Mokshada Ekadashi 2022 : हिंदू धर्मामध्ये मोक्षदा एकादशीला फार महत्त्व आहे. आज 03 डिसेंबर 2022 रोजी मोक्षदा एकादशी आहे. मार्गशीष महिन्यातील शुक्लपक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. मोक्ष प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. मोक्षदा एकादशीचा अर्थ म्हणजे मोहाचा नाश. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. असं सांगितलं जातं की, याच दिवशी भगवान विष्णूने अर्जूनाला गीतेचं ज्ञान दिलं होतं. म्हणूनच या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. 


मोक्षदा एकादशीचं महत्व (Mokshada Ekadashi 2022 Importance) 


मोक्षदा एकादशीचा उपवास केल्याने मृत्यूनंतर मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. तसेच हे व्रत केल्याने आपली नरक यातनांपासून मुक्ती होतं, असंही म्हटलं जातं. मार्गशीष शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, म्हणून या दिवसाला गीता जयंती असंही म्हणतात. गीता हा केवळ ग्रंथ नसून ते जीवनाचा उपदेश देणारं शिकवणीचं जिवंत रूप असल्याचं मानलं जातं. म्हणून त्याची जयंती साजरी केली जाते. या दिवशी गीतेचे पठण केल्याने मुक्ती, मोक्ष आणि शांतीचे वरदान मिळतं, असं मानलं जातं. गीता पाठ केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी व्रत ठेऊन रात्रभर जागून श्री हरी नामस्मरण केल्याने मोक्ष मिळतो, असं म्हटलं जातं.


मोक्षदा एकादशी 3 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5 वाजून 39 मिनिटांनी सुरु होऊन 4 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5 वाजून 34 मिनिटांनी समाप्त होईल. आज सकाळी 9 वाजेपासून ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहूकाळ आहे. या दरम्यान कोणतंही शुभ कार्य करु नका. 


मोक्षदा एकादशीची पूजा विधी (मोक्षदा एकादशी 2022 पुजन विधि)


या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांचा कृष्ण अवतार या दोघांची पूजा केली जाते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. व्रत करा. पाटावर पिवळे कापड पसरवा. त्यावर भगवान विष्णू आणि कृष्णाची स्थापना करा. यासोबत लक्ष्मीचीही प्रतिमा ठेवा. गीतेची प्रत लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यांची स्थापना करा. आता फळे, मिठाई आणि पंचामृत अर्पण करा. श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करा. गीतेचा संपूर्ण पाठ किंवा अध्याय 11 चं पठण करा. तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत ही प्रार्थना करा. या दिवशी दानाचं फळ मिळतं.


मोक्षदा एकादशीच्या दिवशी 'हे' काम करू नका


1. मोक्षदा एकादशीच्या उपवासाच्या एक दिवस आधी कांदा, लसूण, मसूर, वांगी, जव इत्यादींचे सेवन करू नका.


2. मोक्षदा एकादशीच्या दिवशी कोणासाठीही वाईट किंवा चुकीचे विचार मनात आणू नका.


3. मोक्षदा एकादशी व्रताच्या दिवशी केस, दाढी, नखे कापणे टाळावेत आणि या दिवशी झाडूचा वापर करू नये.


4. मोक्षदा एकादशीच्या दिवशी फुले आणि तुळशीची पाने तोडू नयेत. मोक्षदा एकादशीच्या पहिल्या दिवशी तुळशीची पाने खुडून ठेवावीत.


5. मोक्षदा एकादशीच्या दिवशी मन शांत ठेवावं. तसेच या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नये. 


मोक्षदा एकादशीच्या दिवशी 'हे' उपाय करा


1. मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप लावा. तुळशीचे रोप लावताना त्याची दिशा पूर्वेकडे असावी.


2. मोक्षदा एकादशीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. पूजेत भगवान विष्णूला पिवळे फूल, वस्त्र, फळे इत्यादी अर्पण करा.


3. या दिवशी भगवान विष्णूला पंचामृताने अभिषेक करा आणि हे तुळशीला अर्पण करा.


4. मोक्षदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. असे केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा होते.


5. या दिवशी भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.


6. मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)