Gudi Padwa 2025: हिंदू धर्मीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. तो दिवस अखेर आला आहे. आज गुढीपाडवा, हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा एक शुभ मुहूर्त आहे. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य.. नवा उत्साह.. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास करुन पत्नी सीतासह अयोध्येत परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनचा या दिवशी हा उत्सव साजरा करण्याची पद्धत. याबाबत अशीही एक मान्यता आहे की, ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली होती, या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला माहितीय का, गुढी नेमकी कशी उभारतात? याची योग्य पद्धत काय? गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय? सर्वकाही जाणून घ्या..

महाराष्ट्रासह अवघ्या देशभरात नवीन वर्षाचे स्वागत

गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे. गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतनवर्ष. या दिवशी घरासमोर गुढी उभारुन तिची पूजा करुन नैवेद्य अर्पण केला जातो. याच दिवसापासून वसंत ऋतूचीही सुरुवात होते. नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्येही मोठ्या थाटामाटात केले जाते. 

गुढी कशी उभारावी?

गुढी उभारण्याच्या पद्धतीबाबत अनेकांना योग्य माहिती नसते, सर्वात आधी बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे कलश पालथे घालावे. त्यावर कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ आणि साखरेची माळ बांधावी. सजवलेली गुढी दारासमोर उभारावी, गुढीची पूजा करावी. कलश आणि पताकायुक्त गुढी हे आनंदोत्सवाचे प्रतीक मानले जाते.  

गुढी पूजनासाठी लागणारं साहित्य..

  • एक उंच काठी
  • साडी किंवा ब्लाऊज पिस
  • साखरेच्या गाठी
  • कडूलिंबाची पानं
  • फुलांचा हार
  • धातूचा कलश
  • आंब्याची डहाळी
  • अष्टगंध
  • हळद-कुंकू
  • पाट

गुढी उभारण्याची योग्य पद्धत

  • गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. 
  • यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्र किंवा साडी गुंडाळली जाते.
  • यावर मग, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. 
  • या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यांवर कलश तांब्या उपडा ठेवून तोसुद्धा घट्ट बसवावा.
  • सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहा. 
  • ज्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करुन घ्या.
  • खाली पाट ठेवा आणि त्याभोवती रांगोळी काढा. 
  • सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभारा. 
  • तु्म्ही खिडकीला बांधून देखील गुढी उभारू शकता. 
  • आता गुढीसाठी आरतीचं ताट करुन ओवाळून घ्या. 
  • गुढी उभारल्यानंतर - ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद। प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।। ही प्रार्थना म्हणावी. 
  • त्यानंतर पंचांगांचे पूजन करुन नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. 
  • पुढे कडुलिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुलिंबाचे पाणी घ्यावे. 

गुढी कधी उतरवून ठेवावी?

सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करुन गुढी उतरवून ठेवावी.

हेही वाचा>>

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला 'हे' शुभ योग दिवसभर असतील, मनातील इच्छा होईल पूर्ण! पूजेचा शुभ मुहूर्त, तारीख आणि तिथी जाणून घ्या...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)