Hanuman Jayanti 2025 : 12 की 13 एप्रिल? यंदाची हनुमान जयंती नेमकी कधी? जाणून घ्या अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Hanuman Jayanti 2025 : हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानाची जयंती अगदी जल्लोषात साजरी केली जाते. बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

Hanuman Jayanti 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा (Hanuman jayanti) जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आलं आहे. या दिवशी हनुमानाची विधीवत पूजा केली जाते. असं म्हणतात की, बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे यंदाच्या हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? तसेच, पूजा, तिथी काय असणार आहे ते जाणून घेऊयात.
हनुमान जयंती 2025 कधी?
हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानाची जयंती अगदी जल्लोषात आणि आनंदात साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथीची सुरुवात 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 03 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे. तर, 13 एप्रिल रोजी सकाळी 05 वाजून 52 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार हनुमानाची जयंती 12 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे.
हनुमान जयंती 2025 शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, भगवान हनुमानाच्या पूजेची वेळ सकाळी असणार आहे.
हनुमान पूजेची वेळ (सकाळी) - सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी असणार आहे. तर, 09 वाजून 11 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे.
हनुमान पूजेची वेळ (रात्री) - संध्याकाळच्या वेळी पूजा करण्यासाठी 06 वाजून 45 मिनिटांपासून ते रात्री 08 वाजून 08 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे.
हनुमान जयंती पूजा पद्धत
शास्त्रानुसार, हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं. बजरंगबलीसमोर उपवासाचा संकल्प करा. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं.हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश असावा. हनुमानाला बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसा पठण करा. या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















