Food Corporation of India : सध्या देशात गव्हाच्या किंमतीत (Wheat Price) मोठी वाढ झाली आहे. तसेच गव्हाच्या पीठाच्या किंमती (Wheat Flour Price) देखील वाढल्या आहेत. त्यामुळं आता केंद्र सरकारनं किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने 30 लाख टन गहू बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यातील पहिल्या आठवड्यात भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे. त्यामुळं आता लवकरच गव्हाच्या पीठाच्या किंमतीत कमी होण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाचे लिलाव सुरू झाले आहेत. भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) गव्हाची विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FCI ने आयोजित केलेल्या गव्हाच्या लिलावात 1 हजार 150 हून अधिक बोलीदारांनी भाग घेतला. देशभरात सुमारे 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे. लवकरच उरलेल्या गव्हाचाही देखील एफसीआय स्तरावर विक्री होणार आहे.
लहान-मोठे सर्व व्यापारी सहभागी झाले होते
गव्हाच्या लिलावामध्ये अनेक लहान-मोठे व्यापारी सहभागी झाले होते. पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बोली0 लावल्या होत्या. व्यापारी 500 ते 1000 दशलक्ष टन गहू खरेदी करण्यासाठी उपस्थित होते. केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत देशात गव्हाचा खप कमी होऊ द्यायचा नाही. एफसीआय दर बुधवारी ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करेल. किंबहुना, गव्हाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या समितीने ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर हा कृती आराखडा राबवण्यात आला आहे. एफसीआयने 25 लाख मेट्रिक टनांपैकी 22 लाख मेट्रिक टन गहू ई-लिलावाद्वारे देऊ केला आहे. त्याचबरोबर एकूण 30 लाख मेट्रिक टन गहू बाजारात दाखल होणार असल्याचे सांगितले होते.
29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री
केंद्रीय भांडारात ग्राहकांसाठी 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची (Wheat Flour) विक्री सुरु करण्यात आली आहे. नाफेड आणि एनएफसीसी या संस्था 6 फेब्रुवारी 2023 पासून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री सुरु करणार आहेत. केंद्रीय अन्न तसेच सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. खाद्य अर्थव्यवस्थेत दिसून येणाऱ्या वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्राहकांना देशातील विविध दुकानांच्या माध्यमातून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), केंद्रीय भांडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनएफसीसी) या संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या: