Child Health: नाताळच्या सुट्ट्या म्हणजे गोडधोड आणि उत्साहाचा काळ..या दिवसांत मुलांचे खाणं-पिण्याच्या वेळा अनियमित होतात, जंकफूडचे सेवन वाढते आणि सुट्टीत घरबसल्या स्क्रीन टाईम वाढल्यामुळे शारीरिक क्रिया कमी होतात. अशा वेळी मुलांना निरोगी आहाराच्या सवयी लावणे पालकांसाठी थोडे आव्हानात्मक असू शकते. मात्र योग्य नियोजन आणि छोट्या छोट्या बदलांमुळे ही प्रक्रिया आनंददायी व परिणामकारक ठरू शकते. पुण्याचे अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन ॲण्ड चिल्ड्रन येथील नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. अनुषा राव यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
ख्रिसमस पार्टीत गोडधोड खा.. पण 'या' गोष्टी लक्षात ठेवा
डॉक्टर पुढे सांगतात, ख्रिसमस हा मुलांसाठी एक उत्साहाचा काळ आहे. चॉकलेट, कुकीज पासून ते केक, गोडधोड स्नॅक्स आणि नाताळच्या पार्टीमुळे मुलांमधील उत्साह काही वेगळाच असतो आणि अशावेळा मुलं नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करतात. सणासुदीच्या काळात विविध पदार्थांचा आनंद घेणे हा उत्सवाचा एक भाग असला तरी, जास्त प्रमाणात अशा पदार्थांचे सेवन केल्याने पोटदुखी, अपचन, भूक न लागणे, चिडचिड होणे, वजन वाढणे आणि झोपेत व्यत्यय येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते
डॉक्टर पुढे सांगतात, हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि अशावेळी जेव्हा मुलं खूप गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि चरबीयुत्त पदार्थांचे सेवन करतात तेव्हा त्यांना थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच पालकांनी मुलांना निरोगी सवयींमध्ये संतुलन राखण्यास मदत केली पाहिजे.
पौष्टिक नाश्ता करा : फळे, तृणधान्य, अंडी किंवा काजू यांचा समावेश असलेल नाश्ता उर्जेची पातळी स्थिर ठेवतो आणि गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून रोखतो. पालकांना ही खात्री करावी लागेल की आपले मूल सकाळचा नाश्ता वगळणार नाही.
गोड पदार्थांच्या सेवनावर मर्यादा घाला : मुलांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा आनंद घेऊ द्या पण तेही मर्यादित प्रमाणात. त्यांना शिकवा की दिवसातून एक किंवा दोन गोड पदार्थ पुरेसे आहेत. एकातवेळा संपूर्ण कॅडबरी खाण्याऐवजी, दिवसातून १-२ तुकडे खाणे ठीक आहे.
आहारात फळे आणि भाज्या समावेश करा : रंगबेरंगी फळे, गाजर, काकडी, सूप आणि सॅलड यांचा रोजच्या आहारात समावेश करा आणि हे पदार्थ पचनास मदत करतात. म्हणून, मुलांना आहाराच्या निरोगी सवयी लावणे गरजेचे आहे.
पुरेसे हायड्रेशन गरजेचे : हिवाळ्यात फारशी तहान लागत नसल्याने मुले पाणी पिण्यास विसरतात. त्यामुळे मुलांना रोज कोमट पाणी, सूप, नारळ पाणी किंवा घरी बनवलेला फळांचा रस, भाज्यांचे सुप द्या.
निरोगी नाश्त्याचे पर्याय निवडा : मुलांना चिप्स आणि चॉकलेट देण्याऐवजी, पालकांनी भाजलेले काजू, दही, कापलेली फळं, ओट्स बार द्या.
मुलाला दररोज व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्या : मुलं किमान 1 ते 2 तास बाहेर खेळतील, नाचतील, सायकल चालवतील किंवा कौटुंबिक खेळांमध्ये सहभागी होतील याची खात्री करा. नियमित हालचालीमुळे पचनक्रिया सुधारेल आणि वजन वाढण्यास मदत होते. मुलांना तासनतास टीव्ही किंवा मोबाईल फोनचा वापर करु देऊ नका.
रात्रीच्या वेळी हलका आहार घ्या : सुट्ट्यांमध्ये बहुतेकदा उशिरा जेवण होते, त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो हलका आहार घ्यावा. जेवणाच्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. खूप उशिरा खाल्ल्याने ॲसिडीटी, पोट फुगणे, मळमळ, उलट्या आणि झोप न येणे यासारख्या समस्या सतावतात. म्हणून, पालकांनी या नाताळच्या सुट्टीत मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
हेही वाचा :
रक्तातील साखर वाढली की डोळ्यांवर कसा परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
