Najar Dosh Upay: आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो. तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं. घरात सातत्यानं भाडणं होणं, अचानक घरातील सदस्य आजारी पडणं, लहान मुलं सतत किरकिर करणं, घरातील काचा अचानक फुटणं, भांडी अचानक पडणं, घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं, अचानक खर्च वाढणं, शेजाऱ्यांचं विरोधात जाणं, एक प्रकारचा थकवा जाणवणं, सतत डोकं जड होतंय असं जाणवणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं, झोप उडणं, ठरवलेल्या कामात सतत अडथळा येणं, अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतंय? तर हे बहुतेकदा वास्तु दोषामुळे घडतं किंवा नजर दोषामुळे. परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे - "नजर दोष".


नजर दोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं. आपण नजर दोषांची लक्षणं तर जाणून घेतली, पण नजर नेमकी लागते कशी? आणि नजरदोष दूर कसा करावा, नजर कशी काढावी? याचे उपाय (Remedies) जाणून घेऊया.


नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं?


प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो, जे विज्ञानही मान्य करतं. या ऑरावर दुसऱ्याच्या विचारांचा, सहवासाचा परिणाम होत असतो. जर त्यावर वाईट विचारांचा, सहवासाचा परिणाम झाला तर आपला ऑरा डिस्टर्ब होतो, म्हणजेच दृष्ट लागते.


ज्योतिष शास्त्रानुसार म्हणायचं झालं तर, व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो. एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते, तेवढं त्या व्यक्तीच्या सभोवतालचं अदृष्य तेज चमकत जातं, पांढरं होतं. हेच जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत जातं. सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हीटी दिसते, नकारात्मकता दिसते. वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात.


नजर कधी लागते?


असं म्हणतात की, एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टींवर पडते आणि आपण त्याला आपण'नजर' लागली किंवा 'दृष्ट' लागली असं म्हणतो. जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं यश मिळवते, नाव कमवते, तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोक सुद्धा असतात. आणि हे ईर्ष्या, मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात.


नजर कशी काढावी? (नजर दोष दूर करण्याचे उपाय)


1. संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावं आणि नंतर ते बादलीतील पाण्यात टाकावं.


2. नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात, कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच वापरावं.


3. तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चैनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच घालू शकता, जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं.


4. काही ठिकाणी ज्वारीची भाकरी, त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात.


5. नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली, लिंबू मिरची, बिब्वा देखील लटकवला जातो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शनि आणि बुध ग्रहाने नक्षत्र बदललं; ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, बक्कळ धनलाभासह येणार श्रीमंती