कोल्हापूर : नृसिंहवाडी दत्त मंदिरात (Nrusinhawadi Datta Mandir) मंदिराच्या गाभाऱ्यात पहाटे 4 वाजता पाणी गेलं आणि दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोल्हापुरातील (Kolhapur) शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. कृष्णा नदीतील पाण्याने पहाटे 4 वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिणदार द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. यावेळी दिंगबरा दिंगबरा असा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


मंदिरात पाणी आल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न


मागील आठवड्याभरापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पंचगंगा पात्राबाहेर वाहत आहे. शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. यामुळे दरवर्षी पाणी वाढलं की नदीचं पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरत असतं. यंदा 16 जुलै रोजी पहाटे 4 वाजता नदीचं पाणी दत्त मंदिरात आलं आहे. यामुळे यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटेच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला.


दक्षिणद्वार सोहळ्यानंतर मंदिरात स्नानासाठी भाविकांची गर्दी


नृसिंहवाडी दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा जल्लोषात पार पडला, यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. दिगंबरा दिगंबरा अशा जयघोषात भविकांनी या पाण्यात स्नानं केलं. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे, त्यामुळे परिसरात इतका धोका नाही. पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात आहे.


काय असतो दक्षिणद्वार सोहळा?


कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर आहे. या मंदिरात कृष्णा नदीला पूर (Krishna River Flood) आल्यानंतर पाणी शिरतं. मात्र हे पाणी ज्यावेळी मंदिरातील दत्ताच्या पादुकांना लागतं, त्यावेळी त्याचं विशेष महत्त्व असतं. या मंदिराच्या रचनेनुसार उत्तर-दक्षिण वाहिनी असलेल्या कृष्णा नदीचे पाणी उत्तर दरवाज्यातून आत शिरतं आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडतं, तेव्हा दक्षिणद्वार सोहळा म्हटलं जातं.




हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि यामध्ये स्नान करण्यासाठी भविकांची मोठी गर्दी होते. आज पहाटे हा सोहळा झाल्याची माहिती मिळताच भाविकानी इथल्या स्नानाचा आंनद लुटला. ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते त्याचवेळी हा सोहळा अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे हा दक्षिणद्वार सोहळा भाविकांना विशेष अनुभूती देणारा ठरतो.


हेही वाचा:


Jagannath Puri : तब्बल 46 वर्षांनंतर देशातील सर्वात मोठ्या खजिन्याचं कुलूप उघडलं; जगन्नाथ पुरी मंदिराचं धन पाहून व्हाल थक्क