Gudi Padwa 2024 : देशात विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा या सणाची आपण सर्वच जणं अगदी आतुरतेने वाट पाहात असतो. कारण यावेळी खमंग पुरणपोळ्या, श्रीखंड पुरी अशा साग्रसंगीत जेवणाची जय्यत तयारी असते. गुढीपाडव्याच्या मिरवणुकीतही अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवर्जून सहभागी होतात. या दिवशी आपण दारात गुढी उभारतो आणि त्याची मनोभावे पूजा करतो. पण, ही गुढी नेमकी कधी उभारावी आणि कधी काढावी हे तुम्हाला माहीत आहे का? याचविषयी सविस्तर जाणून घेऊयात.


गुढी उभारण्यामागे 'हे' आहे शास्त्रीय कारण...


गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. 


याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हाच विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवसही मानला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस आहे. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच आहे अशा अनेक अर्थांनी हा दिवस खास आहे.


गुढी कशी उभारावी आणि कशी उतरावी? 


सकाळी मुहूर्ताच्या वेळी गुढी उभी करावी आणि सूर्यास्त होण्याआधी तिचे पूजन करावे, त्यानंतर गुढी उतरवावी. गुढी उभारताना यावेळी दारावर आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. गुढी उभारताना वेळूची काठी आणून ती धुवावी आणि स्वच्छ वस्त्र आणि सुगंधित फुलांची माळ त्यावर तांब्या अथवा फुलपात्र ठेवावे. बत्ताश्याची माळ घालावी आणि कुटुंबियांबरोबर गुढीची पूजा करावी. सायंकाळी सूर्यास्त होण्याआधी गुढीचे पूजन करून उतरवण्याची परंपरा आजही महाराष्ट्रात पाळली जाते. 


Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं