Ajit Pawar : ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाब राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे अजित पवार म्हणाले. सोमेश्वर येथे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगाम शुभारंभाप्रंसगी ते बोलत होते. 


 सोमेश्वर साखर कारखान्याने राज्याच सर्वाधिक दर दिला


दरम्यान, राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा  निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. 2022-23 या गाळप हंगामाकरीता राज्यात सर्वाधिक असा प्रती टन 3 हजार 350 रुपये इतका ऊसदर जाहीर केला आहे. आगामी काळातही आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी संचालक मंडळांने प्रयत्न करावेत असे अजित पवार म्हणाले. यंदाचे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळं ऊसाच्या क्षेत्रात आणि साखर उत्पादनात होणारी घट याचाही विचार करावा असे अजित पवार म्हणाले.


साखर कारखान्याने प्रदूषणविषयक नियमांचे पालन करावे


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लेखापरीक्षण केल्यानंतर पर्यावरणबाबत निष्काळजी केल्याबद्दल राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाने कळवले आहे. याचा विचार करता संचालक मंडळाने बदलत्या काळानुसार नवनवीन अत्याधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. साखर उद्योगाबाबत कारखान्यांचे संचालक मंडळ, अधिकारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभ्यास करावा अजित पवार म्हणाले. 


पाण्याचे काटकसरीने नियोजन करावं


कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्याला पाणी देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. जनाई सिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी अत्याधुनिक पंप व त्याअनुषंगिक बाबी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मल:निस्सारण प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी वापरण्याबाबत विचार करण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत काम सुरु आहे. मुळशी धरणातील पाणी वीजनिर्मिती ऐवजी जिल्ह्यातील हवेली पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यातील भागाला मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर्षीचे पावसाने ओढ दिल्यामुळे पाणी काटकसरीने वापरून बचत करण्याचे नियोजन करावे असे अजित पवार म्हणाले. 


राज्यासह पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध 


राज्यासह पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून ऊसतोड कामगारांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक मार्ग काढून न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न करण्यात येईल. शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीक विमा, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह विमा योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.


महत्त्वाच्या बातम्या:


ऊसतोड कामगारांचा संप! हार्वेस्टरप्रमाणेच टनाला 400 रुपये द्या; भाजप आमदाराचा पाठिंबा