Margashirsha Last Guruvar 2024 : मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते. यासाठी दर गुरुवारी महिला घरात घट मांडून महालक्ष्मीची पूजा करून उपवास धरतात. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं.


यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे 26 डिसेंबरला आलं आहे. या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं उद्यापन करुन इतर महिलांना हळदीकुंकू घालतात. पण यंदा 26 डिसेंबरला एकादशीचं व्रत देखील आलंय. एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. त्यामुळे गुरुवारचं व्रत उद्यापन करावं की नाही? महिलांना हळदी-कुंकू घालावं की नाही? याबद्दल महिलांमध्ये संभ्रम आहे. 


महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करावं की नाही?


यंदाच्या वर्षी मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी (Ekadashi) आली आहे. त्यामुळं उद्यापन करावं की नाही? सुवासिनीला जेवण्यास कसं बोलवावं? असे अनेक प्रश्न माहिलांना पडले आहेत. परंतु, मार्गशीर्ष गुरुवार व्रत आणि एकादशी हे पूर्णपणे वेगळे आहेत. दोन्हींचा काहीही संबंध नाही. त्यामुळं उद्यापन अवश्य करावं. ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावं. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशा सुवासिनी जेवायला बोलवाव्या. ज्या महिलांचा एकादशीचा उपवास आहे, त्यांनी पूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे.


शेवटच्या गुरुवारची पूजा कशी करावी?


गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून मधोमध तांदळाची एक मूठ सोडा, त्यावर तांब्याचा कलश ठेवा. कलशाला हळदी-कुंकवाची बोटं लावा. कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी टाका. कळसाला विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळी किंवा 5 फळांची पानं कलशावर ठेवा, त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यावर महालक्ष्मीचा फोटो ठेवा. विडा, खोबरं, फळं, खडीसाखर आणि गूळ ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य दाखवा आणि आरती करा.


गुरुवारचं उद्यापन आणि शुभ मुहूर्त (Margashirsha Guruvar Shubh Muhurta)


मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची पूजा करण्याचा ब्रह्म मुहूर्त हा सकाळी 4 वाजून 36 मिनिटांपासून ते 5 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. तर अमृत काळ सकाळी 6 वाजून 11 मिनिटांपासून ते 7 वाजून 41 मिनिटांपर्यंत, तर विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 13 मिनिटांपासून ते 3 वाजून 1 मिनिटांपर्यंत आहे.


शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळं मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आणि हळदीकुंकू केल्यास काहीही फरक पडणार नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Saphala Ekadashi 2024 : आज अतिशय शुभ योगात जुळून आली सफला एकादशी; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र जाप


Saphala Ekadashi 2024 : यंदाची सफला एकादशी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले