Garud Puran : हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही नियम आणि परंपरांचे पालन केले जाते. यामध्ये सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार न करण्याची प्रथा विशेष महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केल्यास स्वर्गाचे दार बंद होतात आणि नरकाचा रस्ता मोकळा होतो अशी मान्यता आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी मृतदेह एकटा सोडला जात नाही. गरुड पुराणाशी (Garud Puran) संबंधित मान्यतांमध्येही यामागील काही कारणांचा उल्लेख आढळतो.
रात्री मृतदेह एकटा का सोडला जात नाही?
गरुड पुराणातील मान्यतेनुसार, मृतदेह रात्रीच्या वेळी एकटा ठेवल्यास त्याच्याभोवती असलेल्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो, अशी मान्यता आहे. या शक्ती मृतदेहात प्रवेश करू शकतात आणि त्याचा परिणाम घरातील वातावरणावरही होऊ शकतो, असे मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, रात्रीच्या वेळी तांत्रिक क्रियेचा प्रभाव देखील वाढतो. त्यामुळे मृताच्या आत्म्याला त्रास होऊ शकतो.
मृतदेहाचे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठीही असतात लोक
मृतदेह रात्री एकटा न सोडण्यामागे केवळ धार्मिक कारणेच नाहीत, तर काही व्यावहारिक कारणेदेखील आहेत. पूर्वी मृतदेह अनेकदा घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत ठेवला जात असे. अशा वेळी कुत्रे, मांजरी किंवा इतर प्राणी मृतदेहाला इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे मृतदेहाचे संरक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ कोणीतरी असणे आवश्यक मानले जात असे.
तसेच मृत्यूनंतर काही काळाने शरीरात नैसर्गिक बदल होण्यास सुरुवात होते. यामुळे शरीरातून दुर्गंधी येऊ शकते. अशा वेळी मृतदेहाजवळ धूप किंवा अगरबत्ती लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण सुगंधित राहण्यास आणि दुर्गंधी कमी जाणवण्यास मदत होते.
मृत्यूनंतर आत्मा काही काळ शरीराभोवतीच असतो, अशी मान्यता
गरुड पुराणाशी संबंधित धार्मिक मान्यतेनुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्मा काही काळ आपल्या शरीराच्या आणि कुटुंबीयांच्या आसपास भटकत राहतो. मृत व्यक्तीला आपल्या प्रियजनांचा मोह असतो आणि ती आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाहत असते, अशी धारणा आहे.
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, मृत्यूनंतर शरीरातून आत्मा निघून जातो आणि शरीर निर्जीव होते. अशा रिकाम्या शरीरावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो, अशी समजूत आहे. त्यामुळे मृतदेह रात्रीच्या वेळी एकटा न ठेवता त्याच्याजवळ कोणीतरी उपस्थित राहते. याच धार्मिक आणि व्यावहारिक कारणांमुळे मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी पाळली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
