Ashadhi Wari 2024 : दरवर्षी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा आहे. परंतु, यंदा याला जोडूनच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान मिळणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हा मोठा निर्णय घेतला आहे.


श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत प्रथमच राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थांच्या अध्यक्षांना संधी मिळणार आहे.


सरकारचा मोठा निर्णय


यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत वारकरी संप्रदायाने केलं होतं. त्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  आता आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडी प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने पुन्हा एकदा महायुतीत शिंदे शिवसेनेला मोठा फायदा मिळणार आहे.


वारकरी सांप्रदाय खुश


आता विठ्ठलाचा गाभारा आणि सोळखांबी मध्ये ही वाढलेली मानकऱ्यांची संख्या कशी मावणार हा प्रश्न देखील पडणार आहे. दरम्यान, शासनाने आषाढी वारीसाठी सोहळ्यात चालणाऱ्या सुमारे 1500 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचं राज्यातील दिंडी प्रमुखांनी स्वागत केलं.


मुंबई मंत्रालयात शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थांच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे महापूजेची मागणी करण्यात आली. पूर्वी श्री विठ्ठलाच्या पहाटेच्या महापूजेला राज्यातील मानाच्या पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थान अध्यक्षांना बोलावलं जायचं, पुढे ती पध्दत बंद करण्यात आली.


वारकऱ्यांच्या मागण्या नेमक्या कोणत्या होत्या?


राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटरची पायपीट करुन लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठी येत असतात. या वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शासनाने राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळाप्रमुख आणि संस्थान अध्यक्षांना महापूजेला निमंत्रित करावं, आषाढी वारी पालखी सोहळे आणि शासनाच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमावा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सल्लागार मंडळात संस्थान अध्यक्ष आणि सोहळा प्रमुखांचा समावेश करावा, आदी मागण्या त्यांनी करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारत्मकता दर्शवली असून आषाढी वारी वारकऱ्यांच्या दृष्टीने सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असं सांगितलं आहे.


हेही वाचा:


Ashadhi Wari 2024 : राज ठाकरे त्र्यंबकेश्वर नगरीत करणार जय हरी विठ्ठ्ल; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहकुटुंब राहणार उपस्थित