय आहे आख्यायिका जाणून घ्या
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.
अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने ओळखतात.
देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फुल आहे.देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
नवरात्रातील आठही दिवशी मनोभावे पूजन केल्यास नवव्या सिद्धिदिनी देवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. नवरात्राच्या अंतिम दिवशी म्हणजेच महानवमीला सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सिद्धिदात्री देवीची षोडशोपचार पूजा करावी. यावेळी देवीला नवाहन, नवरसयुक्त नैवेद्य दाखावावा. तसेच नऊ प्रकारची फुले देवीला अर्पण करून नवरात्राची सांगता करावी, असे सांगितले जाते. दुर्गा सप्तशतीच्या नवव्या अध्यायात सिद्धिदात्री देवीच्या पूजनाबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगितले जाते. नवव्या दिवशी देवीला ऋतुकालोद्भव फळे, साखर-फुटाणे, पुरी, काळे चणे, खीर आणि श्रीफळ अर्पण करावे, असे सांगितले जाते.