नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहकुटुंब सहभागी होणार आहेत. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान येत्या गुरूवारी, म्हणजेच 20 जूनला होणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंब उपस्थित राहतील. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरेही पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवतील. पालखीची पूजा करून काही वेळ ते वारीत (Ashadhi Wari 2024) सहभागी होतील. 


राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर


येत्या गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजेच 19, 20 जूनला दोन दिवस राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतील. हा पूर्णत: धार्मिक दौरा असेल. 20 जूनला निवृत्तीनाथ महाराजाची पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना होणार आहे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा असेल. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्याना राज ठाकरे भेट देतील आणि वारकऱ्यांशी संवाद साधतील. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन नंतर ते निवृत्तीनाथ समाधी मंदिराचं दर्शन घेतील.


तुमच्या गावातून पंढरीसाठी निघणार थेट एसटी


श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींसोबत चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.


ज्येष्ठांना आणि महिलांना एसटी प्रवासात विशेष सूट


अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त 4 हजार 245 विशेष बसेस सोडल्या होत्या. यात्रा काळामध्ये 18 लाख 30 हजार 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.


वाहतुकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत


एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.


हेही वाचा:


Ashadhi Wari 2024 : यंदा आषाढी वारीत पालखी प्रस्थानाला मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश; गेल्या वर्षीच्या वारकरी-पोलिसांमधील झटापटीमुळे मोठा निर्णय