Somwaar For Shiva : देशभरातील शिवभक्त सोमवारी शंकराची (Shiva) मनोभावे पूजा करतात. शिवशंभूंचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. भोलेनाथाची पूजा केल्याने तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे, सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की - भगवान शंकराच्या पूजेसाठी, उपासनेसाठी सोमवारचाच दिवस का निवडला गेला? याचं कारण नेमकं काय? तर जाणून घ्या.
खरं तर, सोमवारी शंकराची पूजा करण्याची परंपरा फार जुनी आहे. पण पुराणात यासंदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात येतात. असं मानलं जातं की, सोमवारी शिवशंकराचे व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतात. पुराणात सोमवारीच शंकराची पूजा करण्याबद्दल काही तथ्यं सांगण्यात आली आहेत.
सोमवारीच का केली जाते शिवशंकराची पूजा?
आठवड्याच्या सात दिवसांमध्ये फक्त सोमवार हा दिवसच भगवान शंकराच्या उपासनेसाठी का समर्पित आहे? त्याचं अर्धं रहस्य या दिवसाच्या नावातच दडलेलं आहे. सोमवारमधील सोम म्हणजे चंद्र, जो स्वतः भगवान शिवाच्या जटांमध्ये असतो. सोमचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात.
तसेच आपण जेव्हा सोमवारचा उच्चार करतो, तेव्हा त्याच ओम देखील येतो. सोमवारमध्ये ओम देखील समाविष्ट आहे आणि शिव शंभू हे स्वतः ओंकार आहेत, त्यामुळे हा दिवस अधिक महत्वाचा ठरतो. या सर्व कारणांमुळे सोमवार हा शिव शंकराच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला आहे.
काय सांगते पौराणिक कथा?
यामागे सनातन धर्माची पौराणिक कथाही आहे. कथेनुसार, या दिवशी चंद्रदेवाने महादेवाची पूजा केली होती आणि महादेवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवांना क्षयरोगापासून मुक्त केलं होतं. या कारणामुळे, सोमवार भोलेनाथाच्या पूजेसाठी समर्पित आहे.
दुसऱ्या एका कथेत असं सांगण्यात आलं आहे की, माता पार्वतीने भोलेनाथला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि 16 सोमवारचा उपवास देखील केला होता. यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. तेव्हापासून या दिवशी सोमवारचं व्रत पाळण्याची खूप श्रद्धा आहे.
सोमवारी भक्तिभावाने करा भगवान शंकराची पूजा
भगवान शंकराची सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी. सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: