Mohini Ekadashi 2025 : हिंदू धर्मानुसार, मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचं व्रत ठेवलं जातं. मात्र, यंदा एकादशी तिथी दोन दिवस असल्या कारणाने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, नेमकी मोहिनी एकादशी कधी?
वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या 24 एकादशींपैकी मोहिनी एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाणारी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी सुख-समृद्धी, धनसंपदेसह मोक्षप्राप्ती होते. जाणून घेऊयात मोहिनी एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेची योग्य पद्धत.
मोहिनी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथीची सुरुवात - 7 मे रोजी सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
एकादशी तिथीची समाप्ती - 8 मे रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी
मोहिनी एकादशी तिथी - उदय तिथीनुसार, मोहिनी एकादशीचा उपवास 8 मे 2025 रोजी गुरुवारी ठेवला जाणार आहे.
मोहिनी एकादशीचे महत्व
शास्त्रात मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रुप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो, असं म्हणतात. एवढंच नाही तर, एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख-शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन, ऐश्वर्य आणि बुद्धी प्राप्त होते. एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी कोणाचाही राग करू नये. एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दु:खं दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)