Why buy gold on Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) हा हिंदू धर्मानुसार शुभ दिवस मानला जातो. जैन धर्मामध्येही ही तिथी शुभ मानली जाते. या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात केल्यास शुभ मानलं जातं. आणखी एक गोष्ट म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला (Gold ) विशेष महत्त्व दिलं जातं. 


अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? त्यांचं महत्त्व


पौराणिक मान्यतेनुसार सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून झाली असं म्हटलं जातं. भगवान विष्णूंनीही याच दिवशी नर नारायणाचा अवतार घेतला होता. भगवान परशुरामांचा जन्मही अक्षय्य तृतीयेला झाला होता. या शुभ तिथीपासूनच श्रीगणेशाने महाभारताचे काव्य लिहिण्यास सुरुवात केली होती. यामुळेच या दिवसाला विशेष महत्त्व आहे.


अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व 


तुम्ही अनेक वेळा, अनेक जणांकडून ऐकलं असेल की, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी सोनं खरेदी करणे, अत्यंत शुभ मानलं जातं. पण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी खास का मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व का दिलं जातं, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज याचं उत्तर जाणून घ्या. 


अक्षय्य तृतीया आणि सोने खरेदीचा नेमका संबंध काय?


धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिलं जातं. या शिवाय या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने, घर, वाहन या वस्तू खरेदी करणेही शुभ मानलं जातं.  या दिवशी सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अधिक शुभ का मानलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, या दिवशी सोने खरेदी केल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते असं मानलं जातं.


अक्षय्य तृतीयेला सोने किंवा चांदी काय खरेदी करावं?


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही लोक सोनं खरेदी करतात, तर काही लोक चांदी. या मुहूर्तावर सोने किंवा चांदी काय खरेदी करणं अधिक शुभ ठरेल? तर याचं उत्तर वाचा. धार्मिक मान्यतेनुसार, सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे स्वतःचं महत्त्व आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदी दोन्ही खरेदी करता येते. दोन्ही धातू खरेदी करणं शुभ आहे.


सोनं लक्ष्मी मातेचं रूप


सोने हे देवी लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं, यामुळे सोनं खरेदी केल्यास देवी लक्ष्मी आपण घरात आणतो, अशी मान्यता आहे. यामागे एक पौराणिक कथा आहे त्यानुसार, देव आणि दानवांच्या समुद्रमंथनादरम्यानही सोने बाहेर आले होते. जे भगवान विष्णूंनी परिधान केले होते. या कारणास्तव यामुळे सोने माता लक्ष्मीनारायणाचं रूप मानलं जातं. याच कारणामुळे अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे, जर आपण अक्षय्य तृतीयेला सोने किंवा सोन्याचे दागिने विकत घेऊन घरी आणतो, तेव्हा त्यासोबत देवी लक्ष्मीही आपल्या घरात प्रवेश करते, असं मानलं जातं. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ज्या संपत्तीची खरेदी केली जाते, तिथेही लक्ष्मीचा वास असतो आणि ती संपत्ती सदैव तुमच्याकडे राहते, असंही म्हटलं जातं.


चांदी खरेदी करावी की नाही?


या दिवशी चांदी खरेदी करणंही शुभ मानलं जातं. चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्र या ग्रहाशी असल्यचं सांगितलं जातं. शुक्र हा भौतिक सुख, सुविधा, प्रेम आणि संतती यासंबंधित ग्रह मानला जातो. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जेव्हा चांदी किंवा चांदीच्या वस्तू खरेदी केल्यास व्यक्तीचा शुक्र आणि चंद्र या दोन्ही ग्रहांना बळ मिळतं. चंद्र बळकट झाल्यास व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप मजबूत बनते आणि शुक्र जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा, प्रेम देतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला चांदी खरेदी करून ते परिधान करणंही शुभ मानलं जातं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)