Ganesh Chaturthi 2025 : देशभरात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे. तसेच गौरीचं आगमन देखील होणार आहे. अवघ्या काही तासांतच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. लाडक्या बाप्पा आणि गौराईच्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक असताना कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला पाहिजे. गौरी-गणपती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त काय? हा उत्सव नेमका कसा साजरा केला पाहिजे? या विषयी पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी महत्त्वाची माहिती दिलीय ते जाणून घेऊयात.
गणेशोत्सवा दरम्यान येणारे काही महत्त्वाचे दिवस
बुधवार, तारीख 27 ऑगस्ट 2025 : श्रीगणेश चतुर्थी या दिवशी पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
रविवार, तारीख. 31 ऑगस्ट 2025 : गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून सायंकाळी 5.27 पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
सोमवार, तारीख. 1 सप्टेंबर 2025 : गौरी पूजन
मंगळवार, तारीख 2 सप्टेंबर 2025 : गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री 9:51 पर्यंत गौरी विसर्जन करावे.
शनिवार, 6 सप्टेंबर 2025 : अनंत चतुर्दशी
गणेश चतुर्थी 2025 पूजा विधी (Ganesh Chaturthi 2025 Puja Vidhi)
गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करताना तसेच पूजा करताना काही गोष्टींचं नीट पालन करणं गरजेचं आहे. या दिवशी सर्वप्रथम पहाटे लवकरच उठावे. त्यानंतर, स्नान करावे. देव्हारा स्वच्छ करुन बाप्पाची पूजा करावी. यानंतर शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक पाट स्थापित करुन आणि त्यावर पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड पसरवून, त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवावी. त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ श्रीगणेशाची आरती करुन बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेने त्याचा निरोप घ्यावा आणि मूर्तीचं विसर्जन करावं.
गणेश चतुर्थी महत्त्व 2025 (Importance Of Ganesh Chaturthi 2025)
गणेशोत्सवाच्या दिवशी गणरायाची विधीवत पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धीचं आगमन होतं. बाप्पा लाडक्या भक्तांना आशीर्वाद देतात. तसेच, श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
गणपती पूजेची यादी (List Of Ganpati Puja)
हळद, कुंकू, शेंदूर, अबीर, गुलाल, अक्षता, गंध, फुले, हार, दूर्वा, बेल, पत्री, नारळ दोन, फळे पाच, विड्याची पाने 10, सुपा-या पाच, सुटे पैसे, गूळ खोबरे, पंचामृत, उदबत्ती, निरांजन, कापूर, अत्तर, काडेपेटी, कापसाचे वस्त्र, जानवीजोड, पळी भांडे 1, ताम्हन 1, तांब्या 1, नैवेद्याला पेढे/मोदक.
- मोहनराव दाते, पंचागकर्ते
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :