Mahashivratri 2023 Puja : आज 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. देशभर महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. उपवास करुन भक्त भगवान शंकराची आराधना करतात. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. भाविकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. यंदा महाशिवरात्रीला प्रदोष व्रताचा योगायोग आहे, यावेळी महाशिवरात्रीच्या सकाळपासून उपवास करुन दुसर्या दिवशीपर्यंत महादेवाची पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते, अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीला सूर्यास्तानंतर रात्री भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आणि फलदायक मानलं जातं.
महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा आणि जागरण यांना महत्त्व आहे. महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते, अशा वेळी तुम्ही घरच्या घरी शिवशंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा करु शकता. महाशिवरात्रीला घरीच भगवान शंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घ्या.
महाशिवरात्रीला घरी पूजा करण्याची विधी
- सकाळी स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करुन नंतर भगवान शंकराचे व्रत करावे. दिवसभर ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. या पूजेत त्रिपुंडाचे (चंदनाचा तीन बोटांनी कपाळावर लावलेला टिळा) विशेष महत्त्व आहे.
- सूर्यास्तानंतर संध्याकाळी शुभ मुहूर्तावर घरातील पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे.
- आता उत्तर दिशेला तोंड करुन तीन बोटांनी कपाळावर डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला चंदन लावा त्रिपुंड टिळा लावा.
- हातात रुद्राक्ष आणि बेलपत्र घेऊन या मंत्राचा उच्चार करुन उपासनेचे व्रत घ्या - ममखिलपापक्षयपुरवक्षलभिष्टसिद्धये शिवप्रित्यर्थम् च शिवपूजन्म करिष्ये
- घरातील शिवलिंगावर दूध, दही, साखर, मध, तूप, गंगा जल, ऊसाच्या रसाने अभिषेक करावा. बेलपत्र अर्पण करुन शिवलिंग नसेल तर मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी.
- ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर्मक्ष्य ममृतत् ॥ - भगवान शंकराला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा. या मंत्राचा जप केल्याने भगवान शंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
- भस्म किंवा चंदनाने शिवलिंगाला त्रिपुंड टिळा लावा. 11 बेलपत्रांवर ॐ लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना या मंत्राचा जप करा - 'त्रिदलं त्रिगुणाकरम् त्रिनेत्रम् च त्रिधायुतम्. त्रिजन्मपापसहरं बिल्वपत्र शिवार्पणम् ॥'
- शिवलिंगावर बेल, भांग, धोतऱ्याचं फूल, अबीर, गुलाल, शमीपत्र, मूठभर अक्षता अर्पण करा. धूप आणि चौमुखी तुपाचा दिवा लावून भगवान शंकर चालिसा पठण करावे.
- धोतरा फोडून त्याचं फळ शिवलिंगावर अर्पण करा. हे भगवान शंकराचे आवडते फळ आहे. भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महान, भीम आणि ईशान या आठ नावांनी फुले अर्पण करुन भगवान शंकराची अर्धी परिक्रमा करावी.
महाशिवरात्री-नियमानुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने लाभ होतो
महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते. यामुळे भगवान शंकर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्त करतात. पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी बेलाच्या झाडाजवळची, नदी किंवा तलावाची माती वापरा. त्यात शेण, गूळ, लोणी आणि भस्म मिसळून अंगठ्याच्या आकाराचे शिवलिंग बनवा. पार्थिव शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करु नका, तो दुसऱ्या दिवशी शिवलिंगासोबत नदीत विसर्जित करा.
महाशिवरात्री 2023 शिवपूजेचा शुभ मुहूर्त
सकाळी : 8.22 AM - 9.46 AM
दुपारी : 2.00 PM - 3.24 PM
दुपार : 3.24 PM - 4.49 PM
संध्याकाळी : 06.13 PM - 07.48 PM
निशिता काळ : 10.58 PM - 01.36 AM
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)